डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
सर्वप्रथम मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दहाव्या वेळी विराजमान झालेल्या नितीश कुमार यांचे अभिनंदन. विरोधी पक्षांनी सत्तासंपादनाची संधी गमावली. निवडणुकीच्या आधी ते मतचोरीचा आरोप करत होते आणि आजही करत आहेत. प्रत्येक महिलेच्या खात्यात १०,००० रुपये जमा करणे ही लाच असल्याचे त्यांचे म्हणणे. विरोधकांच्या आघाडीने बिहारमधील दीड कोटी कुटुंबांपैकी किमान एका व्यक्तीस नोकरी देण्याचे वचन दिले होतेच. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आणि दोन लाख रुपयांच्या व्याजमुक्त कर्जाचेही आश्वासन दिले. असली कर्जे कधी परत केली जात नसतात, हे अलाहिदा! विरोधकांची आघाडी ना लोकांपर्यंत पोहोचू शकली, ना विश्वास निर्माण करू शकली. तेजस्वी यादव यांनी आपल्या जातीतल्या लोकांना ज्या पद्धतीने तिकिटे वाटली, त्यामुळे इतर जाती नाराज झाल्या. मतचोरीच्या मुद्द्याचा तर काहीच परिणाम झाला नाही.
भाजपने व्यूहरचना विचारपूर्वक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सात वेळा बिहारमध्ये गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३६, तर आक्रमक नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३१ प्रचारसभा घेतल्या. इतर राज्यांतले ज्येष्ठ नेतेही बिहारमध्ये तळ ठोकून होते. नितीश कुमार तर अखंड फिरत होते. हवामान खराब होते. पाऊस येत होता, तरीही नितीश यांनी मोटारीतून प्रवास केला आणि ठरलेल्या सर्व प्रचारसभांमध्ये भाषण केले. याच्या अगदी उलट तेजस्वी यादव यांनी पावसामुळे सभा रद्द केल्या. कारण त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नव्हते. भाजप आणि संयुक्त जनता दलाने हा मुद्दा उचलून धरला. तेजस्वी हेलिकॉप्टरने जाणारे नेते आहेत; याउलट नितीश कुमार हे जमिनीवरून चालणारे मुख्यमंत्री आहेत असे ते वारंवार म्हणत राहिले.
मतदारांच्या विचारांवर निश्चितच या गोष्टींचा परिणाम झाला. नितीश दीर्घकाळापासून सत्तेत असल्यामुळे यावेळी मतदार बदल करू पाहतील असे तेजस्वी यांनी गृहीत धरले होते. या समजुतीने त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. १८ नोव्हेंबरला आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार अशी घोषणाही त्यांनी करून टाकली. अधिकाऱ्यांना धमकावणे सुरू केले. निवडणुकीनंतर एकेकाला ठिकाणावर आणले जाईल असेही ते म्हणू लागले. पक्षाचे बहुतेक उमेदवार अशाच प्रकारची भाषा बोलत होते. भोजपुरी सिनेमा उद्योगातले एक प्रसिद्ध अभिनेते खेसारी लाल यादव यांनी तर एका प्रचारसभेत असे म्हटले की, ते ब्रह्मदेवाची रेषासुद्धा पुसू शकतात.
तेजस्वी आक्रमक पवित्रा घेत राहतील याचा अंदाज असल्याने रालोआने अत्यंत हुशारीची चाल खेळली. समाजमाध्यमांवर लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराजची आठवण करून देणाऱ्या रील्सचा पूर आला. तेजस्वीचे सरकार आले तर गुंडांचा बोलबाला होईल याची आठवण मतदारांना करून देण्याचा हेतू त्यामागे होता. इकडे राजदच्या प्रचारसभांनी या आगीत तेल ओतण्याचेच काम केले. आपण तरुण नेते असून, बिहारला नवी दिशा देणार आहोत या भ्रमात तेजस्वी यादव राहिले. परंतु, प्रशांत किशोर यांनी तर या युवा नेत्याचे वर्णन 'नववी नापास नेता' असे करत त्याला आधीच आडवे केले होते.
काँग्रेसबद्दल तर काय बोलावे? या पक्षाने ६१ जागा लढवल्या आणि सहा जागांवर त्यांचा खेळ आटोपला. मागच्या निवडणुकीत काँग्रेसकडे १९ जागा होत्या. काँग्रेस गोंधळलेला पक्ष झाला आहे हे सोळा आणे सत्य होय. बिहारमध्ये राहुल यांच्या प्रचारसभांचा परिणाम का झाला नाही यावर विचार होणार आहे काय? काँग्रेसकडे काही रणनीतीच नव्हती. अर्थात, लोकसभा किंवा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ कमी असले तरी ते विरोधाचा सशक्त आवाज नक्कीच बनू शकतात. कोल्लमचे खासदार प्रेमचंद्रन यांचे उदाहरण घ्या. ते रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एकमेव खासदार आहेत, पण ते अत्यंत प्रभावी आहेत. प्रत्येकजण त्यांचा आदर करतो.
जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार. दुसऱ्यांना निवडणूक जिंकून देणारा स्वतः जिंकू शकणार नाही, असे कसे होईल? प्रशांत किशोर आपली किमया दाखवतील. त्यांना सत्ता मिळेल आणि ते बिहारला नव्या दिशेने घेऊन जातील असे बोलले जात होते. 'निवडणुकीत आपल्याला आपल्या पक्षाचे काय भविष्य दिसते?'- असे विचारले असता ते म्हणाले होते, 'एक तर आकाशात किंवा जमिनीवर!'- तेही एकप्रकारे अहंकाराने फणफणले होते. त्यामुळे मग मतदारांनी त्यांना म्हटले असावे की प्रशांतबाबू, यावेळी जमिनीवरच राहा. प्रशांत किशोर यांनी विरोधकांची मते खाऊन भाजपला हात दिला, हे मात्र खरे!लालू परिवाराला लागली वाळवी
२०१९ चा सप्टेंबर महिना. लालूप्रसाद यांची मोठी सून ऐश्वर्या कुटुंबात आपल्याला नीट वागणूक मिळत नाही म्हणून घरातून रडत रडत बाहेर पडली होती. तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या सुरू आहे. याचवर्षी मे महिन्यात लालूप्रसाद यांनी तेजप्रतापला पक्षातूनच नव्हे तर घरातूनही बाहेर काढले. लालूंना किडनी देणारी त्यांची मुलगी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घरातून रडत रडत बाहेर पडली. 'आता आपला पक्षही राहिला नाही आणि कुटुंबही', असे सांगत ती सिंगापूरला निघून गेली. लालूप्रसाद यांच्या घराला खरोखरच वाळवी लागली आहे का? - या प्रश्नाचे उत्तर आता येणारा काळच देईल.
Web Summary : Nitish Kumar wins again as opposition arrogance and weak strategy faltered. Tejashwi Yadav's overconfidence, Congress's disarray, and Prashant Kishor's failure contributed to NDA's victory. Lalu family faces internal strife.
Web Summary : नीतीश कुमार फिर जीते, विपक्ष का अहंकार और कमजोर रणनीति विफल रही। तेजस्वी यादव का आत्मविश्वास, कांग्रेस की अराजकता और प्रशांत किशोर की विफलता ने एनडीए की जीत में योगदान दिया। लालू परिवार आंतरिक कलह का सामना कर रहा है।