केवळ भारतच नव्हे, तर जवळपास संपूर्ण दक्षिण आशियासाठी निसर्गाचे वरदान असलेल्या नैऋत्य मान्सूनने यावर्षी उत्तर भारतात अक्षरशः थैमान घातले आहे. पंजाबमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे. त्या राज्यातील एकूण २३ पैकी २२ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला असून, मृतांचा आकडा ५५वर पोहोचला आहे. देशाचे धान्याचे कोठार संबोधले जाणाऱ्या पंजाबमधील शेतीच्या अतोनात नुकसानामुळे आगामी काळात अन्नधान्याचा तुटवडा भासेल की काय, अशी शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे.
हिमालयालगतच्या सर्वच राज्यांना यावर्षी अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या घटनांचा मोठा फटका बसला आहे. एकट्या हिमाचल प्रदेशात २० जूनपासून आतापर्यंत पाऊस व पुराने ३८० जणांचा बळी घेतला असून, ५५ जण बेपत्ता आहेत. उत्तर भारतातील राजस्थान, हरयाणा या राज्यांनाही पावसाने जबर तडाखा दिला आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थानातील काही भागांत तर वार्षिक सरासरीच्या कित्येक पट पाऊस अवघ्या २४ तासांत कोसळला आहे. भारतीय द्वीपकल्पातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या राज्यांतही यावर्षी पावसाने कहर केला आहे.
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांना त्यासाठी कारणीभूत ठरवले जात असतानाच, यावर्षी मान्सून तिबेटपर्यंत पोहोचल्याची चिंतेत आणखी भर घालणारी बातमी हवामानशास्त्रज्ञांनी दिली आहे. दक्षिण आशियातील बहुतांश भागात पाऊस पाडणारे नैऋत्य मोसमी वारे हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून वाहत येतात आणि हिमालयापर्यंत प्रवास करतात.
भारताच्या उत्तर सीमेवर एखाद्या तटबंदीसारखा उभा असलेला हिमालय मोसमी वारे अडवतो आणि त्यामुळे भारतात पाऊस पडतो; परंतु यावर्षी मात्र मोसमी वाऱ्यांनी तटबंदी भेदून, चक्क तिबेटला धडक दिल्याचे कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. या अभूतपूर्व नैसर्गिक घडामोडीसाठी नैऋत्य मोसमी वारे आणि पश्चिमी विक्षोभांची युती कारणीभूत ठरल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
पश्चिमी विक्षोभ ही एक कमी दाबाशी निगडित हवामान प्रणाली असून, तिचा उगम भूमध्य समुद्रानजीक होतो आणि ती पूर्वेकडे प्रवास करते. पश्चिमी विक्षोभ वातावरणाच्या वरच्या स्तरातील थंड हवा सोबत आणतात. ते सर्वसाधारणपणे हिवाळ्यात निर्माण होतात आणि उत्तर भारतात हिवाळ्यात होणारा पाऊस व हिमवर्षावासाठी कारणीभूत ठरतात. यावर्षी मात्र जूनपासून आतापर्यंत एकूण १९ पश्चिमी विक्षोभ नोंदले गेले आहेत. त्यांनी आणलेल्या थंड हवेचा वातावरणाच्या खालच्या स्तरातील तुलनेने उबदार आणि आर्द्रतायुक्त मोसमी वाऱ्यांशी संगम झाल्यास, तीव्र हवामान घडामोडी होऊन प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो.
यावर्षी उत्तर भारतात पावसाने मांडलेला उच्छाद आणि मान्सून तिबेटच्या पठारापर्यंत पोहोचण्यामागे हे प्रमुख कारण असल्याची मांडणी हवामान तज्ज्ञ करीत आहेत. हे प्रकरण दुर्मीळ घडामोड या श्रेणीपुरते मर्यादित राहिले तर उत्तम; परंतु काही हवामान तज्ज्ञांना ती नियमित घडामोड ठरण्याची भीती वाटत आहे आणि दुर्दैवाने तसे घडल्यास, भारतासाठी ती अत्यंत वाईट बातमी ठरेल.
तिबेट हे एक थंड पठार आहे. तिथे बर्फवृष्टी होते; पण पाऊस अत्यंत कमी पडतो. पश्चिमी विक्षोभ आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या संगमातून तिथे नियमितपणे मोसमी वारे पोहोचू लागल्यास, संपूर्ण पर्यावरणीय प्रणालीतच बदल संभवतील.
तिबेटमध्ये जास्त पाऊस पडू लागल्यास हिमनद्या वितळण्याच्या प्रक्रियेस वेग येईल आणि तिबेटमधून भारतात वाहत येणाऱ्या नद्या प्रलयंकारी पूरस्थिती निर्माण करू शकतील. शिवाय भारतातील एकूण पर्जन्यवृष्टीत ८० टक्के वाटा उचलणारा नैऋत्य मोसमी पाऊस तिबेटपर्यंत पोहोचल्यास, भारतातील पर्जन्यवृष्टीवर विपरीत परिणाम होऊन, त्यावर विसंबून असलेली शेतीच धोक्यात येईल. त्याचप्रमाणे भूजलपातळी घसरून पेयजल संकटही उभे ठाकू शकेल. थोडक्यात, द्वीपकल्पात दुष्काळ आणि उत्तर भारतात ओला दुष्काळ, हे चित्र कायमस्वरूपी होऊ शकेल.
अर्थात, तिबेटमध्ये मान्सून पोहोचणे ही एक दुर्मीळ घडामोड आहे, की यापुढे नियमितपणे तसे घडेल, यासंदर्भातील निष्कर्ष घाईघाईत काढता येणार नाही. त्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मानवाने आपल्याच हाताने आपले अस्तित्व धोक्यात आणले आहे, हे मात्र नक्की; कारण या घडामोडींसाठी प्रामुख्याने मानवी उपद्व्यापच कारणीभूत आहेत !