How many men ask their wives, 'Why did you eat?' | किती पुरुष बायकोला विचारतात,‘तू जेवलीस का?’

किती पुरुष बायकोला विचारतात,‘तू जेवलीस का?’

- मेघना ढोके 
(लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक ) 

आयपीएलची मॅच चालू असताना विराट कोहलीने खाणाखुणा करत दूर स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या गर्भवती पत्नी अनुष्का शर्माला ‘जेवलीस का’? - असं विचारल्याचा व्हिडिओ दोनच दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला. भारतातच नव्हे तर भारतीय उपखंडात अगदी शेजारी बांगलादेश -पाकिस्तानातही हा व्हिडिओ शेअर झाला. समाजमाध्यमींनी त्यावर आपली मतं लिहिली. एका पाकिस्तानी ब्लॉगरची प्रतिक्रिया मात्र भारी बोलकी होती. ती म्हणते,  ‘एँ..? ये कोहली तो अजीब शौहर है ! ऐसा भी कोई करता है? हमारे शौहर तो  हम मर जाए, तो पानी ना पुछे !’ - तिच्या या वरकरणी विनोदी मात्र वास्तव सांगणाऱ्या पोस्टवर पाकिस्तानातल्याच नाही तर भारतातल्याही अनेकींनी नव्हे अनेकांनीही लिहिलं की, बायकोला जेवलीस का असं विचारावं असं आपल्याकडे नवऱ्यांच्या डोक्यातही येत नाही. तिनं नवऱ्याच्या हातात ताट आयतं वाढून द्यायचं (तेच, स्वयंपाक करणं ही तर तिचीच जबाबदारी) हीच रीत, आपला पोटोबा झाला, विषय संपला, बायको जेवली काय  नि नाही काय, हू केअर्स?

- या  ‘हू केअर्स?’चं उत्तर विराट कोहलीच्या या काही सेकंदाच्या व्हिडिओत  मिळतं. त्याची पत्नी गर्भवती आहे, ती त्याच्यासोबत दूरदेशी आहे. महत्त्वाचं म्हणजे तो स्वत: प्रोफेशनल असाइनमेण्टवर आहे. त्यात महत्त्वाच्या पदावर. कामाचं प्रेशर त्याच्यावरही मोठंच असेल, आयपीएलचं स्पर्धात्मक स्वरूप हायर ॲण्ड फायर असंच आहे.  म्हणजे हाय प्रेशर गेम. त्यात तो क्षणभर थांबून बायकोला आठवणीनं, काळजीनं  विचारतोय की जेवलीस का?  
- या  ‘जेवलीस का?’साठीच्या खाणाखुणांचं आणि नवरा मोठ्या काळजीनं विचारतोय म्हणून खूश झालेल्या अनुष्काचं मोठ्ठं हसू व्हायरल झालं तेव्हा अनेकांना ते क्यूट, रोमॅण्टिक वाटलंच. त्यातही बायकांना. कारण आपल्या गरोदरपणात आपण सतत ओकत असल्याच्या आणि नवऱ्याला त्याची जाणीवही नसल्याच्या आठवणी बहुसंख्य भारतीय बायकांच्या डोक्यात असतातच असतात. निदान समाजमाध्यमातल्या प्रतिक्रिया तरी तसंच सांगतात. दुसरीकडे  पोक्त वयाच्या काहीजणी असंही म्हणाल्या,  ‘काय तरी चाळे? काय तरी जगजाहीर प्रेमाचं प्रदर्शन, लाडेलाडे? या पब्लिक डिस्प्ले ऑफ अटेन्शनची काय तरी हौस? आमच्यावेळी नव्हतं असं काही!!’ 

- ते  ‘नसणं’ चुकीचं होतं, ते  ‘असायला’ हवं होतं हे मात्र सोयीस्कर नाकारलं गेलं, कारण नवरे कुठं एवढे संवेदनशील असतात हे अनेकींनी मनोमन स्वीकारलेलंच असतं. आणि पुरुष? अनेकांनी तर कोहलीची टरच उडवली की आता हा भाऊ, बायकोलाही विचारणार का, J1 झालं का? तर आता या साऱ्यात प्रश्न असा आहे की, हे आपल्या समाजात (खरं तर भारतीय उपखंडातच) का होतं? का व्हायरल झाला विराटचा व्हिडिओ?

तर जे सामान्य नाही, नवीन वेगळं आहे त्याची बातमी होते. घरोघरच्या लाडावलेल्या, आयतं ताट हातात येणं हा आपला हक्कच आहे असं म्हणत, तसा रुबाब बायकोवर करणाऱ्या  ‘बबड्यां’ना बायकोला जेवण झालं का असं एरव्हीही विचारावंसं वाटत नाही. साधारण या पुरुषी वृत्तीला  ‘तौलिया लाव टाइप्स’ म्हणतात. म्हणजे अंघोळीच्या टॉवेलपासून पाण्याच्या ग्लासपर्यंत सगळं   ‘बसल्याजागी दे’ म्हणत बायकोला ऑर्डर सोडणारे नवरे. एरवी आयता डबा घेऊन कामाला जायची सवय असलेले नवरे कोरोनाच्या वर्क फ्रॉम होमच्या काळातही आयता चहा-नास्ता करून झूम मीटिंगा करत कामाचं प्रेशर  किती वाढलं याचं तुणतुणं वाजवत बसले होतेच.. त्याउलट बायका मात्र मुलं, घरकाम, स्वयंपाक सगळं सांभाळून स्वत:च्या कार्यालयीन कामाचं प्रेशर  ‘सहन’ करत राहिल्या. 

अर्थात, या सगळ्या चर्चेत स्वयंपाक - घरकाम हे जेंडर रोल नाहीत तर आवश्यक कौशल्यं आहेत, हे नेहमीच विसरून जाण्याची सोयीस्कर पळवाट आपल्या व्यवस्थेत आहेच.  इतक्या किमान पातळीवर  जिथे अजून भेद आहेत, तिथं बायकोची काळजी घेणं, रोज घर चालवणं, 
मुलांची देखभाल हे सारे फार पुढचे टप्पे आहेत. म्हणून तर असह्य ताणात काम करणाऱ्या कोहलीने क्षणभर सारं विसरून बायकोला जेवलीस का विचारणं याची  ‘बातमी’ होते. 

- हेही खरं की विराट कोहली हा बदलत्या भारतीय पुरुषांचा प्रतिनिधी आहे. हे पुरुष त्यांच्या विचारातच नव्हे तर वर्तनातही सहजतेने समानतेचा स्वीकार करतात. त्यांची संख्या अत्यल्प असली, तरी ती आहे ही शुभचिन्हं म्हणायची. अगदी सगळेच नव्हे, निदान काही पुरुष विराटसारखे  वागू लागतील तेव्हा गर्भवती बायकोला  ‘जेवलीस का?’ असं काळजीने विचारलं हे  ‘न्यू नॉर्मल’ होऊन बातमीच्या बाहेर जाईल ! 
तोवर मात्र, घरोघरचे बबडे  ‘तौलिया लाव टाइप्स’ वागत आहेत, हे निदान दिलदारीने  मान्य केलं तरी खूप झालं!!
 

English summary :
How many men ask their wives, 'Why did you eat?'

Web Title: How many men ask their wives, 'Why did you eat?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.