‘धान्याची आयात म्हणजे बेकारी आयात करणे आहे!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:09 IST2025-08-08T09:08:44+5:302025-08-08T09:09:27+5:30

‘हवामान बदल आणि बाजारभावाचे तडाखे सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक व वैज्ञानिक पाठबळ लाभत नाही’, याची स्वामीनाथन यांना खंत होती.

Importing grain means importing unemployment | ‘धान्याची आयात म्हणजे बेकारी आयात करणे आहे!’

‘धान्याची आयात म्हणजे बेकारी आयात करणे आहे!’

अतुल देऊळगावकर, कृषी अर्थशास्त्र आणि पर्यावरणाचे  ज्येष्ठ अभ्यासक -

ऐंशीचे दशक संपता संपता जगभरात  ‘हवामान बदल’ ही संकल्पना नुकतीच दाखल झाली होती. त्याचे गांभीर्य वेळीच जाणून प्रो. एम. एस. स्वामीनाथन यांनी ‘निसर्गाला अपाय न करता सातत्याने टिकाऊ उत्पादनवाढ देऊ शकणाऱ्या ‘सदाहरित क्रांती’ची निकड सांगितली. त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९८८ साली चेन्नई येथे ‘स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना वैज्ञानिक ज्ञान, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी ही संस्था झटत आहे. यातून बियाणे ग्राम, जैव ग्राम व माहिती ग्राम यांची निर्मिती केली. त्याला परस्परावलंबनाच्या कृतीची जोड दिली. त्यामुळे माती, पाणी आणि जैवविविधतेचे संतुलन राखणे.. प्रत्येक भागाचे हवामान, तेथील मातीच्या प्रकार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकपद्धती ठरवणे.. अशा कामात अनेक गावे तयार होत गेली.
‘स्वामीनाथन फाउंडेशन’ने १९९६ मध्ये तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात ‘खारफुटी बचाव’ योजना हाती घेतली होती. २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या राक्षसी त्सुनामीमध्ये लाखो बळी गेले. मात्र पिच्छावरम व मुथुपेठ या गावांमधील खारफुटी आणि माहिती ग्रामातील इशारा यंत्रणेमुळे ५,००० लोकांचा जीव आणि त्यांची मालमत्ता वाचली. यावर जगभरातील प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत पडल्यामुळे या गावांचे वेगळेपण जगापुढे आले.

हवामान बदलामुळे किनारपट्टी भागात शेतांमध्ये खारे पाणी घुसून तांदळाची हानी होऊ लागली. तेव्हा ‘स्वामीनाथन फाउंडेशन’ने खारफुटीचा जनुक काढून तांदळामध्ये घालण्यात यश मिळवले आणि खाऱ्या पाण्यातही तगून राहील, असा तांदूळ तयार केला आहे. स्वामीनाथन म्हणत, ‘जेनेटेकली मॉडिफाइड बियाणे शेतकरीसुद्धा तयार करू शकतात. त्यात अगम्य काहीच नाही.’ हे संशोधन खासगी कंपन्यांच्या हाती पडून त्याचा केवळ त्यांच्या फायद्यासाठी वापर होऊ नये, याकरिता त्यावेळी स्वामीनाथन यांनी संरक्षित स्वामित्व हक्क घेतले. ‘स्वामीनाथन फाउंडेशन’ने ते स्वामित्व शेतकऱ्यांसाठी खुले केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या, तेव्हा आरोग्यावरील खर्च कमी करण्यासाठी स्वामीनाथन यांनी अ, ब, क व ड आदी जीवनसत्त्वे, लोह व इतर मूलद्रव्ये मिळू शकतील अशी पोषण पिके घेण्याचा आग्रह धरला. त्यातून शेतात घरापुरते शेवगा, राजगिरा, काकडी व रताळे आदी पिके घेण्याचे प्रमाण वाढत गेले. सामूहिक शेतीचे प्रयोग वाढू लागले.

मागील ३७ वर्षांत ‘स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’ने ८ लाख गरिबांपर्यंत पोहोचून २५,००० हेक्टर जमिनीचा कायापालट केला. ४,००० पोषण उद्यानांची निर्मिती केली. शेतकरी आत्महत्यांचे केंद्र झालेल्या वर्धा जिल्ह्यात ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेजेस’ प्रकल्प चालवला होता. त्यात पाणी व्यवस्थापनासाठी शेततळे, समतल चर व भूमिगत जलभरण तंत्र यांचे प्रकल्प हाती घेतले. तांदूळ, बाजरी व डाळी यांच्या उष्णता व दुष्काळाचा ताण सहन करू शकणाऱ्या स्थानिक जातींची लागवड सुरू केली. महिला बचतगटांना हवामान व्यवस्थापन शिकवले. त्यासाठी मोबाइल ॲप्स तयार केले. 

स्वामीनाथन यांनी ‘शेती व गरिबांच्या उपयोगी येते तेच खरे विज्ञान !’ ही उक्ती अनेकवेळा वास्तवात आणून दाखवली. त्यांच्या संकल्पनेतून संगणक व माहिती तज्ज्ञांनी ‘कोळी मित्र मोबाइल’ हे जीवनरक्षक मोबाइल उपकरण तयार झाले आहे. त्यावर, पाऊस, तापमान, भरती-ओहोटीच्या वेळा व चक्रीवादळाचा अंदाज समजतो. नावाड्यांना नावेचे मार्गक्रमण समजते. पाण्याची खोली, खडक अथवा बुडालेली नाव याची माहिती मिळते. आणीबाणीच्या प्रसंगी हेल्पलाइनशी संपर्क होऊ शकतो. तामिळ, तेलुगू व इंग्रजी भाषेत चालणारा हा बहुगुणी मोबाइल २,५०० खेड्यांमधील कोळ्यांचा खरा साथी झाला आहे. 

भारतातील अन्नधान्य आयात ही २०२१ पासून दोन लाख कोटींच्या वर गेली आहे.  ‘हवामान बदल आणि बाजारभावाचे तडाखे सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक व वैज्ञानिक कुठल्याही प्रकारचे पाठबळ लाभत नाही.’ याची स्वामीनाथन यांना खंत होती. त्यांनी, शेतकरी आयोगाच्या अहवालातून ही अवस्था बदलण्यासाठीचा कृती आराखडा मांडला होता. त्याची अवस्था आपण पाहत आहोत. त्यांनी वेळोवेळी सांगून ठेवले आहे, ‘धान्याची आयात म्हणजे देशाच्या शेतीचे कंत्राट बाहेरच्या देशांना देणे, बेकारी आयात करणे आणि धान्य सुरक्षितता सार्वभौमत्व गहाण टाकणे आहे.’      (उत्तरार्ध)
    atul.deulgaonkar@gmail.com
 

Web Title: Importing grain means importing unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.