हुश्श्य! आटोपल्या बुवा एकदाच्या आंघोळी!

By Admin | Updated: September 19, 2015 04:38 IST2015-09-19T04:38:42+5:302015-09-19T04:38:42+5:30

मथळ्यातील सुस्कारा केवळ आमचा नाही. तो जसा केन्द्र आणि राज्य सरकारचा आहे, त्यांच्या यंत्रणांचा आहे, तसाच तो नाशिक महापालिकेचाही आहे.

Hussee! Breasted once and a little bathing! | हुश्श्य! आटोपल्या बुवा एकदाच्या आंघोळी!

हुश्श्य! आटोपल्या बुवा एकदाच्या आंघोळी!

मथळ्यातील सुस्कारा केवळ आमचा नाही. तो जसा केन्द्र आणि राज्य सरकारचा आहे, त्यांच्या यंत्रणांचा आहे, तसाच तो नाशिक महापालिकेचाही आहे. पण या सर्वांहून मोठा आणि महत्वाचा सुस्कारा नाशिककर नागरिकांचा आणि साधूग्राम किंवा कुंभग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गलिच्छ वसाहतीची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पेलणाऱ्या सफाई कामगारांचाही असणार आहे. अगदी दैनंदिन जीवनातही काही बाबी बुद्धीला पटत नसल्या तरी अनिच्छेने स्वीकाराव्या लागतात व अशाच बाबींमध्ये नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्थान अगदी अग्रभागी जाऊन बसते. नाशिकच्या याच कुंभमेळ्याला सिंहस्थ पर्वणी असेही म्हटले जाते आणि मग पर्वणी साधणे ओघानेच येते. तशी पर्वणी यंदाही अनेकांनी साधून घेतली. ग्रीन कुंभ, हायटेक कुंभ, निर्मळ कुंभ, प्रदूषणरहित कुंभ आदि गोंडस नावांखाली अनेक स्वयंभू स्वयंसेवी संघटनांनी यंदाची पर्वणी साधून घेतली. प्रत्यक्षात ना हा कुंभ हरित होता, ना हायटेक होता, ना निर्मळ होता. गेल्या किमान तीन-चार वर्षांपासून या कुंभमेळ्याच्या तयारीचे नगारे वाजविण्यात येत होते. देशभरातील लाखो साधू आणि कोट्यवधी भाविक गोदावरीत केवळ स्नान करण्यासाठी येणार तेव्हां त्यांच्यासाठी गोदावरीचे पात्र पूर्णत: प्रदूषणरहित असावे म्हणून सातत्याने उच्च न्यायालयाची आळवणी केली जात होती. न्यायालयदेखील आदेशावर आदेश जारी करीत होते. पण गोदावरी जशी होती तशीच प्रदूषित राहिली. गेल्या रविवारच्या दुसऱ्या पर्वणीच्या आदल्या दिवशी जो तुफानी अवकळ्या पाऊस पडला त्यानंतर शहरातील सांडपाण्याचे लोटच्या लोट गोदावरीच्या पात्रात शिरले आणि प्रदूषणाच्या जोडीनेच दुर्गन्धीचाही गोदावरीच्या पात्राला प्रादुर्भाव झाला. स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता कायदे करुन होत नसते वा पंतप्रधानांच्या आवाहनांवरुनही ती प्रत्यक्षात येत नसते, याचा पुरेपूर प्रत्यय आणि खरे तर पुन:प्रत्यय याही कुंभमेळ्यात येऊन गेला. केवळ तितकेच नव्हे तर हिन्दु धर्माचे आणि या धर्मातील चालीरिती, रुढी आणि परंपरा यांचे स्वच्छतेशी कसे खडाष्टक आहे यावरदेखील पुनश्च एकवार शिक्कामोर्तब झाले. नाशकात जमा झालेल्या साधूंचे माघारणे खरे तर गेल्या रविवारच्या पर्वणीनंतरच सुरु झाले. त्यामुळे नाशिक शहराच्या स्वच्छतेचे आणि सार्वजनिक आरोग्याचे भवितव्य आता यानंतरच स्पष्ट होऊ लागणार आहे. राज्यात आज पाण्याचे दुर्भिक्ष्य तर आहेच पण अन्नधान्याचीदेखील टंचाई निर्माण होऊ शकते. पण पाणी वाचविण्यासाठी आणि खरे तर त्या माध्यमातून प्रसिद्धची हौस भागवून घेण्यासाठी पत्रकबाजीपासून न्यायालयांपर्यंत धाव घेणाऱ्या कोणालाही कुंभग्रामात अहर्निश होत असलेल्या अन्नधान्याच्या नासाडीकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही. प्रत्येक खालसा, प्रत्येक अखाडे आणि त्याशिवाय असंख्य ज्ञातीसंस्थांची मोफत अन्नछत्रे. शिजवून वाया गेलेल्या अन्नाचे ढीग कुंभग्रामात दिसू लागले आहेत. रोगराईला त्यापरते अन्य आमंत्रण असू शकत नाही. साधू किंवा संत म्हटले की जनसामान्यांच्या नजरेसमोर जी काही विशिष्ट प्रतिमा उभी राहते तिच्याशी अगदी दूरान्वयानेही संबंध नसलेले भणंग सिंहस्थाच्या निमित्ताने नाशकात येत असतात. ते ज्ञानोपासक तर नाहीतच पण बलोपासकही नाहीत. सतत बारा वर्षे कुठेतरी तपश्चरण करणारे साधक यानिमित्ताने येतात तेव्हां त्यांच्या दर्शनाने व त्यांच्या तप सामर्थ्याने आपणही धन्य होऊन जाऊ या भावनेने भानिक गोळा होत असतात. प्रत्यक्षात जे दिसते त्यावरुन एकच बाब स्पष्ट होते आणि ती म्हणजे या तथाकथित साधूंनी साधना केलेली असते तामसी वृत्तीची, जप केलेला असतो अहंकाराचा, तपश्चर्या केलेली असते स्वार्थलोलुपतेची आणि साध्य केलेला असतो हिमालयाएवढा अहंभाव. गेला तो काळ ‘सोने आणि रुपे आम्हा मृत्तिकेसमान’ म्हणणाऱ्यांचा. आता या साधूंकडे स्मार्ट फोन असतात, लॅपटॉप असतात, सोशल मीडियात त्यांची खातीही असतात. इतकेच कशाला, त्यांची छबी कॅमेराबंद करण्याची कुणाला उर्मी आली तर त्याच्याकडून ‘रॉयल्टी’ वसूल करण्याचे भानदेखील त्यांना आले आहे. या अर्थी ज्यांना हा कुंभ हायटेक करायचा होता त्यांचे स्वप्न पुरे झाले असे म्हणता येईल. पूर्वी सर्कशींमध्ये ‘सॅन्डो’ नावाचा एक मनुष्यप्राणी असायचा. ‘अचाट शक्तीचे अफाट प्रयोग’ अशी त्याची जाहिरात केली जात असे. त्याच धर्तीवर फुटकळ शक्तीचे वायफळ प्रयोग करणारे तथाकथित हटयोगीही कुंभमेळ्यात पायलीला पन्नास मिळतात व लोकदेखील त्यांच्या कच्छपी लागतात. यंदाच्या कुंभाचे त्यातल्या त्यात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे जागृत झालेली नारीशक्ती! दोन महिला साध्व्या यंदा प्रगट झाल्या आणि शाही स्नानाचा हट्ट धरुन बसल्या. त्यांच्यात व पुरुष साधूंमध्ये दीर्घकाळ जो ‘सुखसंवाद’ सुरु राहिला त्याने तर मग साधू-संत आणि साध्वी या कल्पनांची उरली सुरली प्रतिष्ठाही घालवून टाकली. ज्या स्नानासाठी इतका सारा खटाटोप केला जातो त्याला शाही म्हणायचे कारण पूर्वी राजे-महाराजे अशा स्नानांसाठी पुढाकार घेऊन साधूंना आंघोळी घालीत असत. यंदाही तेच आणि तसेच झाले. फरक इतकाच, राजे महाराजांची जागा मंत्री, खासदार, आमदार, महापौर आदिंनी घेतली. लोकशाहीतील हेच तर नव्हेत राजे महाराजे?

Web Title: Hussee! Breasted once and a little bathing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.