पालकत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:13 IST2018-07-13T00:12:46+5:302018-07-13T00:13:13+5:30
आज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात.

पालकत्व
- प्रा. डॉ. संदीप ताटेवार
आज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात. काही पालक तर म्हणतात, आमच्या मुलांच्या नशिबात आहे तर कां बर त्यांनी खर्च करू नये? असाच विचार करणारे माझ्या माहितीतील गृहस्थ होते. त्यांचा मुलगा लहानपणापासून लाडात वाढलेला होता. मुलाची शैक्षणिक कुवत नसताना वडिलांनी भरपूर देणगी देऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. मुलाच्या तोंडून एखादी गोष्ट निघायला वेळ, ती तात्काळ उपलब्ध होत होती. सहज गोष्टी मिळत गेल्या की त्याची किंमत नसते त्याचप्रमाणे मुलाला पैशांची किंमत काही कळेना! मुलाच्या अनावश्यक मागण्या खूप वाढत गेल्या व वडील आनंदाने पूर्ण करू लागले. मुलाचे मन अभ्यासापेक्षा बाकी गोष्टीमध्ये रमू लागले व शेवटी त्याने शिक्षण पूर्ण न करताच सोडून दिले. वडिलांना वाटायचे मी पाच पिढ्याचे कमावले आहे तेव्हा काय फरक पडणार! काही दिवसातच वडिलांचे निधन झाले. पाच पिढ्याची कमावलेली संपत्ती १०-१५ वर्षाच्या काळात मुलांनी मोठेपणाचे प्रदर्शन करण्यात व वाईट व्यसनापायी विकून टाकली. आई मुलाचे कसे होईल या काळजीपोटी खचून गेली व तिचेही निधन झाले. आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली की सगळ्या नातेवाईकांनी पैसे गोळा करून तिचे अंत्यसंस्कार केले. म्हणूनच चाणक्य म्हणतात
लालयेत पंच वर्षाणि दश ताडयेत।
प्राप्ते तू षोडशे वर्ष पुत्र मित्रवदाचरेत ।।
मुलगा अजाण असताना म्हणजे पाच वर्षाचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत परंतु त्यानंतरचे दहा वर्षे त्याला चांगले वळण लागण्यासाठी वेळ पडल्यास दंडित करावे व १६ वे वर्ष लागले म्हणजे वयाचा मान ठेवून त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे. त्यामुळेच मुलांना पैशांची किमत, चांगले संस्कार, भविष्याची जाण निर्माण होते अन्यथा अतिलाडामुळे बरेचदा आपलेच पालकत्व आपल्या पिढीचा नाश करण्यासाठी कारणीभूत होते.