इतिहासाची रंगरंगोटी!

By Admin | Updated: October 22, 2014 04:39 IST2014-10-22T04:39:01+5:302014-10-22T04:39:01+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे

History colorcolor! | इतिहासाची रंगरंगोटी!

इतिहासाची रंगरंगोटी!

सूर्यकांत पळसकर

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे. मोदी सरकारला भारताचा संपूर्ण इतिहासच आरएसएसच्या विचारांनी रंगवून घ्यायचा आहे. आधी प्राचीन भारताचा इतिहास रंगविला जाईल, असे दिसते. प्राचीन इतिहास नव्याने लिहिण्यासाठी एक संशोधन प्रकल्प संस्कृत विभागाने जाहीर केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी काही निष्कर्षही विभागाने जाहीर केले आहेत. ‘आर्य हे मूळचे भारतीयच आहेत. ते बाहेरून भारतात आले नसून, भारतातून जगाच्या इतर भागात गेले. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथे सापडलेली प्राचीन सिंधू संस्कृती ही मूळची आर्यांचीच संस्कृती आहे.’ हा या निष्कर्षांचा गोषवारा सांगता येईल. इतिहासातील पुरावे पाहून निष्कर्ष काढण्याची प्रथा जगभरातील इतिहासकार पाळतात. दिल्ली विद्यापीठाने मात्र आधी निष्कर्ष जाहीर केले आहेत.
अलीकडेच गुजरातच्या राज्यपालपदी बसलेले भाजपाचे कडवे नेते ओ.पी. कोहली यांच्या खास उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा झाली. ‘इतिहास संशोधना’चा हा प्रकल्प हाती घेण्याची गरज का भासली याची तीन प्रमुख कारणे संस्कृत विभाग प्रमुख रमेश भारद्वाज यांनी जाहीर केली. ती अशी : १. प्राचीन हस्तलिखिते आणि मजकुरांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संस्कृती ही परकीय संस्कृती नाही हे स्पष्ट होते. २. फ्रेंच आणि संस्कृत भाषेच्या उच्चारात मोठे साम्य आहे. फ्रेंचमध्ये संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या नियमांचाही प्रत्यय येतो. ३. प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतात. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, आर्य हे भारतातून जगाच्या इतर भागात स्थलांतरित झाले.
ऋग्वेद हा संस्कृत भाषेतील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्यापेक्षा कोणतेही प्राचीन हस्तलिखित उपलब्ध नाही. मग, भारद्वाज आणखी कोणत्या प्राचीन हस्तलिखिताबाबत बोलत आहेत? फ्रेंच ही मराठी भाषेप्रमाणेच एक आधुनिक भाषा आहे. मराठी जशी प्राकृतापासून बनली, तशी फें्रच ही व्हल्गर लॅटिनपासून बनली. ऋग्वेदानंतर सुमारे ३ हजार वर्षांनी फ्रेंच भाषा अस्तित्वात आली. व्याकरणकार पाणिनीचा जन्मही ऋग्वेद लिहिला गेल्यानंतर २ हजार वर्षांनी झाला.
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, फ्रेंच भाषेचा जन्म
झाला तेव्हा संस्कृत भाषा मृत झालेली होती आणि पाणिनीने संस्कृताचे व्याकरण लिहिले तेव्हा फ्रेंच भाषेचा जन्मही झालेला नव्हता! असे असले तरी वैदिक संस्कृत, पाणिनी आणि फ्रेंच भाषा या तिघांचा मेळ घालण्यात येत आहे. या लोकांच्या पांडित्याला सलामच केला पाहिजे.
‘प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतात’, हे वाक्य भारद्वाज यांनी ‘आपण काही तरी महान शोध लावल्या’च्या थाटात उच्चारलेले दिसते. ही शुद्ध लबाडी आहे. मुळात आर्य आक्रमणाचा सिद्धांतच या भाषिक साम्याच्या पायावर उभा आहे. प्रख्यात जर्मन विद्वान मॅक्समुल्लरने हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला. मॅक्समुल्लर भाषाशास्त्रज्ञ होता. तो संस्कृतच्या अभ्यासासाठी भारतात आला होता. प्राथमिक नात्यासंबंधींच्या शब्दांचा अभ्यास करताना त्याला लॅटिन आणि संस्कृतातील साम्य दिसले. उदा. संस्कृतात आईला मातृ म्हणतात.
या शब्दात म, त आणि र हे वर्ण येतात. लॅटीनमध्ये आईला मदर म्हणतात. त्याच्या स्पेलिंगमध्ये म, त आणि र हे तीन वर्णच आहेत. संस्कृतात वडिलांना पितृ आणि भावाला भ्रातृ म्हणतात. लॅटिनमध्ये ही नामे अनुक्रमे फादर आणि ब्रदर अशी आहेत. या शब्दांतही वर्णांचे पूर्णत: साम्य आहे. इतरही अनेक समान वर्ण असलेले शब्द त्याला आढळून आले. त्यातून मॅक्समुल्लरने आर्यआक्रमणाचा सिद्धांत मांडला. याच साम्याचा आधार घेऊन दिल्ली विद्यापीठाचा संस्कृत विभाग (पर्यायाने मोदी सरकार) आता ‘आर्य हे भारतातून बाहेर गेले’, असा निष्कर्ष काढणार आहे.
मॅक्समुल्लरने भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये एक पॅटर्न शोधून काढला. या भाषांनी दोन वर्तुळे केली आहेत. मधल्या भागात हिंदी आणि तिच्या बोली भाषांचे वर्तुळ असून, बाहेरच्या बाजूने पंजाबी, सिंधी, काश्मिरी, गुजराथी, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी या प्रादेशिक भाषांचे वर्तुळ आहे. या सर्व भाषा एकमेकांच्या बहिणी आहेत! या पॅटर्नमधून मॅक्समुल्लरने अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला.
आर्यांनी भारतात टोळ्या टोळ्यांनी असंख्य आक्रमणे केली. आधी आलेल्या टोळ्या सप्तसिंधूंच्या प्रदेशात स्थिर झाल्या होत्या; मात्र नंतर आलेल्या टोळ्यांनी त्यांना गंगेच्या खोऱ्यापर्यंत खाली ढकलले. मागाहून आलेल्या टोळ्यांनी आधी आलेल्या टोळ्यांच्या भोवती कडे केले. मधल्या भागातील आर्यांच्या भाषेतून हिंदी आणि तिच्या बोली भाषा तयार झाल्या, तर बाहेर कडे करून राहिलेल्या आर्यांच्या भाषांतून प्रादेशिक भाषा तयार झाल्या, असे मॅक्समुल्लर म्हणतो. आर्य इथलेच आहेत, असा दावा करायचा असेल, तर मॅक्समुल्लरचा हा सिद्धांत खोडून काढावा लागेल.
आणखीही अनेक मुद्दे आहेत. सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. या उलट ऋग्वेदातील आर्यांच्या संस्कृतीला घोड्याशिवाय अस्तित्वच नाही. सिंधू संस्कृती शहरांची संस्कृती आहे. या उलट भटक्या आर्यांचा मुख्य देव इंद्र हा ‘पुरंदर’ म्हणजे शहरे उद्ध्वस्त करणारा आहे. सिंधू संस्कृतीत शेती होत होती; त्यामुळे कालवे आणि धरणे होती. इंद्र मात्र बांधलेले कालवे उद्ध्वस्त करणारा आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने सप्तसिंधूंचे पाणी मुक्त केले, अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारे या दोन्ही संस्कृतींचे मूळ रंगरूप कुठल्याच बाबतीत जुळत नाही.
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये
मुख्य उपसंपादक आहेत. )

Web Title: History colorcolor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.