तकाईची म्हणतात, कामाचा डोंगर उपसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:05 IST2025-10-25T09:05:09+5:302025-10-25T09:05:19+5:30
ठाम निर्धाराच्या, पोलादी स्वभावाच्या तकाईची या घटनेने थोड्याही हुरळून गेल्या नाहीत.

तकाईची म्हणतात, कामाचा डोंगर उपसा!
सनेई तकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, पण ठाम निर्धाराच्या, पोलादी स्वभावाच्या तकाईची या घटनेने थोड्याही हुरळून गेल्या नाहीत.
राजकारणात सर्वोच्च पद मिळवण्यासाठी ३५ वर्षे अखंड काम करत राहिलेल्या तकाईची या पहिलं भाषण करण्यासाठी व्यासपीठावर चढल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान झाल्याचा आनंद नव्हता; पण चिंता, भीतीची रेषही नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर निर्धार होता जो त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात जोरकसपणे व्यक्त केला. ‘पंतप्रधान झाल्याचा मला आनंद झाला नाही कारण मला पुढच्या काळात किती कष्ट उपसायचे आहेत हे स्पष्ट दिसतंय.
पक्षातले नेते, कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाने यापुढे फक्त काम करायचं आहे. काम आणि जगणं, काम आणि कुटुंब असा समतोल मला मान्य नाही. मी यापुढे फक्त काम, काम आणि कामच करणार आहे. आणि जपानमधल्या प्रत्येक नागरिकानेही घोड्याप्रमाणे काम करण्याची तयारी ठेवायची आहे!’
तकाईची यांचं भाषण संपल्या संपल्या जपानमध्ये त्याचे पडसाद उमटायला लागले. अतिकामाच्या ओझ्याने किती जण अकाली मेले, किती तरी जणांनी कामाचा ताण असह्य झाल्याने आत्महत्या केली. आता पुन्हा तेच अति कामाचं विष पंतप्रधान जनतेत पेरणार, म्हणून जपानमध्ये अस्वस्थता आहे.
तकाईची यांनी हे का केलं असावं? खरंतर, जे त्यांनी आयुष्यभर केलं त्याचेच पडसाद त्यांच्या पहिल्या भाषणात उमटलेले दिसतात. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तकाईचींचं बालपण शिस्तीत आणि स्वावलंबनाचे धडे गिरवण्यात गेलं.
शाळेत आणि पुढे काॅलेजमध्ये इतरांची काळजी घेणारी पण जबर इच्छाशक्तीची मुलगी अशीच त्यांची ओळख होती. संवेदनशील मनाच्या तकाईची एकदा का वादविवाद आणि चर्चेमध्ये उतरल्या की समोरच्यावर वर्चस्व गाजवल्याखेरीज शांत बसत नसत. हरणं, माघार घेणं हे शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नव्हते.
सुरुवातीपासून अर्थकारणाच्या प्रेमात असलेल्या तकाईचींंना आर्थिक ताकद आणि देशाचा अभिमान अशी सांगड घालणारे नेते आवडायचे. मार्गारेट थॅचर त्यांच्या आदर्श. कोबे विद्यापीठात बिझनेस मॅनेजमेंट शिकत असताना शैक्षणिक देवाण-घेवाण प्रकल्पांतर्गत त्या अमेरिकेला गेल्या. तिथे त्यांना जपानमध्ये राजकारणात तरुण रक्ताची आणि स्त्री नेतृत्वाची गरज असल्याची जाणीव झाली. जपानमध्ये परतल्या त्या निवडणूक लढण्याच्या निर्धारानेच.
फक्त ३२ वर्षांच्या होत्या तेव्हा तकाईची जपानच्या प्रतिनिधी सभागृहात सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आल्या. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्य झाल्या. आणि सुरू झाला एक खडतर प्रवास. प्रारंभी त्यांची धोरणं, मतं, विचार याला कोणीही किंमत देत नसे. पण तकाईची हरल्या नाहीत. आपली आर्थिक धोरणं ठामपणे मांडत राहून त्यांनी देशाच्या राजकारणात स्वत:ची जागा निर्माण केली. तरुण कार्यकर्ते, महिला यांचा विश्वास जिंकला. भ्रष्टाचारामुळे पक्षाने लोकांमधली विश्वासार्हता गमावली असताना २०२५ मध्ये तकाईची पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणून समोर आल्या आणि पंतप्रधान झाल्या.
काम आणि जगणं यातल्या समतोल झुगारून देऊन अखंड काम करत पंतप्रधान झालेल्या तकाईची यांची देशातल्या नागरिकांकडूनही आता हीच अपेक्षा आहे.