कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार?

By यदू जोशी | Updated: December 27, 2024 07:59 IST2024-12-27T07:59:04+5:302024-12-27T07:59:14+5:30

पक्षांतर्गत मांड पक्की झालेले आणि प्रशासनावर अधिक दरारा असलेले देवेंद्र फडणवीस यावेळी पहायला मिळतील. त्याचे संकेत त्यांनी दिलेच आहेत!

How will Chief Minister Devendra Fadnavis administration be in the Mahayuti government | कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार?

कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार?

यदु जोशी

सहयोगी संपादक, लोकमत

देवेंद्र फडणवीस आपल्याला पूर्ण कळले असा दावा काही लोक करतात; पण पूर्ण फडणवीस कळणे हा पीएच.डीचा विषय आहे. फडणवीस पूर्ण कळल्याचा दावा कोणीही करू नये, पण इतकी वर्षे त्यांचा राजकीय प्रवास जवळून पाहत असल्याने त्यांची मुख्यमंत्रिपदाची वाटचाल कशी असेल याबाबत काही ठोकताळे जरूर मांडता येऊ शकतात. पहिल्या टर्मपेक्षा आता ते अगदीच वेगळे असतील आणि त्यांचे मुख्यमंत्री कार्यालयदेखील तसेच वेगळे असेल. आधी या कार्यालयाला आपल्या अधिकारांचे पूर्ण भान नव्हते. तेथून  विनंतीवजा फोन अधिकाऱ्यांना केले जात असत, पण विनंतीवजा नाही तर आदेशवजा फोन करायचे असतात याचे भान आता आलेले आहे. हा मोठा फरक. 

गेल्या पाच वर्षांतील चढउताराने त्यांच्या अवतीभवतीच्या विश्वासू सहकाऱ्यांनाही बरेच काही शिकवले आहे. काम घेऊन आलेल्या व्यक्तीला आपल्या कामासाठी सीएम ऑफिसमधून ‘विनंती’ केली जाते यापेक्षा ‘आदेश’ दिला जातो हे जास्त सुखावणारे असते, त्यामुळे  आता कार्यकर्ते सुखावतील; पण हेही तितकेच खरे की मुख्यमंत्री कार्यालयातील दिलीप राजूरकर, केतन पाठक, देवराम पळसकर, प्रिया खान, शशांक दाभोळकर हे साहेबांचा आदेश अधिकाऱ्यांपर्यंत पोचवताना संकेत सांभाळतील, कारण आपल्या बॉसला कशा प्रकारचे सौजन्य आणि प्रामाणिकपणा अपेक्षित आहे हे त्यांना चांगले कळते. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी यांच्यासारखे आयएएस अधिकारी ‘टीम फडणवीस’मध्ये आहेत. त्यातून पारदर्शी कारभाराची एकप्रकारे हमीच फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, प्रामाणिकपणाचे दोन धोके असतात : एकतर प्रत्येक गोष्ट नियमाच्या कसोटीवर खूपच घासून पाहिली जाते, त्यात कालापव्यय होतो. तसेच प्रामाणिकपणाचा म्हणून एक गर्व चांगले तेही होऊ देत नाही. असे काही घडू नये याची काळजी घेणे हे तिघेही उत्तम जाणतात.

फडणवीस एका मर्यादेपर्यंत ऐकतात, सहनशीलता तर त्यांच्याकडे प्रचंड आहे, पण आपल्यामार्फत कोणी चुकीचा अजेंडा राबवून घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तर मग ते कोणी कितीही जवळचे असले तरी व्हेटो वापरतात. त्यांच्या या स्वभावात काही बदल होईल असे वाटत नाही. त्यामुळे ‘आता फडणवीस आले आहेत, अब कोई चिंता नही, कुछ भी कर लेंगे’अशा मस्तीत असलेल्यांचा अविर्भाव लवकरच गळून पडेल. त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालय आणि भाजप यांना जोडणारा दुवा म्हणून श्रीकांत भारतीय यांची नेमणूक केलेली होती. त्यावेळी फारशा अपेक्षा नव्हत्या. ७० टक्के लोक फडणवीस यांच्याबरोबर फोटो काढून घेण्यातच भरून पावत होते. आता तसे नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्वी फारच भाबड्या होत्या, आता तेही प्रॅक्टिकल झाले आहेत, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. 
२०२४ मध्ये मिळालेल्या झळझळीत यशात पक्ष संघटनेचा मोठा वाटा आहे. २०१४ मध्ये भाजपची सत्ता होती, पण ती खालपर्यंत म्हणजे कार्यकर्त्यांपर्यंत झिरपू शकली नव्हती. तसे होण्यामागे अनेक कारणे दिली गेली, आता ती देता येणार नाहीत. त्यावेळी फडणवीस यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले आणि प्रसंगी, ‘त्यांना काय समजते’ असे अधिकाऱ्यांना सुनावणारे काही मंत्री होते, त्यामुळे एकप्रकारचा दबाव होता, आता तोदेखील नाही. यावेळी काही ज्येष्ठ आहेत, पण ते तसे बोलणारे नाहीत. पक्षांतर्गत मांड अधिक पक्की झालेले आणि अधिक दरारा असलेले फडणवीस यावेळी पहायला मिळतील. 
मंत्रालयातील सचिवांची पहिली बैठक फडणवीस यांनी घेतली, त्याची बातमी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिली. त्या बातमीत जे नव्हते ते मुद्दाम येथे नमूद करावेसे वाटते. फडणवीस त्या बैठकीत असे म्हणाले की, ‘मंत्रालयात कोणत्या विभागात काय काय चालते ते सगळे मला माहिती आहे, असले प्रकार थांबवा नाही तर....’ पुढे ते असेही म्हणाले की, ‘कुठे कसे गैरव्यवहार चालतात याच्या काही क्लिपही माझ्याकडे आहेत..’ - याचा अर्थच हा की, फडणवीसांना सगळे माहिती आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून बदलांचे संकेत त्यांनी दिले आहेत आणि बरेच बदल होतील. 
पहिल्या कार्यकाळात त्यांना शिवसेनेचा बराच त्रास होता; यावेळी तो अजिबात नसेल असे नाही, पण तो पूर्वीसारखा नसेल. शिंदेसेनेच्या मंत्री, आमदारांची कामे होण्यापुरता त्रास असेल. उद्धव ठाकरे हे युतीमध्ये होते पण रोज मोदी-शाह-फडणवीसांवर त्यांच्या मुखपत्रातून सडकून टीका केली जायची. एकनाथ शिंदे तसे नाहीत, ते मोदी-शाह यांची प्रशंसा करतात आणि आजतरी फडणवीस यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. अजित पवारांशी त्यांची मैत्री जगजाहीर आहेच, त्यामुळे ‘आपल्यां’पासून यावेळी फडणवीसांना फारसा त्रास नसेल. 

...पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होता होता फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले असतील. अशावेळी आगामी पाच वर्षांत देशात चर्चा होईल आणि त्या चर्चेतून एक राष्ट्रीय प्रतिमा तयार होईल, असे काही वेगळे निर्णय, उपक्रम वा योजना ते राबवतील असाही एक अंदाज आहे. 
    yadu.joshi@lokmat.com

Web Title: How will Chief Minister Devendra Fadnavis administration be in the Mahayuti government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.