शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
4
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
5
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
6
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
7
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
8
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
9
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
13
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
14
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
15
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
16
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
17
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
18
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
19
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
20
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!

...तर असे आवाहन निरर्थकच!

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

नव्या वर्षांत तरी संसद चालू द्या आणि विकासाच्या कामाच्या अंमलबजावणीत अडथळा आणू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी काँगे्रसला

नव्या वर्षांत तरी संसद चालू द्या आणि विकासाच्या कामाच्या अंमलबजावणीत अडथळा आणू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी काँगे्रसला उद्देशून केले आहे. गेल्या वर्षभरातील संसदीय अधिवेशनांचा जो बट्ट्याबोळ झाला, तो बघता मोदी यांच्या या आवाहनाशी सर्वसामान्य भारतीय सहमत होतील. मात्र मोदी यांचे हे आवाहन म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी ठरेल, कारण ‘टाळी एका हाताने वाजत नाही’, या म्हणीप्रमाणे संसदीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य जसे आवश्यक असते, तसेच सत्ताधारी पक्षाकडे सामंजस्याच्या दृष्टिकोनाचीही गरज असते. गेल्या वर्षभरात या दोन्हींचा पूर्ण अभाव दिसून आला आहे. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील राजकारणाला गेल्या काही वर्षांत आलेले अटीतटीचे स्वरूप. या अटीतटीस भर आला, २०१२ मधील ‘भ्रष्टाचारविरोधी आंदोलना’पासून व त्याची पराकोटी झाली २०१४च्या निवडणुकीत. गेल्या वर्षभरात संसदीय अधिवेशनांचा जो बट्ट्याबोळ झाला, तो आधीच्या अशा घटनांचाच परिपाक होता, हे पंतप्रधानांच्या आवाहनाचा विचार करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. २०१३ नंतरच्या काळात भाजपाने संसदेच्या अधिवेशनात गदारोळ उडवून देण्यास सुरूवात केली. आज मोदी जसे विरोधी पक्षांना आवाहन करीत आहेत, तसेच त्यावेळचे सरकार भाजपाला सांगत होते. पण ‘संसदेचे कामकाज अडवून धरणे हा संसदीय रणनीतीचा अविभाज्य भाग आहे’, अशी ‘सैद्धांतिक’ मांडणी सध्याचे अर्थमंत्री व त्यावेळचे भाजपाचे राज्यसभेतील नेते अरूण जेटली यांनी जाहीररीत्या केली होती. त्यामुळे आज जी ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी), ‘प्रत्यक्ष कर संहिता’ (डीटीसी) वगैरे विधेयके प्रलंबित आहेत, ती त्यावेळीच मांडली गेली होती आणि भाजपाने संसद चालू न दिल्याने ती संमत होऊ शकली नव्हती. पुढे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणातील या अटीतटीने परिसीमा गाठली. ‘काँगे्रसमुक्त भारत’, अशी घोषणा मोदी यांनी दिली आणि देशाचे भले व्हायचे असल्यास ‘काँगे्रसला संपवा’ असे आवाहनही केले. काँगे्रसच्या दहा वर्षांच्या निष्क्रीय व निष्प्रभ कारभाराला विटलेल्या मतदारांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र राजकारणातील अटीतटी संपली नाही. संसदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला नाकारण्यात आले. ‘मला संसदेत बोलू देत नाहीत’, असे मोदी यांनी आपल्या गुरूवारच्या भाषणात म्हटले असले तरी ते अपवादानेच संसदेत हजर राहतात, असा गेल्या दीड वर्षाचा अनुभव आहे. अशाच एका अपवादात्मक प्रसंगी त्यांनी म्हटले होते की, ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली तुम्ही जे खड्डे देशभर खोदून ठेवले आहेत, ते तुमच्या निष्क्रीय व निष्प्रभ कारभाराचे प्रतीक म्हणून जगाला दाखवण्यासाठी आम्ही तसेच ठेवणार आहोत’. हा संदर्भ या योजनेसाठीची आर्थिक तरतूद कमी केली जात असल्याबद्दल काँगे्रसने घेतलेल्या आक्षेपाचा होता. आपल्या परदेश दौऱ्यांमध्येही मोदींनी गेली दीड वर्षे सतत काँगे्रसच्या कारभारावर टिेंगलवजा टीका केली आहे. लोकशाहीतील निवडणुकीत एखादा पक्ष जिंकतो व दुसरा हरतो. सत्ता कशी व किती कार्यक्षमतेने व पारदर्शीपणे राबवून जनहिताचे कार्यक्रम अंमलात आणले जातात, त्यावर सत्ताधारी पक्षाचे पुढील निवडणुकीतील यश अवलंबून असते आणि त्यासाठी संसदीय मंजुरी लागते व त्याकरिता विरोधात असलेल्यांचे सहकार्य आवश्यक असते. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर देखरेख ठेवून व त्यातील उणीवा जनतेसमोर आणून आपल्या धोरण व कार्यक्रमांची परिणामकारकता मतदारांना पटवून देणे, हे विरोधी पक्षांचे काम असते. या लोकशाही प्रक्रियेचा गाभा म्हणजे मतदानाद्वारे सत्ताधारी बदलण्याचा मतदारांचा हक्क. पण जर एखादा पक्ष सत्तेवर आल्यावर म्हणू लागला की, ‘देश विरोधी पक्षमुक्त हवा’, तर त्याचा अर्थ यापुढे कायम आम्हीच सत्तेवर राहणार, असा होतो. असे घडते तेव्हां विरोधात असलेले पक्षही आक्रमक बनतात आणि जशास तसे या न्यायाने वागू लागतात. तसे करताना तेही संसदीय प्रथा आणि परंपरा पायदळी तुडवीत असतात. अर्थात सध्याचे सत्ताधारी विरोधी असताना हेच करून आम्हाला सत्ता राबवू देत नव्हते, आता आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर देत आहोत, असा विरोधकांचा युक्तिवाद असतो. आज नेमके तेच घडत आहे. जर ही परिस्थिती बदलायची असेल, तर आवाहनाला आर्जवाची जोड हवी, आक्रमकतेची पार्श्वभूमी असता कामा नये. खरे तर आजच्या घडीला एका व्यापक राजकीय-सामाजिक विरेचनाच्या प्रक्रियेची गरज आहे. उदाहरणार्थ, संसदीय कामकाजात खोडा घालण्यात आम्ही चूक केली, अशी भाजपाने आज कबुली दिली, तर काँगे्रसलाही पाय मागे घेण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत अशी आवाहने निरर्थकच ठरणार आहेत.