प्रियदर्शिनी कर्वेसमुचित एन्व्हायरो टेक, पुणे
मध्यपूर्वेतल्या युद्धामुळे जगभरातील खनिज इंधनाच्या वितरणाची व्यवस्था कोलमडते आहे. काही दिवसांपूर्वीपासून भारतात व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कपात झाली आणि घरगुती स्वयंपाकासाठी नवीन गॅस सिलिंडर मागवण्याचा कालावधीही वाढवला गेला. यामुळे अचानक लाकडे आणि तत्सम इंधनांवर चालणाऱ्या चुली, शेगड्या, सौरचुली इत्यादी पर्यायांची शोधाशोध सुरू झाली आहे.
गेली दोन दशके जगातील सर्व क्षेत्रांत खनिज इंधनांकडून नूतनक्षम इंधनांकडे जाणे सुरू झाले आहे. स्वयंपाकघरात मात्र खनिज इंधनच वापरा असा प्रचार झाला आहे. सरपण, गोवऱ्या, इत्यादीवर चालणाऱ्या पारंपरिक चुलींच्या धुराचा स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याकडे २००२ साली जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले. या विषयातील जागतिक तज्ज्ञ कै. डॉ. कर्क स्मिथ यांनी ‘सायन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात लेख लिहून, सर्व घरांमध्ये एलपीजी पोहोचवला तर जागतिक तापमानवाढीत अल्पशी भर पडेल; पण लाखो स्त्रियांचे आयुर्मान वाढेल, असे मत व्यक्त केले. भारतात ग्रामीण भागात एलपीजी जोडण्या वाढवण्याच्या शासकीय मोहिमेमागे हेच प्रेरणास्रोत होते. पण नवीकरणीय ऊर्जेच्या स्वयंपाकघरातील वापरावर संशोधन-प्रसारावर भर दिला तर तापमानवाढीत घट आणि महिलांच्या आयुर्मानात वाढ या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य होऊ शकतात, याकडे मात्र दुर्लक्ष केले गेले.
१९८०च्या दशकापासून शासकीय अनुदानातून आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमधून सुधारित चुली, बायोगॅस संयंत्रे, सौरचुली इत्यादींच्या प्रचाराचे अनेक प्रयत्न होऊनही त्यांना यश आले नव्हते, हेही खरे आहे. पण योजना राबविणाऱ्या शासन यंत्रणा तसेच या स्वयंपाक साधनांचे (बव्हंशी पुरुष) संशोधक या दोघांनीही ग्रामीण महिलांच्या गरजांचा विचारच केलेला नव्हता हे यामागचे कारण होते. सरपणाचा वापर आणि स्वयंपाकघरातले प्रदूषण कमी करणे, या सूत्रांवर आधारित शेगड्यांवर भाकरी, रोटी बनवणे अवघड झाले. मातीची चूल स्वयंपाक करताना गरम होते आणि या उष्णतेचाही ग्रामीण महिला अन्न गरम ठेवणे, दूध तापवणे, दुसऱ्या दिवशीचे इंधन कोरडे करणे, इत्यादी प्रकारे वापर करतात. पण चूल गरम होणे म्हणजे उष्णता वाया जाणे या समजातून उष्णतारोधक आवरणाच्या थंड राहाणाऱ्या शेगड्या दिल्या गेल्या. ग्रामीण जीवनशैलीतील जेवणाच्या वेळा, जागेची उपलब्धता.. याचा विचार न करता सौरचुली वाटल्या गेल्या. शेणावर आधारित बायोगॅस संयंत्रांनी महिलांचे काम वाढवले. स्वयंपाकघरातल्या गरजा न भागवणारी, वेळखाऊ स्वयंपाक साधने महिलांनी नाकारली.
२०१५ साली पॅरिस कराराद्वारे तापमानवाढीच्या विरोधात जागतिक लढ्याला दिशा मिळाली. त्यामुळे खनिज इंधनांकडून नवीकरणीय ऊर्जासुविधांकडे संक्रमण सुरू झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत हे संक्रमण मंदावले; पण थांबले नाही. याचा परिणाम म्हणजे पुढच्या दोन-तीन दशकांत घरगुती स्वयंपाकासाठीही खनिज इंधनांचा तुटवडा होऊ लागेल. त्यामुळे ग्रामीण भागात नवीकरणीय ऊर्जेवर भर द्यायला हवाच; पण शहरी स्वयंपाकघरातील एलपीजीलाही नवीकरणीय पर्याय निर्माण करायला हवेत. ग्रामीण भागासाठी थोडे तरी काम झालेले आहे, पण शहरी घरांसाठी यावर विचारही झालेला नाही.
गेली सुमारे दहा वर्षे आम्ही काही समविचारी लोक मिळून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मूठभर लोकांनी स्वतःच्या पदराला खार लावून केलेल्या तंत्रज्ञान विकासाच्या ज्या मर्यादा असतात, त्या आमच्या प्रयत्नांनाही आहेत. २०१९ पासून ‘कुकिंग फॉर क्लायमेट’ या मोहिमेद्वारे शहरी आणि ग्रामीण स्वयंपाकाच्या वास्तविक गरजा भागवू शकणाऱ्या काडीकचऱ्यावर तसेच जैवकचऱ्यापासून तयार केलेल्या कोळसा, इंधनकांडी यांवर चालणाऱ्या निर्धूर चुली व शेगड्या, ओल्या कचऱ्यावर चालणारी बायोगॅस संयंत्रे आणि विविध रचनांच्या सूर्यचुलींची प्रात्यक्षिके करायला आम्ही सुरुवात केली. वेगवेगळ्या व्यासपीठांवर मी व माझे सहकारी सातत्याने हा विषय मांडत आलो आहोत.
आत्ताच्या गॅसटंचाईकडे तात्पुरते संकट म्हणून न पहाता आपल्या स्वयंपाकघरात ऊर्जा स्वातंत्र्य आणण्याची संधी म्हणून पहावे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंपाकघरांच्या वेगवेगळ्या गरजा विचारात घ्याव्या लागतील. काही ठिकाणी खरकट्या अन्नावर चालणारे बायोगॅस संयंत्र हा सर्वोत्तम पर्याय असेल, तर काही ठिकाणी सूर्यचूल वापरणे सर्वात सोयीचे असेल. काही ठिकाणी काटक्याकुटक्यांवर चालणारी निर्धूर शेगडी आणि कांडी कोळशावर चालणारा वाफेचा कुकर असा एकत्रित पर्याय योग्य ठरेल. यामध्ये अशा प्रकारची नवीकरणीय साधने वापरण्यासाठी अनुकूल अशी स्वयंपाकघराची वास्तुरचना करणे, हेही विशेषतः सदनिकांमध्ये राहाणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. वास्तुविशारदांनी याचा गांभीर्याने विचार करावा. या साऱ्या व्यवस्थेत गॅस व वीज यांवर चालणाऱ्या स्वयंपाक साधनांनाही स्थान आहे; पण कोणत्याही एका इंधन-साधन जोडीवरचे १०० टक्के अवलंबित्व टाळायला हवे.