हिजबुल्लाहच्या मास्टरमाइंडला कसं टिपलं? जाहीर केलं होतं ४२ कोटींचं बक्षीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:30 IST2025-01-04T10:29:18+5:302025-01-04T10:30:20+5:30
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्स परिसरात २७ जुलै २०२४ रोजी हिजबुल्लानं केलेल्या हल्ल्यात फुटबॉल मैदानावर खेळणारी बारा मुलं ठार झाली होती आणि तीसजण जखमी झाले होेते. हिजबुल्लाच्या या हल्ल्यानंतर इस्रायल त्यांच्या मागावर होता.

हिजबुल्लाहच्या मास्टरमाइंडला कसं टिपलं? जाहीर केलं होतं ४२ कोटींचं बक्षीस!
इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात लेबनॉनच्या हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेनंही तेल ओतल्यामुळे इस्रायल हिजबुल्ला या संघटनेवर चांगलाच भडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील संघर्षही चांगलाच वाढला आहे. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्स परिसरात २७ जुलै २०२४ रोजी हिजबुल्लानं केलेल्या हल्ल्यात फुटबॉल मैदानावर खेळणारी बारा मुलं ठार झाली होती आणि तीसजण जखमी झाले होेते. हिजबुल्लाच्या या हल्ल्यानंतर इस्रायल त्यांच्या मागावर होता.
या हल्ल्याचा तातडीनं बदला घेताना इस्रायलच्या सैन्यानं ३० जुलै २०२४ रोजी हिजबुल्लाचा मुख्य कमांडर फुआद शुकरला एक हवाई हल्ल्यात ठार मारलं होतं. फुआदला इस्रायलनं कसं मारलं याची कहाणी आता नुकतीच बाहेर आली आहे. फुआदची जीवनकहाणीही त्यामुळे सध्या जगभर चर्चेत आहे. फुआद शुकर हा हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाचा उजवा हात मानला जातो. हिजबुल्लाचा तो संस्थापक सदस्य होता. त्याच्या मृत्यूमुळे हिजबुल्लाला मोठा धक्का बसला आहे आणि ही संघटना कमजोर झाल्याचं मानलं जात आहे. कारण फुआद हा हिजबुल्लाचा मास्टरमाइंड, नसरल्लाचा उजवा हात तर होताच; पण इस्रायलसोबत संघर्ष सुरू झाल्यानंतर मारला गेलेला संघटनेचा तो पहिला मोठा नेता होता. पण, फुआदच्या मृत्यूनं आम्ही हादरलो आहेत असं म्हणणं संघटनेला मान्य नाही. त्यांच्या मते, आमचा प्रत्येक सैनिक फुआद आणि नसरल्ला आहे. कोणीही शहीद झालं तरी आमच्या लढवय्या सैनिकांची संख्या कमी होणार नाही आणि आमच्या संघटनेच्या केसालाही धक्का बसणार नाही. लढाईत सैनिक शहीद तर होतच राहतील; पण आमच्या प्रत्येक सैनिकाच्या मृत्यूचा बदला जरूर घेतला जाईल आणि आमच्या सैनिकाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून नव्या तेजस्वी सैनिकाचा जन्म होईल ! पण फुआदच्या मृत्यूचा धक्का संघटनेतील कार्यकर्त्यांनाही नक्कीच बसला आहे. इस्रायलनं फुआदला जेव्हा टिपलं, तेव्हा तो बैरुतमधील एका इमारतीत आपली पत्नी आणि मुलांसमवेत होता.
गोलान हाइट्स परिसरात हिजबुल्लानं केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनं लगेचंच फुआदला टिपलं असलं तरी ते काही सहजासहजी घडलेलं नाही. त्याआधी कित्येक काळापासून इस्रायलची फुआदवर नजर होती. तो काय करतो, कुठे, कधी असतो, इतकंच काय, त्याचं फॅमिली लाइफ कसं आहे, त्याला किती बायका, किती प्रेमिका आहेत, कोणाबरोबर कधी असतो, याची इत्थंभूत माहिती इस्रायलच्या गुप्तहेरांनी मिळवलेली होती.
याच दरम्यान फुआदच्या चार प्रेमिकांची माहिती इस्रायलला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी फुआदच्या मैत्रिणींवरही नजर ठेवली होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुआद आधीच विवाहित असताना चार मैत्रिणींशीही त्याचे संबंध असल्यानं, त्यांना आपण ‘न्याय’ देत नसल्यानं त्याचाही खेद त्याला वाटत होता. याबद्दल काय करावं म्हणून हिजबुल्लाचा धार्मिक नेता हाशिम सफीउद्दीन याच्याशीही फुआदनं संवाद साधला होता आणि त्याच्याकडे मदत मागितली होती. हाशिम सफीउद्दीनच्या सल्ल्यानंतर फुआदनं मग आपल्या या चौघा मैत्रिणींशी लग्नही केलं होतं. पण, हे लग्न त्यानं कसं केलं? - तर फोनवरून. फोनवरच या चारही महिलांशी त्याचं लग्न लावून देण्यात आलं. हे लग्न कुठे आणि कसं पार पडलं, त्यावेळी फुआद आणि त्याच्या या नव्या चारही बायका कुठे होत्या, याबाबतची माहिती मात्र अजून जाहीर करण्यात आलेली नाही. अर्थातच ज्या हाशिम सफीउद्दीननं फुआदचं लग्न लावून दिलं, त्याच्यावरही इस्रायली गुप्तचर संघटना मोसादचं बारीक लक्ष होतं. हाशिमही ऑक्टोबर २०२४ मध्ये इस्रायलनं केलेल्या एका हवाई हल्ल्यात मारला गेला यात आश्चर्य नाही.
याच हाशिमला हिजबुल्लाचा भावी प्रमुख मानलं जात होतं. फुआदच्या मृत्यूचा किस्साही रहस्यमय आहे. ज्या दिवशी फुआद बैरुतमध्ये मारला गेला, त्यावेळी संध्याकाळी ७ वाजता त्याला एक ‘महत्त्वाचा’ फोन आला. आपल्या ऑफिसमधून निघून त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर येण्यास त्याला सांगितलं गेलं. तो तिथे जाताच बरोब्बर त्याच ठिकाणी हवाई हल्ला झाला आणि त्यात तो मारला गेला. हा फोन अशा व्यक्तीचा होता, ज्याची हिजबुल्लाच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये चांगलीच ऊठबस होती. त्यामुळेच त्याच्या सांगण्यानुसार तो इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेला होता.
जाहीर केलं होतं ४२ कोटींचं बक्षीस!
फुआदला जेव्हा मारण्यात आलं, त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी, आणखी दोन महिला आणि दोन मुलंही मारली गेली. शिवाय या हल्ल्यात ७०० जण जखमी झाले. १९८३ मध्ये बैरुतमध्ये झालेल्या एका बॉम्बहल्ल्याचाही फुआद मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात तीनशेपेक्षा जास्त अमेरिकी आणि फ्रान्सचे नागरिक मारले गेले होते. अमेरिकेनं त्याच्यावर पाच दशलक्ष डॉलर्सचं (समारे ४२ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केलं होतं.