शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे डोके ठिकाणावर आहे का? इशारा द्यायचा का?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 14, 2024 07:45 IST

कोण कोणावर भारी आणि कोण कोणाचा आभारी? हे आपल्याला माहिती नाही, अशी कोटी करत संजय मोने यांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ म्हणाले, निवडणूक आयोगाच्या प्रभावाखाली येऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.

प्रिय राहुल नार्वेकर,नमस्कार!

शिवाजी पार्कवर फिरताना काही लोक चर्चा करत होते. तिथेच बाजूला बसून ती चर्चा ऐकली आणि तुम्हाला तातडीने कळवावी, असे वाटले. तुम्ही लोकशाहीचा जो निकाल लावला... त्यावरून त्यांच्यात चर्चा सुरू होती. असा निकाल लावणारा अध्यक्ष याआधी झाला नाही आणि भविष्यात होणार नाही, यावर त्यांच्यात चर्चा रंगली होती. प्रत्येक जण आपला मुद्दा पोटतिडकीने मांडत होता. एक जण म्हणाला, सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली निवड अपात्र ठरवली होती. ती निवड अध्यक्षांनी पात्र केली. हे कसे काय घडले? त्यावर दुसरा म्हणाला, विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे एकदम भारी माणूस असतो. त्यांना गृहीत धरणे बरोबर नाही. ते काहीही करू शकतात. त्यावर बाजूला बसलेला एक निष्पाप चेहऱ्याचा माणूस म्हणाला, विधानसभेचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारी असतात का..? तेव्हा शिवतीर्थच्या शेजारी राहणारे दुसरे गृहस्थ म्हणाले, भरत गोगावले प्रतोद असताना त्यांनी काढलेल्या आदेशानंतरच राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तेव्हा भरत गोगावले जर अपात्र ठरले तर अध्यक्षांची निवडही अपात्र ठरेल. स्वतःची निवड अध्यक्ष अपात्र कशी ठरवतील? या युक्तिवादावर समोरच्याने हसून टाळी दिली. तर आधीचा निष्पाप चेहऱ्याचा माणूस म्हणाला, म्हणजे अध्यक्षांपेक्षा भरत गोगावले भारी दिसतात... पण भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे, असे विधान समोरून येताच, पुन्हा तो निष्पाप चेहऱ्याचा माणूस म्हणाला, म्हणजे मुख्यमंत्री शिंदे भारी दिसतात...

कोण कोणावर भारी आणि कोण कोणाचा आभारी? हे आपल्याला माहिती नाही, अशी कोटी करत संजय मोने यांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ म्हणाले, निवडणूक आयोगाच्या प्रभावाखाली येऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. पण आपल्या विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाचाच आधार घेतला. व्हिप म्हणून भरत गोगावले यांनी पाठवलेला आदेश दुसऱ्याच व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवरून पाठवला. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना तो मिळाल्याचे मान्य करता येणार नाही, असेही अध्यक्षांनी सांगितले. मग माझ्यापुढे दुसराच प्रश्न आहे... असे म्हणत ते गृहस्थ म्हणाले, जर व्हॉट्सॲप नंबर बरोबर असते तर उद्धव ठाकरे गटाच्या बाकी आमदारांनाही योग्य मेसेज गेले असते. मग ते देखील सुरतमार्गे गुवाहाटीला गेले असते का? जर त्यांचे नंबर बरोबर निघाले असते आणि ते देखील तिकडे गेले असते तर आज एवढा सगळा उद्योग करायची गरज उरली असती का...? त्यावर जोरदार हसून टाळ्या देत बाकीचे म्हणाले, चला या गोष्टीवर चहा मागवा...

चहा येईपर्यंत गप्पा थांबतील कशा? एक से बढकर एक असे सगळे इरसाल लोक कट्ट्यावर जमले होते. त्यातले एक जण स्वतःचा मुद्दा वकिली थाटात मांडू लागले, अहो, माझ्यापुढे एक प्रश्न आहे. आमच्या पक्षात फूट पडली आणि खरी शिवसेना आमचीच असे शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सांगितले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला दिले. मग याच शिंदे गटाचे प्रख्यात वकील हरीश साळवे यांनी विधिमंडळ पक्षात फूट पडलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयात कसे सांगितले..? हरीश साळवे खरे की निवडणूक आयोगाकडे फूट पडली हे सांगणारे खरे..?  या दोघांत कोण भारी हे शोधायला हवे का..? त्यावर दुसरा म्हणाला, त्यासोबतच अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे की मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांकडे जावे? याचाही सोक्षमोक्ष लावला पाहिजे. कोणाचे पद मोठे? काही कळायला मार्ग नाही. डोक्याचा पार भुगा होत चालला आहे... 

बराच वेळ ही चर्चा ऐकत बसलेले पांढऱ्या केसाचे एक गृहस्थ जवळ येत म्हणाले, बाबांनो मी तुमची चर्चा ऐकत आहे. तुम्ही ज्या विषयांवर चर्चा करत आहात ते प्रश्न आपल्यासाठी बिलकुल महत्त्वाचे नाहीत. तुमची ही निरर्थक चर्चा बाजूला ठेवा. तुम्ही अन्य महत्त्वाच्या विषयावर बोलायला हवे. तेव्हा निष्पाप चेहऱ्याचा तो माणूस म्हणाला, कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तरी सांगा आम्हाला... त्यावर ते गृहस्थ म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थकलेले आहेत. त्यांनी त्यांची सूत्रे कोणाकडे द्यायची? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा निवडणुकीला उभे राहायचे की नाही?  युक्रेन, रशिया युद्धात इंग्लंडने काय करायला हवे ? इराण, इराक या देशांनी कशा पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे? धर्माचा आधार घेऊन जगाच्या पाठीवर स्वतःचा नावलौकिक मिळवणारे देश कोणते आहेत? धर्माच्या आधारावर देश मोठा करता येत नाही, याचे धडे पाकिस्तान, अफगाणिस्तानसह इतर देशांना देण्यासाठी आपण काय करायला हवे? कधीतरी मध्येच अमेरिकन सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा इशारा आपण शिवाजी पार्कातून द्यायला हवा. त्यासाठी काय करायचे, यावर विचार मंथन झाले पाहिजे. बेरोजगारी, महागाई, आरोग्याच्या सुविधा नसणे, चांगल्या शाळा नाहीत, मुलांना कारकून बनवणारी शिक्षण पद्धती बदलणार की नाही? हे असे बिनकामाचे विषय त्या काँग्रेसवाल्यांना मांडू दिले पाहिजेत, असे मला वाटते. यावर आपण चर्चा केली पाहिजे. उगाच नको त्या गोष्टीत आपण वेळ का घालवायचा..?

जमलेल्या सगळ्यांनी या गृहस्थाकडे अत्यंत आदराने पाहिले. हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, आपण म्हणता ते बरोबर आहे. आपण शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरून अमेरिका, रशिया, युक्रेन यांना सतत इशारे दिलेच पाहिजेत. चला आता आपापल्या घरी जाऊ. सुनबाई आणि मुलगा ऑफिसला जायची वेळ झाली. नातवंडांना सांभाळायचे आहे. नेमके इशारे कसे द्यायचे? यावर आपण उद्या चर्चा करू... असे म्हणत सगळे आपापल्या घरी निघून गेले. ही चर्चा आपल्याला सांगणे मला अत्यंत महत्त्वाचे वाटले. म्हणून हे पत्र. बाकी आपण कसे आहात? तब्येतीची काळजी घ्या. आपल्याला लोकसभेसाठी शुभेच्छा...

    - आपलाच, बाबूराव

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकर