मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष हा अक्षम्य अपराध !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:29 AM2021-12-03T06:29:21+5:302021-12-03T06:30:23+5:30

94th Marathi Sahitya Sammelan: नाशिक येथे आजपासून सुरू होत असलेल्या ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. Jayant Narlikar यांच्या जीवनध्यासाचे सूत्र...

Ignoring basic research is an unforgivable crime! Marathi Sahitya Sammelan, Jayant Narlikar | मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष हा अक्षम्य अपराध !

मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष हा अक्षम्य अपराध !

Next

- डॉ. जयंत नारळीकर
(ख्यातनाम वैज्ञानिक, लेखक)

भारतासारख्या खंडप्राय देशात कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीचं, तंत्रज्ञानासह विज्ञानाचं महत्त्व फार मोठं आहे. देश इतका मोठा तर परस्परांना समजून घेणं, जाणणं, परस्परांच्या संस्कृती समजून घेऊन परस्पर आदानप्रदान वाढणं यासाठी कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी यांचं महत्त्व निर्विवाद मोठं आहे. देशाला एका सूत्रात बांधणं हे सारं नव्या तंत्रज्ञानाच्या वापराणं शक्य आहे. एक साधं उदाहरण घ्या.  आपला अंतराळ कार्यक्रम अवकाश उत्सुकतेतून सुरू झाला; पण सौरऊर्जा ते बांधकाम ते औषधं आणि वैद्यकीय मदत यापासून जगण्याच्या अनेक टप्प्यांत अंतराळ विज्ञानानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचं ॲप्लिकेशन शक्य झालं आहे. विकसित होऊ पाहणारा, भविष्याकडं उमेदीनं पाहणारा कुठलाही समाज मूलभूत संशोधनाकडं दुर्लक्ष करूच शकत नाही, ते त्यांना परवडणारच नाही.

 शुद्ध संशोधन आणि विज्ञान संशोधन हा कुठल्याही तार्किक गोष्टींचा पाया असतो. त्या पायावर तंत्रज्ञान आणि त्यातून विकसित गोष्टी उभ्या राहतात. मात्र, मूलभूत संशोधनाकडंच दुर्लक्ष झालं, तर नुसता डोलारा किती काळ टिकणार? घराचा पाया फार मजबूत आहे, असं कौतुक कुणी करत नसलं तरी पायाच मजबूत नसेल, तर ते घर कितीही देखणं असलं तरी किती काळ टिकेल? तेच देशाच्या संदर्भातही खरं आहे, मूलभूत विज्ञान संशोधनाकडं दुर्लक्ष करणं म्हणजे पायाच कच्चा ठेवण्यासारखं आहे. सुदैवानं भारत हा अशा काही विकसित देशांपैकी एक आहे, ज्यांच्याकडं विज्ञान संशोधनाच्या पायाभूत सुविधा, संस्था विकसित झालेल्या आहेत. त्या तशा विकसित व्हाव्यात म्हणून देश स्वतंत्र होताना आपल्या नेत्यांनी दूरदृष्टीनं त्यांची रचना केली; पण ते आणि तेवढंच पुरेसं नाही. विज्ञान संशोधनासाठी आपण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी जो पैसा खर्च करतो त्याची टक्केवारी सतत काही काळ घसरत चालली आहे. त्याउलट आपल्या शेजारील काही राष्ट्रांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी देण्यात येणारा निधी सलग वाढवत नेलेला दिसतो.
आणखी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या पुढ्यात उभा आहे : उद्यासाठी आपल्याकडे शास्त्रज्ञ कुठं आहेत?

नोबेल पुरस्कारप्राप्त पाकिस्तानी शास्त्रज्ञ अब्दुस सलाम एका लेखात म्हणतात, ज्या काळात आपल्याकडं ताजमहाल बांधण्यात आला, त्याच काळात इंग्लंडमधलं सेंट पॉल कॅथेड्रलही बांधलं गेलं. या दोन्ही वास्तू म्हणजे वास्तुशास्त्राचा चमत्कार आहेत; पण तेवढं एकच बांधून ब्रिटिश किंवा युरोपियन थांबले नाहीत, त्याच काळात त्यांच्याकडं आयझॅक न्यूटन होता, बाकीचे अनेक शास्त्रज्ञ होते. युरोपातल्या अनेक श्रीमंतांनी विज्ञान संशोधकांना, अभ्यासकांना मदत केली. कारण हे लोक काहीतरी विलक्षण घडवत आहेत यावर त्यांचा विश्वास होता. आपल्याकडं त्याकाळी अनेक श्रीमंत राजा, महाराजा, नबाब होते. त्यांनी साहित्य, संगीत, कलेला प्रोत्साहनही दिलं पण विज्ञानाला? ते विज्ञानाच्या, संशोधनाच्या पाठीशी उभे राहिले असल्याचा तपशील नाही. जे युरोपात घडलं, ते आपल्याकडं का घडू नये, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रिटिशांनी आपल्यावर पारतंत्र्य लादलं, याचं एक कारण ब्रिटिशांकडं त्याकाळीही आपल्यापेक्षा जास्त सरस आणि विकसित तंत्रज्ञान होतं, त्यामुळं ते वरचढ ठरलं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडं दुर्लक्ष करणं, त्यात गुणवत्तेसाठी आग्रह न धरणं याची किंमत आपण आजवर इतिहासात मोजली आहे, ती अशी! मला आठवतं माझ्या पिढीत आम्ही अनेक विद्यार्थी विज्ञान शिक्षणाकडं अत्यंत उत्सुकतेनं पाहत असू. या विषयात उच्चशिक्षण घ्यावं, असं त्याकाळी अनेकांना वाटे. अनेक जण परिस्थितीअभावी शिकू शकले नाहीत, अशी हुरहुरही सांगतात. आज तसं चित्र आहे का?

उच्चशिक्षण देणाऱ्या, संशोधन करणाऱ्या अनेक संस्था सांगतात की, त्यांना उत्तम विद्यार्थीच मिळत नाहीत. असं का? उत्तम गुणवत्ता असलेले विद्यार्थी मूलभूत संशोधनाकडं का वळत नाहीत? उच्चशिक्षणात, मूलभूत संशोधनात केलेली गुंतवणूक वाया जात नाही, त्याची फळं मिळतात. त्यामुळं तरुण मुलं विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनाकडं आकर्षित होणं, त्यांना त्यासाठी बळ मिळणं आणि त्यांच्याकडं गुणवत्तेचा आग्रह धरणं हे तिन्ही आवश्यक आहे, तरच उद्याचे शास्त्रज्ञ घडतील आणि देशाला अपेक्षित प्रगतीची वाट दिसेल...
((प्रसारभारतीच्या ‘सरदार पटेल मेमोरिअल लेक्चर’ मालिकेत डॉ. जयंत नारळीकर यांनी केलेल्या भाषणाचा संपादित  सारांश.))

Web Title: Ignoring basic research is an unforgivable crime! Marathi Sahitya Sammelan, Jayant Narlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app