How can attacks on doctors be prevented? | डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखता येतील?

डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखता येतील?

प्रवीण दीक्षित (‘मॅट’चे उपाध्यक्ष, राज्याचे माजी पोलीस महासंचालक) -

कोरोना महामारी आल्यावर डॉक्टरांसह विविध स्तरांवरचे आरोग्यसेवक रुग्णांच्या मदतीला धावून आले. ते त्यांचे काम उत्तम प्रकारे करत असताना त्यांच्यावरच हल्ले होऊ लागले. हे हल्ले अजूनही चालूच आहेत. अशा घटनांची गय होणार नाही, असे गुन्हे अजामीनपात्र ठरवण्यासह केंद्रीय कायद्यानुसार हल्लेखोरांना कठोर शिक्षा होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी वेळोवेळी बजावले आहे. डॉक्टरांविरुद्ध हिंसा रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारसह इतर राज्यांनीही कायदे केले आहेत. केंद्रीय स्तरावरून एवढी कठोर दटावणी मिळाल्यानंतर आणि आवश्यक ते कायदे केल्यानंतरही डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. हे हल्ले होतच राहिले. शिवाय समाजमाध्यमातून या घटना वेगाने पसरत राहिल्या. अशा एखाद्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाल्याचेही कुठे निदर्शनास आले नाही, त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल, असेही काही घडले नाही.

विविध सरकारी इस्पितळात हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर त्या रोखण्याच्या, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मला बोलावले गेले. वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधीक्षकांशी सल्लामसलत करून इमर्जन्सी वॉर्डस ठरवले गेले. तेथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सशस्र जवान नेमले गेले. या जवानांकडे अतिरिक्त कुमक मागवण्यासाठी संपर्कसाधने पुरवण्यात आली. जमाव तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना कसे हाताळायचे याचे खास प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते. निवडक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात.
या व्यतिरिक्त इमर्जन्सी वॉर्डस्मध्ये कोण जाऊ शकेल यावर कठोर नियंत्रणे घालण्यात आली. नातेवाइकांच्या भेटीच्या वेळेवरही बंधने घालण्यात आली. कोणत्याही आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अलार्म यंत्रणेची सोय करण्यात आली.
सर्वसाधारणत: याबाबतची एक सिस्टीम उभारली गेली आणि ती चांगल्याप्रकारे काम करते आहे, हे दिसूही लागले. या सगळ्यामुळे निवासी डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले. त्यांना तणावमुक्त वातावरणात काम करता येईल असे दिसू लागले असले, तरीही एकूण परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणखीही बराच वाव आहे.खासगी रुग्णालयातील परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे. अशा ठिकाणी बहुतेक डॉक्टर्स एकेकटे काम करतात. जेथे हॉस्पिटल आहे अशा फार थोड्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे यासारखे उपाय योजलेले दिसतात, अर्थात तरीही तेथील परिस्थितीत फार फरक पडलेला नाही; म्हणूनच अतिरिक्त उपायांची गरज आहे.

आरोग्य केंद्रावरील हिंसेची कारणे ‘सवयीची’ नसतात. कोणत्या कारणाने तेथील परिस्थिती हाताबाहेर जाईल, याचा अंदाज येणे मुश्कील असते. त्याशिवाय अपुरे प्रशिक्षण, सुविधांचा अभाव आणि अशा घटना हाताळण्यासाठी निश्चित धोरण ठरलेले नसणे; याहीमुळे अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते.

त्यासाठी सर्वात महत्त्वाची अशी एकच गोष्ट आहे : संबंधित कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकरवी सातत्याने दिले जाणारे प्रशिक्षण ! रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, तंत्रज्ञ, वॉर्डबॉईज, परिचारिका, स्वागतिका, बिलिंग क्लार्क अशा सगळ्यांची प्रत्येक पातळीवरील गरज पाहून प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागेल. काय करावे, काय करू नये याच्या अमलात आणता येतील अशा बारीकसारीक सूचना द्याव्या लागतील.

सहभागी सदस्यांनी केसेसचा अभ्यास करावा, त्यावर चर्चा करावी, तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यावर निष्कर्ष काढावेत. जिथे काही चुका होतील त्या नोंदवाव्यात. साधारणत: हे केले जात नाही. आधीच्या घटनांचा तपशील उपलब्ध असेल तर गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी काही समान कारणे त्यात सापडतात का? - हे शोधता येईल. हे रेकॉर्डिंग संबंधितांना वेळोवेळी दाखवून काय चुकले, ते कसे रोखता आले असते हे सांगता येईल. आणखी एक गोष्ट म्हणजे पोलीस किंवा न्यायालयांकडे अशा घटना न नेण्याकडेही कल असतो. तो टाळला पाहिजे.
आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात होणारा हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकेत पुढील मार्गदर्शक तत्त्वे अनुसरली जातात : १) व्यवस्थापनाची बांधिलकी २) कर्मचाऱ्यांचा सहभाग ३) कार्यस्थळाचा अभ्यास आणि धोके ओळखणे ४) संकट रोखणे आणि नियमन ५) सुरक्षितता आणि आरोग्य प्रशिक्षण ६) घटनांच्या नोंदी आणि मूल्यमापन.

हिंसा होऊ नये म्हणून हे सर्व केले तरी ती होणारच नाही याची हमी देता येत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी थेट संबंध येणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्व सदस्यांनी एकत्र येणे, संकटाचा सामना करण्याची तयारी, चांगले धोरण आणि प्रमाणित परिचालन पद्धती, सगळ्याची अधुनमधून रंगीत तालीम, कायदा यंत्रणेशी सतत सहयोग अशा काही गोष्टी केल्या तर आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले टाळता येतील. डॉक्टर मंडळींनी रुग्णांबद्दल सहानुभूती बाळगून परिस्थितीची सुस्पष्ट जाणीव वेळोवेळी दिली तरीही अनेक अनुचित प्रसंग टाळता येतील.
 

Web Title: How can attacks on doctors be prevented?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.