कोल्हापूर, सांगलीतील पुरानंतर आरोग्याचे नियोजन महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:00 AM2019-08-14T05:00:34+5:302019-08-14T05:37:54+5:30

कोल्हापूर, सांगलीतील महापुरानंतर राज्यातून व देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. यात डॉक्टरांचा सहभागही लक्षणीय आहे. तसेच औषधांचे साठेही पुरविले जात आहेत. पाणी ओसरल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या असणार आहे ती आरोग्याची व साथींच्या आजाराची.

Health planning is important after flood in Kolhapur, Sangli | कोल्हापूर, सांगलीतील पुरानंतर आरोग्याचे नियोजन महत्त्वाचे

कोल्हापूर, सांगलीतील पुरानंतर आरोग्याचे नियोजन महत्त्वाचे

googlenewsNext

- डॉ. अमोल अन्नदाते
आरोग्य विश्लेषक

कोल्हापूर, सांगलीतील महापुरानंतर राज्यातून व देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. यात डॉक्टरांचा सहभागही लक्षणीय आहे. तसेच औषधांचे साठेही पुरविले जात आहेत. पाणी ओसरल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या असणार आहे ती आरोग्याची व साथींच्या आजाराची. पण फक्त येणाऱ्या मदतीवर या समस्या सोडविल्या जाणे शक्य नाही. त्यासाठी कुठल्याही नैसर्गिक आपत्तीनंतर होणाºया आजारांची आणि त्यावर प्रतिबंध व उपचारासाठी नियोजन आवश्यक आहे जे आपल्याकडे कधीच केले जात नाही. तसेच हजारो बेघर झालेल्या लोकांना बसलेला मानसिक धक्का हा शारीरिक जखमांपेक्षा खूप मोठा असणार आहे. पूरग्रस्तांच्या मानसिक पुनर्वसनाचाही विचार करावा लागणार आहे.

आजवर पूर, त्सुनामी अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनंतर येणाºया साथी व त्यामुळे होणारी जीवित हानी हा वैद्यकीय जाणकारांसाठी नेहमीच अभ्यासाचा व संशोधनाचा विषय राहिला आहे. जेणेकरून पुढील आपत्तींना अधिक धैर्याने तोंड देता येईल. २०१५ साली चेन्नईत आलेल्या महापुरात तमिळनाडूच्या आरोग्य विभागाने केलेले नियोजन हे उत्तम होते व त्यातून पुढे राष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक आपत्तीमधील आरोग्य समस्या, साथी निवारण्यासाठी काही प्रोटोकॉल, मार्गदर्शक तत्त्वे ठरविता येतील का यावर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात बरेच मंथन झाले. त्यावरूनच धडे घेऊन कोल्हापूर, सांगलीतील आरोग्याची स्थिती आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते. सध्या सांगली, कोल्हापूरमधील वैद्यकीय व इतर मदतीचे स्वरूप हे अधिक भावनिक आहे व ते असणारच. पण आरोग्य समस्यांच्या बाबतीत त्याचे नियोजन असणे आवश्यक आहे. आठवडा ते पंधरा दिवसांच्या अंतराने मुख्यत: जुलाब, सर्दी, खोकला, न्यूमोनिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया मुख्यत: या साथी पसरू शकतात. त्वचेचा टिनीया हा संसर्गही असू शकतो. या आजारांचे वर्गीकरण हे साधारण जुलाब-उलट्या हे पोटाचे आजार व अचानक आलेला ताप असे नैसर्गिक आपत्तीच्या काळात केले जाते. तापाचे पुढे श्वसनाशी निगडित व डास, उंदरांमुळे होणारे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस असे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरण यासाठी की विखुरलेली वैद्यकीय मदत व डॉक्टर, स्वयंसेवक यांना हे आजार कसे ओळखायचे व त्यांना लक्षणे ऐकून उपचार कसे सुरू करायचे याचे प्रशिक्षण देऊन एकाच वेळी अनेक रुग्णांवर प्रभावी उपचार करणे सोपे जाते. अशा स्थितीत रुग्ण लवकर ओळखून त्यावर पहिल्या दिवशीच उपचार करणे गरजेचे असते.

नाहीतर तो रुग्ण साथ पसरविण्यास हातभार लावतो. तसेच एकाच ठिकाणी अनेक रुग्णांना बोलवून उपचार करताना आजार पसरण्याची भीती असते. यासाठी चेन्नईमध्ये पूरग्रस्त भागात पूर ओसरल्यावर घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेऊन साथी रोखल्या गेल्या. जास्त प्रमाणात आढळणाºया आजारांचे वेगळे छोटे दवाखाने लावले गेले. यात मुख्यत: जुलाब, उलट्या व फक्त ताप असे दोन समूह वेगळ्या स्टॉल्सवर कार्यरत झाले. अशा वेळी अशा गंभीर आजारांसाठी तातडीने रुग्णाला रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठी मोबाइल मेडिकल युनिट व रॅपिड रिस्पॉन्स टीम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. साथी टाळण्यासाठी पाणी ओसरल्यावर युद्धपातळीवर सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, डासांना अटकावासाठी रोज फवारणी व उंदरांसाठी थायमेट फवारणी काटेकोरपणे प्रत्येक गावात, वाड्या-वस्तींवर राबविली गेली पाहिजे. पुरात मरून पडलेली गुरेढोरे जंतुसंसर्गाचा मोठा स्रोत ठरतात. त्यासाठी मृत जनावरांवर अग्निसंस्काराची जबाबदारी प्रशासनाच्या एका टीमवर सोपवावी लागेल. व्हेटरनरी डॉक्टरांच्या पथकांकडून आजारी जनावरांवर उपचार करून मानवी आजारांची साथ रोखणे महत्त्वाचे आहे.


पुराच्या धक्क्यातून बाहेर आलेल्यांवर; तसेच घरेदारे उद््ध्वस्त झालेले व थोडक्यात जीव वाचलेले, बोटीतून येताना मृत्यूची भीती अनुभवलेल्यांवर अशा नैसर्गिक आपत्तीचे मानसिक परिणाम होतात. याला ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिजआॅर्डर’ म्हणतात. यात खरेतर समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असली, तरी सध्या रिलीफ कॅम्पमध्ये संध्याकाळी एकत्रित सगळ्यांनी अनुभव जाहीरपणे सांगणे, दुसºयाजवळ भावना व्यक्त करणे असे प्रयोग करायला हवेत. अशा आपत्तींनंतर काही महिन्यांनी लोकसंख्या स्फोटाच्या रूपाने परिणाम दिसल्याचे दाखले इतिहासात आहेत. त्या दृष्टीनेही जनजागृती आवश्यक असते. पुरामुळे सध्या कोल्हापूर, सांगलीतील रुग्णालये नीट सेवा देऊ शकत नाहीत. राज्यात शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना यशस्वीपणे राबविली जाते. पण योजनेत समावेशासाठी अनेक जणांचे रेशन कार्ड, आधार कार्ड पाण्यात गेले आहे किंवा हरविले आहे. त्यांचे एनरोलमेंट म्हणजे सॉफ्टवेअरमधील नोंदणी नैसर्गिक आपत्तीतील अपवादात्मक केस म्हणून गृहीत धरल्यास त्याचा उपयोग होईल.

सार्वजनिक आरोग्यात असे म्हटले जाते, की नैसर्गिक आपत्तीतील साथीची थेट झळ तुम्हाला पोहोचली नाही, तरी ती तुमचे आयुष्य बदलवून टाकते. मदतीच्या आपल्या भावनेला नियोजनाची जोड मिळाली; तर कोल्हापूर, सांगलीच्या आरोग्याचे नियोजन अवघड जाणार नाही.

Web Title: Health planning is important after flood in Kolhapur, Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.