जनरेशन झेड बाजारहाट कसा करते, याची रंजक ‘सिक्रेट्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 07:20 IST2026-03-09T07:20:29+5:302026-03-09T07:20:49+5:30
भारतात निम्म्याच्या वर लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा लहान आहे आणि चौदा ते अठ्ठावीस वर्षांचे जेन-झी या बाजारपेठेसाठी महत्त्वाचा ग्राहकवर्ग आहेत.

जनरेशन झेड बाजारहाट कसा करते, याची रंजक ‘सिक्रेट्स’
राही श्रु. ग.
सीनिअर रिसर्च फेलो
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
स्विगी, झोमॅटो, मिंत्रा, ॲमेझॉन, ब्लिंकिट, झेप्टो… जेन झींचा बाजारहाट म्हटल्यावर मोबाइल ॲप्सवरून फटाफट ऑर्डर करणारी तरुण मुलंमुली डोळ्यासमोर येत असली तरी या ऑर्डर घरोघर पोचवणारे ‘डिलिव्हरी पार्टनर’सुद्धा बहुतेक वेळा जेन झीच आहेत. भारतात निम्म्याच्या वर लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा लहान आहे आणि त्यामुळे आज १४ ते २८ वर्षांचे असलेले जेन-झी हे या बाजारपेठेसाठी महत्त्वाचा ग्राहकवर्ग आहेत.
जगभरात लोकसंख्येच्या सर्व गटांच्या स्वभावाचा, मूल्यांचा आणि वागणुकीचा अभ्यास बाजारपेठ मोठ्या उत्साहाने सातत्याने करत असते. विशिष्ट वयोगटातल्या लोकांपर्यंत ग्राहक म्हणून कसं पोचायचं हे ठरवताना हा अभ्यास तत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने उपभोक्ते म्हणून जेन झी कसे आहेत याचा अभ्यास सतत होतो. जेन झीमधले सर्वांत लहान सदस्य अजून शाळेत असले तरी या पिढीतले सर्वांत मोठे सदस्य आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत आहेत.
एकीकडे मोठ्या प्रमाणातली बेरोजगारी, अस्थिर नोकऱ्या आणि गरिबीला तोंड देणारी ही पिढी असली तरी याच पिढीतला एक छोटा हिस्सा महागडे कपडे, टेक्नॉलॉजी आणि खाणंपिणं यांचा उपभोक्ता आहे. साधारणपणे खर्च करताना मालमत्ता, वस्तूंच्या मालकीपेक्षा ही पिढी ‘अनुभवां’ना अधिक प्राधान्य देते. प्रवास, पर्यटन, नाचगाण्याचे जलसे, थरारक खेळ, नवनवे खाद्यपदार्थ यावर खर्च करायला या पिढीला आवडतं. कर्जाचं ओझं ते शक्यतो टाळू पाहतात. पाश्चात्त्य जगात ‘जेन झी मालमत्ता खरेदी करायला तयार नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं आहे’, अशी तक्रार सुरू झालीय. गंमत म्हणजे पाश्चात्त्य जगात जेन-झीने दारू खरेदी करण्यात मोठी घट केल्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अर्थात यातल्या प्रत्येक बदलाला अनेक सामाजिक आर्थिक पदर असतात.
खरेदीच्या बाबतीत सोशल मीडिया हा जेन -झीच्या माहितीचा प्रमुख स्रोत आहे. मिळकत असलेले जेन-झी गुंतवणुकींबाबतचे निर्णय घेतानाही सोशल मीडिया आणि यू-ट्यूबचा सल्ला घेतात. जेन- झी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. ग्राहकांची मतं, बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांसोबत तुलना आणि तज्ज्ञांचे सल्ले विचारात घेऊन जेन- झी खरेदी करतात. आयुष्यातल्या इतर निर्णयांप्रमाणेच खरेदीच्या बाबतीतही आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ते आपल्यासोबत घेतात.
‘ओरिजनल’, खरं, अस्सल आणि नवं शोधण्याचा त्यांना ध्यास असतो. त्याचवेळी परंपरांचाही हात त्यांनी घट्ट धरून ठेवला आहे. आकर्षक दृश्यप्रतिमा त्यांना खेचून घेतात. त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या सामाजिक समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करायला ते तयार असतात.
वरवर विरोधाभासी वाटणारे असे हे जेन-झीचे ग्राहक म्हणून गुणधर्म आहेत. चंगळवादाला मोकळं रान असणाऱ्या जगात वाढणारे जेन-झी नवउदार जगातल्या भांडवली बाजारपेठेचे उपभोक्तेही आहेत आणि बळीही. बहुसंख्य जेन-झीवर त्यांच्या मोबाइलच्या स्क्रीनवरून अखंड रंगीबेरंगी जाहिरातींचा मारा तर होत असतो; पण त्याला तोंड द्यायला हातात पुरेसे पैसे नसतात. स्क्रीनवर दिसणारं मोहवणारं, भ्रमित करणारं जग आणि वास्तवातले अभाव यांचा भागाकार शोकात्म असतो. या विषम ओढाताणीमध्ये जेन-झी बाजारपेठेत उभे आहेत, तिला घडवत आहेत आणि स्वतः घडत-बिघडत आहेत.