आजच्या ‘जेन झी’चे ‘जेन एक्स’ आई-बाबा किती, का वेगळे होते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 07:58 IST2026-02-09T07:58:01+5:302026-02-09T07:58:30+5:30
काहीशा सावध, स्वावलंबी ‘जेन एक्स’ला आधी नीट समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांनीच आजच्या जेन झी पिढीला वाढवलेलं आहे.

आजच्या ‘जेन झी’चे ‘जेन एक्स’ आई-बाबा किती, का वेगळे होते?
राही श्रु. ग.
सीनिअर रिसर्च फेलो
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
‘मला वाटतं या जगात जर देव असेलच तर तो आपल्यापैकी कोणात नसेल. माझ्यात किंवा तुझ्यात तो सापडणार नाही, आपल्यादरम्यान असलेल्या या जागेत तो सापडेल. या जगात जर कसली जादू असेल तर ती कोणी आपल्याला मनातलं काही सांगत असताना ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आहे. कदाचित आपण समोरच्याला कधीच समजून घेऊ शकणार नाही, म्हणून काय झालं? उत्तर आपल्या प्रयत्नात दडलं आहे.’
१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बिफोर सनराईज’ या सिनेमात सेलीन जेसीशी बोलत असते. सेलीन ही फ्रेंच मुलगी आणि जेसी हा अमेरिकन मुलगा रात्रभर व्हिएन्नामध्ये चालत, बोलत राहतात. स्वतःविषयी, एकमेकांविषयी, जगाविषयी. शीतयुद्धानंतरच्या जगात आपलं तारुण्य घालवणारे हे दोघे पक्के पाश्चिमात्य ‘जेन एक्स’चे प्रतिनिधी आहेत. आजच्या मिलेनियल्स आणि जेन झी यांचे हे पालक. उच्चशिक्षित, पण जेमतेम परवडणाऱ्या नोकऱ्या करू शकणारे, आधुनिक जगात वाढणारे पण काहीसे बावरून दिशाहीन वाटू लागलेले, प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल खोलवर विचारात रमणारे सेलीन आणि जेसी यांच्या रोमँटिक जगात आपण हरवून जातो आणि त्यांच्यासोबत रात्रीच्या निःशब्द प्रहरातल्या युरोपियन शहरात अंतर्मुख होऊन जातो.
भारतीय परिप्रेक्ष्यात बेबी बूमर्स आणि जेन एक्स यांच्याच काळात जन्मलेले लोक मात्र जणू वेगळ्या पिढ्यांमधले वाटावेत इतकी वेगळी परिस्थिती आणि विचारप्रक्रिया असलेले आहेत. तरीही या पाश्चात्य ‘जेन एक्स’ला समजून घेतलं पाहिजे. कारण यांनीच आजच्या जेन झीला वाढवलेलं आहे. १९९०च्या दशकात डग्लस कूपलँड यांच्या ‘जनरेशन एक्सः टेल्स फॉर ॲन ॲक्सिलरेटेड कल्चर’ या कादंबरीत विशीतल्या अशा तरुणांचं चित्रण होतं जे आर्थिक ताण, सच्च्या नातेसंबंधांचा शोध आणि चंगळवादी बाजारपेठेच्या तिठ्यावर धास्तावून उभे होते.
१९६५ ते १९८०च्या दरम्यान जन्मलेले लोक हे जेन एक्स. ही पिढी मोठ्या आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर वाढली. अमेरिकेत ही पहिली पिढी, ज्यांचे आई-वडील दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडू लागले होते. शाळेतून स्वतः कुलूप उघडून घरी येणारी पहिली पिढी असल्याने तिला ‘लॅच की’ जनरेशन असंही म्हणतात. अमेरिकेत या पिढीने आईवडिलांचं विभक्त होणंही पाहिलं. बरेच जेन एक्स तरुण एकल पालकांसोबत वाढले. यांच्या बालपणातून त्यांना स्वावलंबन आणि कल्पकतेचे धडे मिळाले.
समस्यांमधून व्यावहारिकपणे मार्ग काढण्याचा त्यांचा दृष्टिकोन, कामाबरोबरच आयुष्यातल्या सुखदुःखांसाठी वेळ आणि ऊर्जा देण्याची त्यांची वृत्ती यासाठी ते ओळखले जातात. बूमर्सच्या सरळसोट आशावादापुढे जेन एक्सची जगाकडे पाहायची नजर काहीशी सावध, संशयी वाटते. ८०च्या दशकातली एड्सची साथ आणि सरकारने ड्रग्सच्या विरोधात उचललेली पावलं या पार्श्वभूमीवर ही पिढी वाढली. राजकीय बाबतीत जेन एक्स हे बूमर्सपेक्षा अधिक उदारमतवादी आणि विविधतेचे समर्थक समजले जातात. अशा पालकांनी वाढवलेली मिलेनियल आणि जेन झी मुलं त्यांच्या जगाविषयीच्या दृष्टिकोनातून बरंच शिकत, स्वतःला घडवत गेली. मोठ्या सामाजिक क्रांतीतून गेलेल्या या जेन एक्सने आजच्या जेन झीकडे पाहताना आपल्या तारुण्याकडे मागे वळून पाहायला हवं.
raheeshrutiganesh@gmail.com