इतिहासाची अनास्था
By Admin | Updated: December 16, 2015 04:15 IST2015-12-16T04:15:03+5:302015-12-16T04:15:03+5:30
गड, किल्ले हे त्या त्या प्रदेशातील इतिहासाचे मूक साक्षीदार. तरीही शौर्याची प्रेरणास्थळे. पण याबाबत सरकार आणि समाज या दोघांची अनास्था नवी नाही. संदर्भ नवा असा की कन्नड तालुक्यातील

इतिहासाची अनास्था
- सुधीर महाजन
समृद्ध इतिहासाचा वारसा असणाऱ्या स्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
याची दखल कोण घेणार? पण इतिहासाचे मारेकरी आपणच आहोत.
गड, किल्ले हे त्या त्या प्रदेशातील इतिहासाचे मूक साक्षीदार. तरीही शौर्याची प्रेरणास्थळे. पण याबाबत सरकार आणि समाज या दोघांची अनास्था नवी नाही. संदर्भ नवा असा की कन्नड तालुक्यातील अंतुर किल्ल्यावरील तोफ चोरीला गेली ही घटना कधी घडली हे नक्की सांगता येत नाही. पण तोफ गायब झाली हे लक्षात आले. मराठवाड्यात बेलाग किल्ले नसले तरी तब्बल १६ किल्ले आहेत. अगदी यादीच द्यायची झाली तर कंधार, औसा, उदगीर, भांक्षी, नळदुर्ग, परंडा, धारूर, धर्मापुरी, देवगिरी, अंतुर, सुतोंडा, बेडका, जंजाळा, वेताळवाडी, लहुगड आणि किले अर्क. यातील बहुतेक किल्ले भुईकोट तर देवगिरी, अंतुर, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी, लहुगड हे दुर्गम डोंगरी भागातील. शेकडो वर्षांपासून ऊन-पाऊस अंगावर झेलत लोकांच्या कुदळ फावड्याचे मार सहन करत अस्तित्व टिकवून आहेत. देवगिरी, परंडा, वेताळवाडी, उदगीर, औसा, कंधार या किल्ल्यांची स्थिती बरी म्हणावी. त्यात देवगिरीची चांगली कारण त्याकडे सर्वांचे लक्ष आणि पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध.
अंतुर किल्ल्यावरील तोफेच्या चोरीचे प्रकरण हे किल्ल्यांविषयी किती अनास्था आहे याचे दर्शन घडविणारे. ज्या राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हा किल्ला येतो त्या अधिकाऱ्यांची धक्का देणारी पहिली प्रतिक्रिया होती, अशी तोफच किल्ल्यावर नव्हती. पुढे ही चूक त्यांच्या लक्षात आली. पण किल्ल्यावर किती तोफा, कुठे कुठे आहेत, याची यादीच या खात्याकडे नसावी. सोयगाव तालुक्यातील किन्हीचे गडप्रेमी सुभाष जोशी यांनी एप्रिल १३ मध्ये किल्ले सफाई केली. त्या वेळी ही तोफ गडप्रेमी मुलांच्या मदतीने दगडावर मांडून ठेवली होती. या तोफेच्या अस्तित्वाचा हा शेवटचा दुवा. पुढे ती किती दिवस होती हे सांगता येत नाही.
विषय तोफेचा आहे तर देवगिरी किल्ल्यावरील महाकोटावर आजही चार-पाच तोफा पडलेल्या आहेत. तिथे १९८० च्या सुमारास थोड्या थोडक्या नव्हे, तर तब्बल साडेतीनशे तोफा होत्या. त्या आता २५० आहेत. विशेष म्हणजे मोगल, निजाम, ब्रिटिश, पोर्तुगिज अशा वेगवेगळ्या बांधणीच्या. ओतीव, बांगडी अशा वैविध्य असलेल्या तोफा असल्याने तोफांचे एक राष्ट्रीय पातळीवरील संग्रहालय येथे होऊ शकते पण याचा विचार होत नाही. पुरातत्व खात्यातील वस्तूंच्या चोरीचा तपास लागतच नाही. चार महिन्यांपूर्वी देवगिरी किल्ल्यातील म्युझियममधून गणपतीच्या चार मूर्ती, दोन शिवलिंग, तीन माळा आणि निजामकालीन पुरातत्व खात्याचा बिल्ला अशा दहा वस्तूंची चोरी झाली होती. त्याचा गुन्हा दाखल होण्या पलीकडे काहीही झाले नाही. आता अंतुरची तोफ गेली. जंजाळा किल्ल्यावरील तोफ शेजारच्या शेतात अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत पडलेली आहे. ती तोडण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. केंद्रीय पुरातत्व खात्याची अडचणच वेगळी. त्यांचा निधी ४० कोटी. यात त्यांना देशाचा कारभार पाहायचा आहे. राज्य आणि केंद्र या दोन्ही पुरातत्व विभागांकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. ऐतिहासिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी यंत्रणा नाही. मानवी हस्तक्षेपामुळे या वास्तूंचे मोठे नुकसान होत आहे. गड, किल्ल्याच्या दुरुस्तीचे नियोजन नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सह्याद्रीमधील किल्ल्यांवर जास्त लक्ष दिसते.
मराठवाड्यातील किल्ल्यांविषयी लोकसहभागाचीही कमतरता आहे. पर्यटनासाठी एवढ्या संधी असतानाही पर्यटनविकास महामंडळाच्या माहिती पत्रकात देवगिरीशिवाय दुसऱ्या किल्ल्यांना स्थान नाही. औरंगाबाद शहरात ऐतिहासिक ५२ दरवाजे आहेत, याचा उल्लेख नाही. अहमदाबाद शहरात तीनच दरवाजे आहेत पण ते त्यांनी पर्यटनस्थळ बनविले. याचे मार्केटिंग आपल्याला करता आले नाही. घृष्णेश्वर, औंढा, परळी या मंदिरांशिवाय वडेश्वर, मुर्डेश्वर, रुद्रेश्वर, रणेश्वर, अन्वा येथेही अप्रतिम मंदिरे आहेत. त्यांची ओळख परिसराच्या बाहेर नाही. घटोत्कच लेणी ही अजिंठ्याच्याही पूर्वीची, तिच्याकडे लक्ष नाही. समृद्ध इतिहासाचा वारसा असणाऱ्या या स्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याची दखल कोण घेणार? दरवेळी घोषणा होतात पण त्या वायबार ठरतात. इतिहासाचे मारेकरी आपणच आहोत.