‘फुशारकी’साठी त्यानं उघडलं कॉकपिटचं दार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:38 IST2025-09-04T10:38:01+5:302025-09-04T10:38:20+5:30
विमान उड्डाणांच्या संदर्भात पायलट ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती. विमानातील सगळ्यांचंच आयुष्य अक्षरश: त्याच्या हातात असतं. त्यामुळे पायलट प्रशिक्षित, अनुभवी, हुशार, अडचणीच्या आणि आणीबाणीच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची त्याची तत्परता... इत्यादी गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.

‘फुशारकी’साठी त्यानं उघडलं कॉकपिटचं दार!
आपल्या ‘कर्तबगारी’चं अनेकांना खूप कौतुक असतं. हे कौतुक, फुशारकी त्यांना मिरवायचीही असते. आपले मित्रमंडळी, कुटुंबीय सोबत असले तर मग विचारुच नका. अनेकांना स्फुरण चढतं आणि काहीही, अगदी काहीही करायला ते उद्युक्त होतात. ब्रिटनमध्ये नुकताच असा प्रकार घडला.
विमान उड्डाणांच्या संदर्भात पायलट ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती. विमानातील सगळ्यांचंच आयुष्य अक्षरश: त्याच्या हातात असतं. त्यामुळे पायलट प्रशिक्षित, अनुभवी, हुशार, अडचणीच्या आणि आणीबाणीच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची त्याची तत्परता... इत्यादी गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. ब्रिटिश एअरवेजचा पायलट विमान उडवत होता. आज तो अतिशय उत्साहात आणि जोशमध्ये होता. विमानात प्रवेश केल्या क्षणापासूनच तो जणू काही ‘हवेत’ होता. विमान चालवण्याचं आपलं कौशल्य आणि कसब त्याला आज इतरांना दाखवायचंच होतं. कारण, आज त्याच्या विमानात त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी बसले होते. पण, विमान चालवताना विमानाचं कॉकपिट तर बंद असतं, मग विमानात आपण काय-काय ‘करामती’ करतो, विमान कसं ‘उडवतो’ हे त्यांना कसं कळणार? या पठ्ठ्यानं मग काय करावं? - आपलं ‘शौर्य’ आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबीयांना कळावं, त्यांना ते प्रत्यक्ष पाहता यावं यासाठी त्यानं कॉकपिटचा दरवाजाच उघडला. बऱ्याचदा हा दरवाजा बुलेटप्रूफ आणि लॉकिंग सिस्टमयुक्त असतो. आकाशात हजारो फूट उंचावर असतानाही कॉकपिटचा दरवाजा बराच वेळ उघडाच होता!
तिथून तो आपल्या मित्रमंडळींना आपल्या करामती, कौशल्य दाखवत होता. त्याचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी त्यामुळे खूश झाले, त्यांनाही आनंद वाटला, आपला हा ‘बबड्या’ किती मोठा झाला, किती ‘वर’पर्यंत पोहोचला, यामुळे त्यांचा उर अभिमानानं भरून आला, पण त्याचं हे ‘साहस’ पाहून त्याच्या स्नेह्यांपासून विमानातील सर्वच प्रवाशांच्या पोटात गोळा आला. कारण, विमान हवेत उडत असताना कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवणं सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय धोक्याचं असतं, किंबहुना अशा गोष्टींना प्रतिबंधच असतो. पण या पायलट पठ्ठ्यानं केवळ मोठायकी करण्यासाठी सुरक्षेची सगळी मार्गदर्शक तत्त्वं, नियम धाब्यावर बसवले.
ब्रिटिश एअरवेजच्या एका फ्लाइटमध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली. हे विमान लंडनच्या जगप्रसिद्ध हीथ्रो विमानतळावरून न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होतं. कॉकपिटचं दार उघडं आहे, हे कळल्यावर विमानातील क्रू मेंबर्स, सारेच प्रवासी अतिशय अस्वस्थ झाले. त्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला. हे काय सुरू आहे, काय चाललं आहे, याची चौकशी केल्यावर त्यांना कळलं, आपलं ‘साहस’ दाखवण्यासाठी प्रत्यक्ष पायलटनंच केलेला हा प्रताप आहे!
ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारीही यामुळे इतके चिंतीत झाले, की त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती कळवली. त्या पायलटवर त्वरित कारवाई करण्यात आली. त्याला निलंबित करण्या्त आलं. या घटनेनंतर या विमानाचं परतीचं उड्डाणही रद्द करण्यात आलं. हीथ्रोमध्ये येणारी बीए१७४ ही फ्लाइट रद्द करण्यात आली. यानंतर विमान प्रवासासंदर्भातले नियम साऱ्यांसाठीच आणखी कडक करण्यात आले.