२०२४ मध्ये त्रिशंकू Lok Sabha अस्तित्वात आल्यास पंतप्रधानपदाची माळ Uddhav Thackeray यांच्या गळ्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:05 AM2021-10-14T11:05:30+5:302021-10-14T11:18:54+5:30

Indian Politics Update: कट्टर हिंदुत्व (Hindutwa) सांभाळून, फार गचके न बसू देता, धर्मनिरपेक्ष आघाडीचे सरकार ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रात चालवले आहे. हा अनुभव त्यांच्या कामी येऊ शकतो!

If a hung Lok Sabha comes into existence in 2024, will Uddhav Thackeray be the Prime Minister? | २०२४ मध्ये त्रिशंकू Lok Sabha अस्तित्वात आल्यास पंतप्रधानपदाची माळ Uddhav Thackeray यांच्या गळ्यात?

२०२४ मध्ये त्रिशंकू Lok Sabha अस्तित्वात आल्यास पंतप्रधानपदाची माळ Uddhav Thackeray यांच्या गळ्यात?

Next

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली) 

लोकसभा २०२४ चा खेळ सुरू झाला आहे. लोकसभेचे दान त्रिशंकू पडले, तर पुढे काय (आणि मुख्य म्हणजे कोण?) अशा आशयाच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. अगदी परवा परवापर्यंत पंतप्रधानपदाचा विषय निघाला की महाराष्ट्रातून केवळ शरद पवार हेच नाव घेतले जात  असे. पण माहीतगार सूत्रे सांगतात की, एरवी मागे राहणारे उद्धव ठाकरे हे एक नाव आता अचानक पुढे येऊ शकते. सत्तेवरच्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी शिवसेनेचा चेहरा-मोहरा पूर्ण बदलला आहे. चालकाच्या खुर्चीत बसून त्यांनी आघाडी सरकार कसे चालवायचे हे दाखवून दिले आहे. भाजपचा झंझावात अंगावर घ्यायला कोणीच पुढे येत नसताना उद्धव ठाकरे यांच्या  कार्यशैलीने आशा निर्माण केली, हे तर नक्कीच! विविध घटनांना त्यांनी दिलेले प्रतिसाद पाहता ते उत्तम व्यवस्थापक आहेत, हे सिद्ध होते. बोलायचे तेव्हा काय ते स्पष्ट बोलतात आणि केव्हा बोलायचे नाही, हेही त्यांना कळते. अत्यंत कौशल्याने ते शरद पवार आणि नाना पटोले या दोन महत्त्वाकांक्षी नेत्यांना सांभाळत आहेत. 
राजकीय पंडितांचे म्हणणे जर त्रिशंकू लोकसभा आली तर उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. कट्टर हिंदुत्व सांभाळून, फार गचके न बसू देता, धर्मनिरपेक्ष सरकार त्यांनी महाराष्ट्रात चालवले आहे. शिवाय, ठाकरे संघाच्या जवळ आहेत, अयोध्येला जातात, मोदींना भेटतात तरीही धर्मनिरपेक्ष मित्रांना खुश ठेवतात.
शिवाय, मराठा अस्मितेचा अभिमानही बाळगतात तो वेगळाच! अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसा करणारा पक्ष ही शिवसेनेची प्रतिमाही त्यांनी बदलली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे  भारताचे पहिले धर्मनिरपेक्ष हिंदू पंतप्रधान होऊ शकतात. हिंदू दैवताचे नाव मिरवणाऱ्या पक्षाविरुद्ध अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण हा मुद्दा वापरणे भाजपलाही कठीण जाईल. मुंबईतल्या अनेक उद्योग समूहांच्या मनास ठाकरे भावलेले आहेत. अर्थात तेच समूह दिल्लीत मोदींना कुर्निसात करतात आणि मुंबईत ठाकरेंना सांभाळतात, हेही आहेच!
ममतांचा पन्नासचा खेळ
 २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि त्या आधीच्या विधानसभा या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष स्वत:च्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न कसोशीने करत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी हा पक्ष ताकद एकवटताना दिसतो.  उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर हे आपले बालेकिल्ले राखण्याचा यत्न भाजप करणार हे उघड आहे. या धामधुमीत पंजाबकडे सगळ्यांचे बारीक लक्ष आहे. छुपा रुस्तुम ‘आप’ तेथे चमत्कार दाखवील, असे सध्या राजधानीतल्या वर्तुळात बोलले जाते. सपा, बसपासारख्या प्रादेशिक पक्षांसाठीही या निवडणुकांचे महत्त्व मोठे आहे. उत्तर प्रदेशात गेली सात वर्षे ते भाजपला झेलत आहेत.
-  मात्र, पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांच्या अधिपतींसाठी या विधानसभा निवडणुका फार महत्त्वाच्या नाहीत. पूर्वेकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेसला झटका बसण्याची वाट पाहत आहेत. उत्तर भारताच्या राजकारणात आपल्याला महत्त्व नाही, हे त्या पुरेपूर ओळखून आहेत.
काँग्रेसशी त्यांचा मधुचंद्र संपल्यात जमा असल्याने त्यांचा एकल प्रवास आता सुरू झाला, असे म्हणता येऊ शकते. निवडणूक डावपेचकार प्रशांत किशोर ममतांचे सल्लागार आहेत.  सगळे अपेक्षेनुसार घडले तर ममता  लोकसभेच्या किमान ५० जागा मिळवण्यावर भर देतील. तेवढ्या जागा समजा मिळाल्याच तर बिगर भाजप सरकारनिर्मितीत त्यांना आपोआपच महत्त्व प्राप्त होईल. सध्यातरी ममतांची चलती लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालपुरतीच असल्याने हे लक्ष्य तसे खूप मोठे आहे.
मोदी यांनी २०१४ आणि २०१९ साली केले तसे काहीतरी करण्याचे ममतांच्या मनात असावे, असे सध्यातरी दिसते. किंबहुना त्या बंगाली मतदारांना सांगू शकतात, ‘मला मत द्या, मी पहिली बंगाली पंतप्रधान होऊ शकते.’ 
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता साधारण ३४ ते ३७ जागा जिंकू शकतात. पण आणखी १४-१५ जिंकणे हे त्यांच्यासाठी खरे आव्हान असेल. 
ईशान्य भारतात लोकसभेच्या २२ जागा आहेत. तेथे काँग्रेस पक्षाची जागा घेण्याचा प्रयत्न ममता निश्चित करतील. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुश्मित देव यांना त्यांनी आधीच आपल्या पक्षात आणले आहे. आसाम आणि त्रिपुरातील मतदारांवर प्रभाव टाकता यावा म्हणून देव यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्येही काही जागा मिळतात का, हे त्या पाहतीलच. ज्या राज्यात बंगाली मतदार लक्षणीय संख्येने आहेत, तेथे अन्य पक्षांशी त्या साटेलोटेही करू शकतात
स्टालिन यांचा वाढता आलेख
के कामराज आणि जे जयललिता या दक्षिणेतील दोन मातब्बर नेत्यांना दिल्लीत सत्ता हस्तगत करता आली नाही; पण आता एम. के. स्टालिन नशीब अजमावून पाहण्याच्या विचारात आहेत. मात्र, त्यांना अजिबात घाई नाही. सावकाश पाया भक्कम करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. २०२४ साली लोकसभा त्रिशंकू समोर आली तरी ते स्वस्थ राहतील. ममतांप्रमाणेच स्टालिन यांनाही प्रशांत किशोर हेच सल्ला देत आहेत. ममता यांनी ५० जागांचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. स्टालिन यांच्या डोक्यातही तेच आहे. थेट राजकारणावर न बोलता संघराज्य ढाच्यासारखे प्रश्न उपस्थित करून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचे त्यांच्या मनात आहे. कळीच्या प्रश्नावर बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना संघटित करण्याचाही त्यांचा प्रयत्न दिसतो..

Web Title: If a hung Lok Sabha comes into existence in 2024, will Uddhav Thackeray be the Prime Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app