हाॅटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा काही ‘हाॅटेल मॅनर्स’ इच्छा असो वा नसो; पाळावेच लागतात. जेवणाचे बिल भरल्यानंतर टिप देणे हा हाॅटेल मॅनर्सचाच एक भाग झाला आहे. कोणी बिलातील उरलेले सुटे पैसेच टिप म्हणून ठेवतं, तर कोणी त्या विशिष्ट हाॅटेलमधील उत्तम सेवेसाठी टिप देतात.
तेथील चवीला दाद म्हणून खुश होऊनही टिप दिली जाते. घेणाऱ्याला आनंद आणि देणाऱ्याला समाधान असा हा टिपचा प्रकार आहे; पण हीच टिप आश्चर्याचा धक्काही देऊ शकते. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळालेल्या टिपने फक्त त्या हाॅटेलमालकाला आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर जगभरातील लोकांना अवाक् केले आहे.
काही दिवसांपूर्वीची ही घटना. अमेरिकेतील मिशिगन येथील ‘मासन जार कॅफे’ येथे एकजण गेला. त्याला हवे ते पदार्थ त्याने मागवले. खाऊन झाल्यावर त्याच्यासमोर बिल आले ते ३२.४३ डाॅलर्सचे. म्हणजे साधारण २००० रुपयांचे. या बिलावर त्या व्यक्तीने टिप ठेवली ती मात्र १०,००० डाॅलर्सची. म्हणजे ८ लाख रुपयांची! खरं तर टिपची रक्कम पाहून संबंधित वेट्रेसही हादरून गेली होती. तिने ते बिल आणि टिप कॅफेच्या मॅनेजरकडे सुपुर्द केले. ही रक्कम पाहून कॅफे मॅनेजर टीम स्विनी यालाही प्रचंड धक्का बसला.
ग्राहकाने हे चुकून तर नाही ना केलं असं वाटून स्विनी त्या ग्राहकाच्या मागे धावला. ग्राहकाला आपली ओळख सार्वजनिक करायची नव्हती; पण स्विनीने त्याला गाठलंच आणि ‘एवढी मोठी टिप... हे चुकून तर नाही ना झालं?’ असं विचारलं. तेव्हा त्या व्यक्तीने ‘मार्क’ एवढीच आपली ओळख सांगितली. आपण हे चुकून वगैरे केलेलं नसून आपल्याला खरोखर एवढीच टिप द्यायची होती असं सांगितलं. आपला एक जवळचा मित्र गेला. त्याच्या अंत्यविधीसाठी म्हणून आपण येथे आलो. त्याची आठवण म्हणून आपण ही टिप दिल्याचं मार्क याने कॅफे मॅनेजरला सांगितलं.
मार्कच्या सूचनेनुसार ही टिप नंतर कॅफेमध्ये काम करणाऱ्या नऊजणांमध्ये विभागली गेली. प्रत्येकाच्या वाट्याला थोडेथोडके नव्हे तर १,११,००० रुपये आले. एखाद्या हाॅटेलला टिप म्हणून एवढे पैसे मिळणं ही अतिशय असाधारण बाब होती. एवढी टिप कमवायला आपल्या हाॅटेलला महिनोन्महिने लागले असते. असं ‘मासन जार कॅफे’मध्ये काम करणारी पेज मुलिक ही कर्मचारी सांगते. कॅफेला मिळालेल्या एवढ्या टिपमुळे जे पैसे मिळाले ते ती शिक्षणासाठी जे कर्ज काढलं होते, ते फेडण्यासाठी वापरणार आहे. या पैशांमुळे आपल्यावरील व्याजाचा ताण खूप कमी होईल, याचा मुलिक हिला आनंद आहे; पण जिला मार्ककडून ही टिप मिळाली, ती लिंसे बाॅइड मात्र दु:खी आहे.
बाॅइड सांगते की, हे टिप प्रकरण झाल्यानंतर आपल्याप्रती कॅफेमधील वातावरण बदललं. तिसऱ्याच दिवशी बाॅइडला ‘मेन्टल हेल्थ डे’चं कारण देऊन आज कॅफेमध्ये येऊ नको असं सांगितलं. रविवारी तिने मॅनेजरला उद्या कामावर येऊ का? विचारलं तेव्हा आजही येऊ नको, असा तिला निरोप दिला गेला.
तिसऱ्या दिवशी कॅफेचा काही निरोप नाही हे बघून तिने ‘तुम्हाला मला कामावरून काढायचं असेल तर सरळ तसं सांगा’, असं स्पष्ट सांगितलं. यानंतर मात्र बाॅइडला आता यापुढे कॅफेमध्ये येऊ नको, असं सांगण्यात आलं. लाखो रुपयांची टिप मिळालेली बाॅइड आनंदात असतानाच तिच्यावर नोकरी गमावण्याचा प्रसंग ओढवला. आपली काहीही चूक नसताना आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आलं, आपण अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक असूनही आपल्याबाबत असं का घडावं, असा प्रश्न बाॅइडला पडला आहे. काम करायला लागल्यापासून पंधरा वर्षांत पहिल्यांदा आपल्यावर असा नोकरी गमावण्याचा प्रसंग आल्याचं दु:ख बाॅइडला झालं आहे. कॅफेला जिच्याकरवी एवढी मोठी टिप मिळाली, तिच्यासोबत असं होणं हे बाॅइडसोबत अनेकांनाही अन्यायकारकच वाटतं.
ही तर तिच्याच चुकीची शिक्षा!
आपण आपला स्टाफ अतिशय सांभाळून ठेवतो. त्यांच्या सुखाचा, सोयीचा आणि आनंदाचा कायम विचार करतो. ज्या मुली शिकतात, त्यांना शिकण्याचा खर्च भागवता यावा म्हणून आपण आपल्या कॅफेमध्ये नोकरी देतो; पण बाॅइडच्या बाबतीत जे झालं ते तिच्या चुकीचा परिणाम आहे. तिने तिला मिळालेल्या पैशांवरचा कर भरला नाही आणि केवळ टिप देणाऱ्या मार्कची इच्छा होती की, टिपचे पैसे इतर कामगारांमध्ये वाटले जावेत म्हणून ते वाटले गेले. बाॅइडच्या चुकांमुळे तिची नोकरी गेल्याचं ॲबल मार्टिनेझ आणि जेमे कझिन्स या कॅफेमालकांचं म्हणणं आहे.