‘बुक पोस्ट’ बंद करून असे किती पैसे वाचतील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:13 IST2025-01-20T09:12:54+5:302025-01-20T09:13:33+5:30
Book Post: अनेक दशकांपासून चालत आलेली ‘बुक पोस्ट’ सेवा ‘पोस्ट ऑफिस ॲक्ट २०२३’ अन्वये १८ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. त्यानिमित्त...

‘बुक पोस्ट’ बंद करून असे किती पैसे वाचतील?
- प्रदीप चंपानेरकर
(संचालक, रोहन प्रकाशन)
मोठी शहरं असो, लहान शहरं असो, गावं असो नाहीतर खेडी... प्रत्येक ठिकाणचं पोस्ट ऑफिस सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचं ठिकाण ठरतं. का? तर हे खातं जनतेला जिव्हाळ्याच्या अनेक सेवा पुरवत असतं. सर्वसामान्यांमध्ये पोस्ट खात्याविषयी जिव्हाळा निर्माण होण्याचं पहिलं कारण म्हणजे विश्वासार्हता! पत्र असो नाहीतर पैसे; ते कोणत्याही भागात, अगदी दुर्गम भागातही पोहोचणारच.
दुसरं म्हणजे, माफक किंवा काही सेवांचे अगदी स्वस्त म्हणावेत असे दर. थोडं भावनिक म्हणावं असं तिसरं कारण म्हणजे पोस्ट खात्याचा साधेपणा. पोस्ट ऑफिस डोळ्यासमोर आणा. कर्मचारी वर्गाची एकंदर मुळातली ठेवण साधेपणाचीच दिसून येईल. सर्वसामान्यांच्या मानसिक, भावनिक, व्यावहारिक जीवनाशी असलेल्या पोस्ट खात्याच्या नात्याला एक सांस्कृतिक पैलू आहे : ‘बुक पोस्ट’!
अनेक दशकांपासून चालत आलेली ही सेवा १८ डिसेंबर २०२४ रोजी सरकारने ‘पोस्ट ऑफिस ॲक्ट २०२३’च्या अन्वये बंद केली आहे. या सेवेअंतर्गत विविध कार्यक्रमांची निमंत्रणं, लग्नपत्रिका, शुभेच्छापत्र, पत्रकं, पुस्तिका आणि मुख्य म्हणजे सर्व प्रकारची पुस्तकं सवलतीच्या दरात पाठवण्याची सोय होती. अटी दोनच... छापील मजकुरासोबत लिखित मजकूर नसावा आणि ती छापील चीजवस्तू लिफाफ्यात बंद केलेली नसावी, तर खुली असावी.
पुस्तकं समाजोन्नतीत मोठी भूमिका बजावत असतात. पुस्तक वाचनाचे परिणाम झटपट दिसून येत नाहीत. पण, प्रगल्भ समाज घडण्याच्या प्रक्रियेत पुस्तकांचा वाटा मोलाचा असतो. पुस्तक वाचनाचे फायदे व्यापक, दूरगामी स्वरूपाचे असतात. विविध प्रकारची, विविध विषयांवरची पुस्तकं माहितीच्या, विचारांच्या ज्ञानाच्या आणि रंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतात. पुस्तकांची ही महती सर्वज्ञात आहे. परंतु, काहींना हा प्रश्न पडेल की, बुक पोस्ट सेवा बंद झाल्याने, पुस्तकांच्या प्रसारामध्ये असा कोणता मोठा फरक पडणार आहे?
हे खरं आहे की, कुरिअर सेवेने भरपूर हातपाय पसरले आहेत. अनेक जण या सेवेचा पर्याय वापरतात. तरीही पोस्टाचं महत्त्व बऱ्याच प्रमाणात टिकून असण्याचं एक कारण आर्थिक आणि दुसरं कारण म्हणजे पोस्ट खात्याचं देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं जाळं. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पत्र, पैसे, पुस्तकं येऊ शकतात, पोहचू शकतात. कठीण, दुर्गम भाग म्हणून पोस्ट खातं सेवा देणं नाकारू शकत नाही. कुरिअर सेवेला दुर्गम भागात सेवा देण्याचं बंधन नाही.
दुसरा प्रश्न असा, की पुस्तकं पाठवायला पोस्टाची पार्सल सेवा आहेच, तेव्हा बुक पोस्ट सेवा बंद करून पुस्तक प्रसारावर अशी कोणती आपत्ती येणार आहे? - यात खरा प्रश्न आहे तो खर्चाचा. २५० ग्रॅमच्या पुस्तकाला ‘बुक पोस्ट’ने वीसएक रुपये, तर १ किलो वजनाच्या पुस्तकांसाठी ४० रुपये खर्च येत असे. याच्या तुलनेत आता पोस्ट पार्सलचा खर्च ५०० ग्रॅमपर्यंतचा रु. ५७ असेल, तर एक किलोसाठी ९२ रुपये असेल. हा फरक दुप्पटीच्या घरात आहे. या वाढीव खर्चामुळे पुस्तकांपासून दूर जाणं अपरिहार्य होईल, असा वाचकवर्ग आपल्याकडे आहे.
समाजातील दुर्बल घटकापर्यंत शैक्षणिक, माहितीपर, वैचारिक, रंजनपर पुस्तकं पोहोचण्याचा मार्ग सुकर व्हावा, या व्यापक हेतूनेच काही दशकांपूर्वी बुक पोस्ट सेवेची सुरुवात झाली होती. बुकपोस्ट सेवा बंद केल्याने पुस्तकांविषयी निरुत्साह पसरू शकतो. विशेषत: ग्रामीण भागात पुस्तकांची दुकानं नसल्याने त्यांना पुस्तकं मिळणं दुरापास्त आहे.
बुक पोस्ट सेवा मागे घेऊन सरकारच्या तिजोरीत भर पडेल असं नाही. पुस्तकं मागवणं कमी झाल्यास उत्पन्नात घटच व्हायची. समाजोपयोगी कारणांसाठी सरकार आपल्या उत्पन्नाला खार लावून घेत असतंच. बुक पोस्टची सेवा चालू ठेवल्यास त्यात आणखी थोडी भर पडेल इतकंच. शिक्षण, ज्ञानाचा प्रसार होणं आणि ते समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार साहाय्यभूत होण्याची उदात्त परंपरा भविष्यातही चालू राहील. सर्वसामान्यांमध्ये पोस्ट खात्याविषयी असलेला जिव्हाळा टिकून राहील आणि देश खऱ्या अर्थाने विकसित होण्याच्या प्रक्रियेत पोस्ट खात्याचं योगदान कायम राहील.
pradeepchampanerkar@gmail.com