नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 04:16 AM2019-08-09T04:16:00+5:302019-08-09T04:17:36+5:30

हवामान बदल आणि जागतिक तापमानामुळे पर्जन्यवृष्टी लहरी होईल, वादळवाऱ्याचे तडाखे बसतील असे सांगितले जात असले तरी त्यांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याने, सर्वसामान्यांचे जीवन संकटग्रस्त झालेले आहे.

humans failed to conserve revers causes flood like situation | नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर

नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर

Next

- राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी कार्यकर्ते

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या बऱ्याच भागांत सध्या तेथील नदीनाल्यांना आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. राष्ट्रीय महामार्गाबरोबर बऱ्याच ठिकाणच्या रेल्वे मार्गांवर महापुराचे पाणी पोहोचल्याने वाहतूक सेवा खंडित झालेली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. मान्सूनच्या प्रारंभी पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा भासणार असल्याची भाकिते व्यक्त केली जात होती; परंतु जुलैै-ऑगस्ट महिन्यात धो धो पाऊस कोसळू लागल्याने ही परिस्थिती झपाट्याने पालटलेली आहे. श्रावणमासी जागोजागी प्रपात आणि धबधब्यांच्या दर्शनाने प्रसन्नता अनुभवणाऱ्यांना बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने निसर्गाचा प्रकोप कसा असू शकतो याची प्रचिती आलेली आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानामुळे पर्जन्यवृष्टी लहरी होईल, वादळवाऱ्याचे तडाखे बसतील असे सांगितले जात असले तरी त्यांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याने, सर्वसामान्यांचे जीवन संकटग्रस्त झालेले आहे.



गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या बऱ्याच ठिकाणच्या धरणांच्या जलाशयात पावसाचे पाणी तुडुंब भरल्याने त्या पाण्याचा योग्यवेळी विसर्ग केला नाही, तर धरणांच्या अस्तित्वावरच संकट येणार, यासाठी धरणांचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. त्याचवेळी पर्जन्यवृष्टी थांबण्याऐवजी वाढत चालल्याने, जलसंकटाचे काळे ढग आणखी गडद होत चाललेले आहेत. महाबळेश्वरात उगम पावणारी आणि आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराशी एकरूप होणारी दक्षिण भारतातली महत्त्वाची गणली जाणारी कृष्णा दरवर्षी पावसाळ्यात आपल्या दोन्ही काठांवरच्या लोकांच्या घरांना, शेती-बागायतींना महापुराचा तडाखा देत आहे; परंतु यंदाच्या वर्षी हे जलसंकट बरेच तीव्र होऊ लागलेले आहे. त्याला धुवाधार पर्जन्यवृष्टी हे प्रमुख कारण असले तरी आपल्या पात्रातले अतिरिक्त पाणी वाहून नेण्याची क्षमताच नद्या हरवत चाललेल्या आहेत, हेही तितकेच खरे. नद्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे जलप्रदूषण, नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात झालेली अक्षम्य अतिक्रमणे, वाळू, रेती, दगडगोटे यांचा बांधकामासाठी केला जाणारा अनिर्बंध उपसा, जलमार्ग प्रवाहित करण्यासाठी पात्रात केले जाणारे उत्खनन, यामुळे बऱ्याच नद्यांची पात्रे दुर्बल झाली आहेत. त्यामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी नद्यांच्या पात्रात आल्यावर तेथील परिसराला महापुराला सामोरे जाण्याची वेळ येते. आज कोल्हापूर, बेळगावसारख्या महानगरांत असलेल्या मुख्य नद्यांबरोबरच तेथील नदीनाल्यांतले अतिरिक्त पाणी प्रवाहित होण्यासाठी असलेल्या पूरप्रवण क्षेत्राकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. पूरप्रवणातल्या अतिक्रमणांमुळे महापुराचे पाणी मिळेल त्या दिशेने धावत चालले आहे. हे पाणी महामार्गावर आल्यामुळे त्याचा दुष्परिणाम प्रवासी आणि मालवाहतुकीवर झाला आहे.



वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे आणि त्याचे वाईट परिणाम मानवी आरोग्य, शेती आणि बागायतीसाठी सिंचन, पिण्याच्या पाण्यावर होऊ लागलेले आहेत. नद्यांच्या जलसंचय क्षेत्रात सातत्याने बेसुमार वृक्षतोड चालू आहे आणि त्यातून मातीची प्रचंड धूप होत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अल्प होत चालले आहे. त्यात भर म्हणून की काय शेतकरी, बागायतदारांना जलसिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी ठिकठिकाणी धरणे, पाटबंधारे उभारले जात आहेत; आणि त्यामुळे पावसाळी हंगाम वगळता या नदीनाल्यांची पात्रे कोरडी पडत चालली आहेत. एकेकाळी बारमाही वाहणाºया नद्या पूर्णपणे हंगामी स्वरूपाच्या झाल्याने, पिण्याचे पाणी आणि जलसिंचनाची समस्या वाढत चालली आहे. मुसळधार पावसाचे पाणी वाहून नेताना नद्यांची पात्रे दुर्बल, अपुरी पडू लागली. केरकचरा, मलमूत्र आणि सांडपाणी यांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात आजतागायत अपयश आल्याने बºयाच ठिकाणी हे सारे नद्यांच्या पात्रात वळवले जाते. त्यामुळे या नद्या जीवनदायी होण्याऐवजी गटारगंगा होऊन वाहत आहेत. नद्यांचे किनारे सुरक्षित राहावेत, त्या ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून तेथे परमेश्वरी अधिवास स्थापन केले, मंदिरे उभारली, पवित्र घाटांची बांधकामे केली; परंतु त्याचे उलटे परिणाम दिसले. मंदिरांच्या, घाटांच्या शेजारी राहती घरे, हॉटेल्स, दुकाने, मोठ्या प्रमाणात उभी राहिली आणि त्यामुळे लोकांना नदीच्या पर्यावरणीय दृष्टीने संवेदनक्षम असणाºया पूरप्रवण क्षेत्रांचे विस्मरण झाले. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नियोजनबद्ध वृक्षारोपण, वृक्षसंगोपन करणे; गवताची कुरणे, रानफुलांचे वैभव मिरवणारी पठारे, माळराने गुराढोरांच्या चरण्यापासून मुक्त ठेवणे; पावसाचे कोसळणारे पाणी जमिनीत योग्य रीतीने मुरण्यासाठी प्रयत्नरत असणे, वाहते पाणी नैसर्गिकरीत्या अडवणे आणि भूजलाची पातळी वाढवणे अशा उपक्रमांकडे आपले सातत्याने दुर्लक्ष झाले. नद्यांचे दोन्ही काठ सुरक्षित राहतील, यासाठी लोकसहभागाबरोबर कायदेशीर व्यवस्था करणे आता अगत्याचे झाले आहे.



राधानगरी, तिळारी यांसारख्या धरणांच्या जलाशयांतले अतिरिक्त पाणी बाहेर सोडल्याने ठिकठिकाणी महापुराचे थैमान शेती, बागायती, मालमत्तेच्या मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरलेले आहे. नदी आणि सागर किनाऱ्यावरच्या लोकवस्तीला तडाखा बसल्याने तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ आलेली आहे. पाऊस लहरी होतो आणि हा लहरीपणा आम्ही जाणून त्याच्यावर योग्य उपाययोजना करण्यात असमर्थ ठरलो तर त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी लागेल. नदीनाले यांच्या नैैसर्गिक पात्रांची आणि प्रवाहांची दखल घेऊन आम्ही महापुरांच्या आपत्तीला सामोरे जाण्याचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

Web Title: humans failed to conserve revers causes flood like situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.