मोनेचा हा धुकाळ, केशरी सूर्योदय इतका अस्थिर, अपूर्ण कसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:11 IST2026-01-31T11:11:01+5:302026-01-31T11:11:25+5:30
इम्प्रेशनिस्ट कला चळवळीचा मार्ग इथून सुरू झाला. क्लोद मोने या चित्रकाराने सूर्योदय ही चित्रकलेकडे नव्या नजरेने पाहण्याची सुरुवात होती.

मोनेचा हा धुकाळ, केशरी सूर्योदय इतका अस्थिर, अपूर्ण कसा?
- शर्मिला फडके
(ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका)
बरीचशी चित्रं पाहताना आपण लगेच म्हणतो- वा, सुंदर आहे हे! काही मोजकी चित्र पाहताना मनात विचार येतो, प्रश्न पडतात, चित्र आवडतं, ओळखीचं असतं, तरीही वाटतं नेमकं काय पाहतो आहोत आपण?
चित्र पाहून विचारात पडण्याची, स्वत:ला प्रश्न विचारण्याची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगता येऊ शकतं का? - तर हो. क्लोद मोने या चित्रकाराचं ‘इम्प्रेशन: सनराईज’ हे चित्र १८६० साली पॅरिस मधल्या एका कलादालनात प्रदर्शित होताच एका संपूर्ण वेगळ्या, नव्या प्रवाहाची सुरुवात या चित्रापासून झाली.
चित्र अगदीच साधं. धुकाळ वातावरणात अस्पष्ट उठून दिसणाऱ्या केशरी लाल रंगाच्या सूर्याचे समुद्राच्या पाण्यावर उमटलेले किरणांचे कवडसे चितारलेलं एक निसर्ग दृश्य. फ्रान्समधील ले हाव्हर बंदरावरच्या एका पहाटेचं हे दृश्य.
धूसर करड्या पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या, शहर त्यात दिसतं. पण चित्र त्यांचं नाही. आकाश, समुद्र आणि जमीन यांच्यातली सीमारेषा अस्पष्ट आहे. त्यांच्या रंगछटेत सलगता आहे. सौम्य निळसर राखाडी, पिवळसर केशरी, मधेच जरा हिरव्या प्रकाशाचा पाऊस पडतो आहे कॅनव्हासवर आणि या सगळ्यात एक छोटासा केशरी सूर्य. ठाशीव रेखाटन नाही, स्पष्ट आकार नाहीत. प्रथमदर्शनी चित्र अपूर्ण वाटू शकतं, कुणीतरी घाईघाईत रंग लावून थांबलं आहे.
पॅरिसच्या काही वेगळ्या विचारांच्या तरुण चित्रकारांनी भरवलेल्या या प्रदर्शनातली सगळीच चित्रं तशी होती. सामान्य कलारसिक, कला समीक्षक गोंधळून गेले. ऐतिहासिक, पौराणिक, थोरा-मोठ्यांची व्यक्तिचित्रं अशा लोकप्रिय विषयावरचं एकही चित्र नव्हतं. मोकळ्या निसर्गात जे पाहिलं, पाहून जे वाटलं ते जसंच्या तसं झपाट्याने रंगवण्याचा प्रयत्न होता. अचूकतेचा, भव्यतेचा, सौंदर्याचा अट्टाहास नव्हता. ब्रशचे फटकारे जलदगतीचे, विस्कळीत. रंग रचनेत ठाशीवपणा नाही.
मोनेचं सूर्योदयाचं चित्र त्यातलं प्रातिनिधिक. धुकाळ वातावरणात, पाण्यावर सूर्य उगवत असतानाचा क्षण मनावर जसा उमटला तसा त्यात रंगवला होता. सूर्यप्रकाशाचा एकाचवेळी काहीसा थंड, तरीही उबदार अनुभव. संवेदनेला जाणवलेला क्षण.. मोनेनं सूर्योदयाच्या वेळी बंदर कसं दिसत होतं ते रंगवलं नाही; बंदर त्याच्या संवेदनांना नेमकं कसं जाणवलं हे त्याने रंगवलं आहे.
सूर्योदयाचं दृश्य क्षणभंगुर आहे. बघता बघता प्रकाश बदलेल, रंग बदलतील, वातावरण वेगळं होईल. मोनेचा प्रयत्न त्या अचूक क्षणाला पकडण्याचा आहे. त्याच्या अस्थिरतेसकट. म्हणूनच ब्रशस्ट्रोक्स हलके, मोकळे, थरथरते वाटतात. हाच चित्राचा गाभा. हे दृश्य नाही; हा अनुभव आहे. इम्प्रेशनिस्ट कला चळवळीचा मार्ग इथून सुरू झाला. एका समीक्षकांनी उपहासाने म्हटलं होतं: हे चित्र नाही, केवळ एक इम्प्रेशन आहे. त्या वाक्यातूनच ‘इंप्रेशनिझम’ या कला-चळवळीचं नाव जन्माला आलं. झालेली टीका, उपहास पुढे इतिहास ठरला. आधुनिक कलेचा, पुढे अखंड विस्तारत गेलेला अध्याय इथून सुरू झाला.
उत्तरं शोधायला प्रवृत्त करणाऱ्या या रस्त्यावरचा प्रवास आजही संपलेला नाही. संपूही नये. प्रश्न संपले की पुढे पूर्णविराम येतो, नव्या शोधाच्या, सर्जनशीलतेच्या शक्यता संपतात. मानवनिर्मित कलेच्या बाबतीत तसं होण्याची शक्यता नाही, नसावी. मोनेचा सूर्योदय ही चित्रकलेकडे नव्या नजरेने पाहण्याची सुरुवात होती.
sharmilaphadke@gmail.com