आपापल्या वाटेने जायचे तर...

By Admin | Updated: August 13, 2016 05:42 IST2016-08-13T05:42:58+5:302016-08-13T05:42:58+5:30

एखादे दांपत्य परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी न्यायालयासमोर येत असेल तर त्यांच्या घटस्फोटाचे कारण समजून घेणे हे न्यायालयाचे काम नाही, तो त्या पतीपत्नीने त्यांच्या मर्जीने

If you want to go by your way ... | आपापल्या वाटेने जायचे तर...

आपापल्या वाटेने जायचे तर...

एखादे दांपत्य परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी न्यायालयासमोर येत असेल तर त्यांच्या घटस्फोटाचे कारण समजून घेणे हे न्यायालयाचे काम नाही, तो त्या पतीपत्नीने त्यांच्या मर्जीने घेतलेला निर्णय आहे असे समजले जावे, हे चेन्नईच्या उच्च न्यायालयाचे मत पारंपरिक विचार करणाऱ्यांना पचविणे जड जाणार असले तरी विवाह ही न तुटणारी बेडी असल्यामुळे इच्छा नसतानाही तीत आयुष्यभर अडकून राहावे लागणाऱ्या अनेकांना त्यामुळे समाधान मिळण्याची शक्यता आहे. आपले का पटत नाही वा आपण एकमेकासोबत का राहू शकत नाही याची कारणे न्यायासनासमोर उघड करणे पती व पत्नीलाही अनेकदा अवघड ठरते. शारीरिक, मानसिक वा भावनिक मेळ नसणारी अनेक कुटुंबे या अडचणीमुळे स्वत:ची कुचंबणा करून घेत सारे आयुष्य एकत्र राहातात. वयात आले असल्याने व नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त झाला असल्याने त्यांच्यातील प्रत्येकाला आपले जीवन मनाजोगे व स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क असतो. तरीही सामाजिक बंधने, परंपरांचा पगडा आणि लोक (?) काय म्हणतील याचा भयगंड यासारख्या कारणांमुळे आपल्याच व्यक्तिस्वातंत्र्याला मूठमाती देऊन रडत-फडत आणि कण्हत-कुथत एकत्र राहणारी अनेक कुटुंबे आपल्या साऱ्यांच्या माहितीतलीही असतात. पाश्चात्त्य देशात घटस्फोट हा बातमी वा चर्चेचाही विषय होत नाही. आपल्याकडे मात्र ती वर्षानुवर्षे चघळण्याची बाब होते. इतरांच्या संसारात वा संसारावर नको तेवढे वा जास्तीचे लक्ष घालण्याच्या आपल्या पारंपरिक मानसिकतेचा हा परिणाम आहे. मोठी शहरे व सुशिक्षितांचे वर्ग यात हे प्रमाण कमी असले तरी ‘पातिव्रत्य’ वा ‘एकपत्नीव्रत’ यासारख्या ‘पवित्र’ ‘बंधनां’ना समाजातील अभिजन वर्गात अजूनही मोठे वजन व बळकटी आहे. वैवाहिक जीवनातले जुळणे या एवढा मोठा आनंदाचा भाग दुसरा नाही. मात्र तसे न जुळणे या एवढे आयुष्यातले दु:खही दुसरे नाही. नकोशा झालेल्या पुरुषासोबत वा स्त्रीसोबत आयुष्य काढावे लागणे ही शिक्षा ज्यांच्या वाट्याला आली त्यांची दु:खे सहानुभूतीने ऐकावी अशी असतात. वर्षानुवर्षेच नव्हे तर दशकानुदशके परस्परांशी न बोलणारी व एकमेकांवर रोष धरणारी, कायमचे दूर राहावे लागण्याची सक्ती वाट्याला आलेली किंवा दीर्घकालीन सहवासाचा नुसताच कंटाळा आलेली असंख्य कुटुंबे आपण पाहिली असतात. एकत्र राहिल्याने आत्मीयता वाढते हाही एक भ्रम आहे. भांडणेही एकत्र राहिल्यानेच होत असतात. परस्परांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेण्याएवढे सौैजन्य व तेवढी प्रेमाची भूक असलेली माणसे समाजात नसतात असे नाही. त्यांच्याबाबतचा आदर व विचार तसाच राखला जाणे गरजेचेही आहे. मात्र ज्यांच्या वाट्याला अशी समजूतदार मनोवृत्ती येत नाही त्यांचा वेगळा विचारही आवश्यक ठरतो. लग्नातल्या सप्तपदीतच एकत्र चाललेली आणि नंतरचे जगणे समांतर वाटांवरून चालणारी माणसेही समाजात असतात. दोघांचे चालणे एकत्र सुरू झाले तरी त्यातला एखादा थकून वा संतुष्ट होऊन कधीतरी थांबतो. दुसऱ्याचे चालणे मात्र तेवढेच आणि तसेच वेगवान राहिलेले असते. प्रत्येकाला आपल्या जोडीदारासाठी थांबणे जमणारेही नसते आणि अनेकांचा तो स्वभावही नसतो. त्यातून रुसवे, कांगावे आणि धुसफूस सुरू होते. ती झाली नाही तर एक कुढेपण येते. सारे आयुष्य असे कुढत जगण्यापेक्षा ‘सांगता न येणारी’ कारणे सांगितल्यावाचून या बेडीतून सुटका होत असेल तर ती व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेने जाणारी आणखी एक वाट ठरते, असे समजणे गरजेचे आहे. स्कॅन्डेनेव्हियन देशात ५८ टक्क्यांएवढे पुरुष व स्त्रिया लग्नावाचून राहातात. एकेकट्याने मुले वाढवितात आणि आपले स्वातंत्र्य व समाधान कुणा एकावर सोपवून अडकण्यापेक्षा एकटेपण पसंत करतात. अमेरिकेत घटस्फोटाचे प्रमाण लग्नानंतरच्या पहिल्या पाच वर्षात २५ टक्क्यांएवढे तर पुढे वाढत जाऊन ते ६० टक्क्यांपर्यंत जाते. कुटुंबव्यवस्था टिकविण्याचे प्रयत्न धर्मसंस्था आणि राजकारण या दोहोंकडूनही तेथे होत असले तरी घटस्फोटांच्या व स्वतंत्रपणे जगण्याच्या तेथील माणसांच्या प्रवृत्तीत फारसा बदल झालेला दिसत नाही. त्याच वेळी एकत्र राहिलेली आनंदी कुटुंबे आणि विभक्त होऊनही तेवढीच आनंदी राहिलेली माणसे असे त्याही समाजाचे स्वरुप राहिले आहे. तशीही जगभरच्या माणसांची व्यक्तिमत्त्वे व्यक्तिस्वातंत्र्याकडून स्वयंभूपणाकडे वाटचाल करू लागली आहेत. काहींना ते समाजाचे विघटन वाटत असले तर इतरांच्या मते ती स्वातंत्र्याच्या दिशेने होत असलेली अटळ वाटचाल आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाला कुटुंबसंस्थेवरील संकट न मानता व्यक्तिस्वातंत्र्याला मोकळी झालेली आणखी एक वाट म्हणून पाहणेच इष्ट ठरणार आहे. या निर्णयामुळे आपल्या समाजाचे लगेच विघटन होईल असे नाही. समाज अखेरीस त्यांच्या प्रकृतीनुसारच बदलत वा तसेच राहत असतात.

Web Title: If you want to go by your way ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.