However, the old values decline as they develop | विकास होताना जुन्या मूल्यांचा मात्र ऱ्हास

विकास होताना जुन्या मूल्यांचा मात्र ऱ्हास

- गुरचरण दास
राजकीय विश्लेषक

संकुचित दृष्टिकोनाचा त्याग करून जर उदार दृष्टिकोन स्वीकारला तर हे जग चांगले होत आहे, असे तुम्हाला नक्की जाणवेल. नव्या दशकाची सुरुवात होत असताना अनेकांना दु:ख होत असेल. पण विज्ञान लेखक मॅट रिडले यांच्या मते, गेले दशक हे सर्वांत उत्तम होते. कारण या दशकात मानवाच्या जीवनमानात कमालीची सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळाले. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत कमालीचे दारिद्र्य भोगणाऱ्यांची संख्या १० टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. बालमृत्यूचा दरसुद्धा घसरला आहे. जगातून दुष्काळ संपुष्टात आला असून, मलेरिया, पोलिओ आणि हृदयविकार यांच्या प्रमाणात घट झाली आहे.

मॅट रिडले यांचे एक निरीक्षण भारतासाठी सुखद आहे. त्यांच्या मते, भारतातून गरिबीचे उच्चाटन होत आहे. कमालीच्या दारिद्र्यात दैनिक उत्पन्न रु. ८८ पेक्षा कमी असणे हे गृहीत धरण्यात येते. २०१२ मध्ये अशा लोकांचे प्रमाण २२ टक्के होते, ते आता ५.५ टक्के झाले आहे. भारताचा विकास गेल्या १७ वर्षांत सरासरी ७ टक्के या दराने होत असल्यामुळे हे शक्य झाले आहे, असे रिडले यांचे मत आहे. आम आदमीच्या आणि आम महिलेच्या जीवनात आणखी काही सकारात्मक बदल घडले आहेत. आता अनेक स्त्रिया गॅसवर स्वयंपाक करू लागल्यामुळे त्यांची धुरातील विषारी वायूपासून मुक्तता झाली आहे. अनेक कुटुंबांना स्वच्छतागृहे उपलब्ध झाल्यामुळे, त्यांनी उघड्यावर शौचास बसणे बंद केले आहे. त्यामुळे वातावरणाचे प्रदूषण होणे कमी झाले आहे. परिणामी, अनारोग्याचे प्रमाणही कमी झाले आहे. अनेक खेडी पक्क्या रस्त्याने मुख्य रस्त्याला जोडली गेली आहेत. अनेकांच्या घरी वीज आली असून, त्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष लाभाची रक्कम जमा होऊ लागली आहे.


लोकांच्या जीवनात यामुळे हळूहळू जो बदल घडून येत आहे, तो आपण लक्षात घेत नाही. कारण आपण वृत्तपत्रातून झळकणाºया हेडलाइन्सने प्रभावित होत असतो आणि चांगल्या बातम्यांची हेडलाइन कधीच होत नाही! तसेच जगाविषयीच्या आपल्या आकलनात विकृत दृष्टिकोनच जास्त आढळून येतो. आपण जन्माला आल्यापासून विकसित पाश्चात्त्य राष्ट्र व विकसनशील पूर्वेकडील राष्ट्रे हाच भेदभाव आपण बघत आलो आहोत. वास्तविक, त्यांच्यातील फरक जवळपास संपुष्टात आला आहे आणि पौर्वात्य राष्ट्रे अधिक प्रमाणात मध्यमवर्गीय होऊ लागली आहेत. तसेच लोकसंख्यावाढीमुळे आपल्यासमोर भविष्यात विनाशाचे संकट ओढवणार आहे, हे समजण्याची चूक आपण करतो आहोत. वास्तविक, गेल्या २० वर्षांत लोकसंख्यावाढीचे जगाचे आणि भारताचेसुद्धा प्रमाण कमी झाले आहे!
तेव्हा उदारदृष्टीने पाहता सगळेच छान दिसत आहे. पण अलीकडे राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांत वाढ झालेली पाहावयास मिळते आहे. अमेरिकेचे ट्रम्प, रशियाचे पुतीन, चीनचे जिनपिंग, भारताचे मोदी, एर्डोगन, बोरिस जॉन्सन इ. नेते पुढे येत असताना आपण ज्या ध्येयवादावर विश्वास ठेवून मोठे झालो, तोच ध्येयवाद नष्ट होताना दिसत आहे. अनेक पिढ्यांपासून आपण उभारलेल्या संस्था आपल्या नजरेसमोर कोलमडून पडताना पाहाव्या लागत आहे. उजव्या प्रवृत्तीत वाढ झाल्याने हे जग अनाकलनीय आणि धोकादायक बनले आहे. आपल्या देशात आर्थिक मंदीचे संकट घोंघावत असताना आपले पंतप्रधान मात्र देशाच्या निधार्मिकतेला धोका निर्माण करणारा वादग्रस्त सामाजिक अजेंडा राबवताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्राचे धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी स्वरूप मात्र नष्ट होत आहे. आजचे विद्यार्थी हे नागरिकता कायद्याच्या विरोधात देशभर उभे ठाकले आहेत आणि नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्सची लोकांना भीती वाटते आहे. सारे काश्मीर पाच महिन्यांपासून टाळेबंदी अनुभवत आहे आणि तेथील भारताचे समर्थक नेतेदेखील स्थानबद्धतेत आहेत.
‘द रॅशनल आॅप्टीमिस्ट’ हे पुस्तक वाचल्यापासून मी मॅट रिडले या लेखकाचे विचार गांभीर्याने घेऊ लागलो आहे. एकेकाळच्या या विज्ञान लेखकाने आपली दृष्टी अर्थकारणाकडे वळविली आहे. त्यांची मार्केटविषयाची दृष्टी एकांगी जरी असली तरी, त्याने शेअर बाजारातून होणारा फायदा आणि स्पेशलायझेशनविषयी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मार्केट ट्रेडिंगपासून होणारे लाभ हे स्पेशलायझेशनमुळे अधिक होतात आणि त्यातून नावीन्यपूर्ण तांत्रिक शोध घडतात, असे त्यांचे मत आहे.
लोक पूर्वीपेक्षा अधिक आरोग्यसंपन्न व दीर्घ जीवन जगू लागले आहेत. दहशतवादाविषयी आपल्याला वाटणारी भीती ही अतिरंजित आहे. कारण दहशतवादी हल्ल्यात जितके लोक मारले जातात, त्यापेक्षा ३ हजार पट अधिक लोक रस्ते अपघातांत मारले जातात, तरीही जग चांगले होत आहे, असे म्हणायचे का? हवामानाचे संकट, राजकीय पेचप्रसंग या दोन्ही गोष्टी वाईटच आहेत. पण जेव्हा राजकारणाचे काळे ढग घोंघावू लागतात तेव्हा मी उदारमतवादी दृष्टिकोनाचा स्वीकार करतो आणि मला समाधान वाटते. लाखो लोकांच्या जीवनात होणाºया बदलाचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला सुख लाभते. मग मी राजकीय नेत्यांच्या जीवनात होणाºया बदलाकडे दुर्लक्ष करतो आणि माणसाच्या होत असलेल्या प्रगतीला वंदन करतो. कुणी तरी छान म्हटले आहे, ‘पाऊस पडत असताना आकाशात उमटणारे इंद्रधनुष्य बघावे आणि जेव्हा रात्रीचा अंधार दाटून येतो तेव्हा आकाशात चमचमणाºया तारकांना न्याहाळावे.’

Web Title: However, the old values decline as they develop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.