‘बां’ना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:05 AM2018-04-11T04:05:08+5:302018-04-11T04:05:08+5:30

कस्तुरबांचा जन्म ११ एप्रिल १८६९ चा. त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना अभिवादन करीत आहे. त्या बापूंपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. बापूंचा जन्म २ आॅक्टोबर १८६९ चा.

Greetings to 'left' | ‘बां’ना अभिवादन

‘बां’ना अभिवादन

Next

कस्तुरबांचा जन्म ११ एप्रिल १८६९ चा. त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना अभिवादन करीत आहे. त्या बापूंपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. बापूंचा जन्म २ आॅक्टोबर १८६९ चा. वयातील या अंतरावरून त्यांच्यात अनेकदा गंमतीशीर वाद होत. ‘मी तुमच्याहून वयाने मोठी असल्याने तुम्ही माझे ऐकले पाहिजे’ असे बा म्हणत तर बापूंना त्यांचे वडील असणे मनानेच मान्य होत नव्हते. बा निरक्षर होत्या. त्यांना अक्षरओळख करून देण्याचे अनेक प्रयत्न बापूंनी केले. लग्नानंतर काही काळ हा शैक्षणिक उद्योग केल्यानंतर व त्यातली बांची प्रगती पाहिल्यानंतर बापूच थकले. पुढे १९४२ च्या चले जाव आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने त्या दोघांना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कैदेत ठेवले. तेव्हा बापूंनी पुन्हा बांचा शिकवणीवर्ग सुरू केला. ते त्यांना भूगोल शिकवू लागले. पण ‘कोलकात्याची राजधानी लाहोर असल्याचे’ त्यांचे उत्तर ऐकताच बापूंनी आपला शैक्षणिक पराभव मान्य करून तो वर्गच बंद केला. पण अक्षरओळख नसलेल्या बा जेव्हा ‘दुबळ्यांना क्षमा करणे जमणारे नसते, तो समर्थांचाच अधिकार आहे’, ‘सात्विक मनाने जे कराल त्यानेच तुम्हाला समाधान व शांती लाभेल’ किंवा ‘हिंसा हिंसेलाच जन्म देते, हिंसेचा प्रतिकारही अहिंसेनेच करावा लागतो’ अशी मोत्याच्या सरीसारखी सुभाषिते सहजपणे उच्चारत तेव्हा त्यांच्यात ठासून भरलेले अनुभवाचे शहाणपण ऐकणाऱ्यांना अचंबित करीत असे. प्रसंगी बापूही त्यामुळे थक्क होत.
वयाच्या तेराव्या वर्षी त्या दोघांचा विवाह झाला. तेव्हाच्या प्रथेनुसार काहीकाळ माहेरी राहून बा सासरी राहायला आल्यात. त्यांचे पहिले मूल अल्पवयातच मृत्युमुखी पडले. दुसरा हरिलाल. त्याच्या जन्मानंतर बापू बॅरिस्टरीची परीक्षा द्यायला इंग्लंडला रवाना झाले. तेथून परतल्यानंतर भारतात काही काळ वकिली करून ते द. आफ्रिकेत वकिलीसाठी गेले. तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून काही काळातच ते भारतात परतले. पुन्हा आफ्रिकेत जाण्याआधी त्यांनी तेथील भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करणारे एक पत्रक जारी केले. त्यावर संतापलेल्या तेथील गोºयांनी त्यांना बोटीवरून उतरू द्यायलाच विरोध केला. परिणामी २१ दिवस बापू आणि बा त्यांच्या मुलांसह बंदराबाहेर नांगरलेल्या बोटीवरच अडकून राहिले. पुढे त्यांनी जमिनीवर पाय ठेवला तेव्हाही त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना रक्तबंबाळ करणारा गोºयांचा जमाव त्यांच्यावर चालून आला. तो अत्याचार अंगावर घेत ते दाम्पत्य शांतपणे दरबानला उतरले. अनेकांनी सुचवूनही त्यांनी कधी पोलिसांचे संरक्षण घेतले नाही. बांच्या जीवनातील संघर्षाला खरी सुरुवातही येथेच झाली. येथेच त्यांचे आश्रमीय जीवनही सुरू झाले. आश्रमातील साºयांसोबत राहायचे. एकत्र स्वयंपाक, सामूहिक जेवण व तेही कमालीचे साधे. आश्रमातील संडास सफाईपासूनची सारी कामे बापू इतरांसोबत करीत. बांना मात्र ते करणे कधी जमले नाही. परंतु द. आफ्रिकेतील सरकारविरुद्ध बापूंनी केलेल्या सत्याग्रहात त्या प्रत्येकवेळी सहभागी झाल्या आणि त्यासाठी तेथील जुलुमी तुरुंगवासही त्यांनी अनुभवला. अनेकदा बापूंना अटक झाल्यानंतर त्यांची जागा घेत त्यांनी सत्याग्रहाचे नेतृत्वही केले.
१९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्या चंपारणमधील निळीच्या शेतकºयांच्या आंदोलनात बापूंसोबत उभ्या राहिल्या. सरदार पटेलांनी गुजरातमध्ये शेतकºयांचे जे विराट आंदोलन केले त्यातही त्या सत्याग्रही होत्या. तेव्हाही त्यांच्या वाट्याला तुरुंगवास आला. ब्रिटिश सरकारने बांना अनेकवार तुरुंगात टाकले. मुंबई प्रदेश, राजस्थान, संयुक्त प्रांत व बिहारातले तुरुंगही त्यांनी अनुभवले. सरकारचा दुष्टावा असा की त्यातल्या अनेकवेळा त्याने बांना एकांतवासाची (सॉलिटरी कन्फाईनमेंट) शिक्षाही सुनावली. त्यांना हृदयविकार होता. मधुमेहाची तक्रार होती. मात्र सरकार त्यांच्याबाबतीत दयामाया दाखविताना कधी दिसले नाही. १९४२ च्या लढ्यानंतर मात्र सरकारने त्या दोघांना एकत्र ठेवले. त्या काळात बापूंनी त्यांची जमेल तेवढी शुश्रूषा केली. बांना मुलांची काळजी होती. बापू मुलांबाबत बरेचसे बेफिकीर होते. हरिलाल बिघडला होता. तो व्यसनाधीन होता. मुसलमान होऊन तो लीगच्या व्यासपीठावर भाषणेही देत होता. बांची प्रकृती जेव्हा अतिशय खालावली तेव्हा सरकारने त्याला पकडून त्यांच्या भेटीला आणले. मात्र तेव्हाही तो प्यालेला होता. त्यामुळे पाचच मिनिटात त्याला तेथून हलविण्यात आले. दुसरा मगनलालही त्या दोघांच्या इच्छेनुसार वाढला नाही. अखेरचे रामदास आणि देवीदास हे मात्र त्यांचे सुपुत्र शोभावे असे निपजले. आगाखान पॅलेसमध्येच बांनी बापूंच्या मांडीवर डोके ठेवून अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यासोबत एवढी वर्षे जगलेले व लढलेले बापू त्यांच्या जाण्याने पार कोलमडून गेले. बांचे शव समोर असताना आगाखान पॅलेसमधील एका दालनाच्या कोपºयात दोन्ही पाय पोटाशी घेऊन दीनवाणे बसलेल्या बापूंचे छायाचित्र आजही संवेदनशील माणसांच्या डोळ्यात अश्रू उभे करते. देशाचा राष्टÑपिता व स्वातंत्र्यलढ्याचा सर्वोच सेनानी असलेला तो पहाडासारखा माणूस बांच्या जाण्याने पार खचून गेला होता. त्यांचे मोठेपण आणि उंची अशी की त्यांची समजूत घालणारेही तेथे दुसरे मोठे कुणी नव्हते.
बा गृहिणी होत्या. बापूंच्या सहधर्मचारिणी होत्या. स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीच्या सैनिक होत्या. मात्र त्याचवेळी कोणत्याही खºया पत्नीसारख्या त्या बापूंच्या टीकाकारही होत्या. बापूंचे मोठेपण त्यांच्या वेगळेपणाएवढेच कळत असलेल्या बा स्वत:चेही स्वातंत्र्य व आत्मसन्मान जपणाºया होत्या. तरीही त्यांचे परस्परांवरील प्रेम व एकमेकांना समजून घेण्याची त्यांची क्षमता अगाध होती. मतभेद होते, मुलांविषयीचे वाद होते, आश्रमीय जीवनाविषयीच्या तक्रारी होत्या. पण बापूंनी बांचा कधी अनादर केला नाही आणि बांनी कुणाकडून तरी लिहून घेऊन पाठविलेली पत्रे पाहून बापूंनाही त्यांचे अश्रू कधी आवरता आले नाहीत. बापूंच्या उपोषणांनी त्या वैतागायच्या. त्या म्हणायच्या ‘स्वत:ची काळजी नसली तरी जरा आमच्याकडेही बघा’ त्यावर बापू नुसतेच स्मित करायचे आणि बांनाही त्यांचे तसे वागणे कळत असायचे. तसेही बापूंचे प्रत्येकच उपोषण त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा घेणारे असे. कधी दहा, कधी पंधरा, कधी एक्केवीस तर कधी बेमुदत असे ते चालायचे. प्रत्येकचवेळी सरकार त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी करायचे. बापूंचे एवढे सारे टळलेले मरणप्रसंग बांनी कसे पाहिले आणि सहन केले असतील हे मनात आले की आपणच आता विदीर्ण होऊन जातो. बापूंचे उपोषण सुटेपर्यंत सारा देश जीव मुठीत धरून असायचा. गावोगावी त्यांच्या प्राणांसाठी प्रार्थना व्हायच्या. बांचे मुके मन त्यावेळी कसे आक्रंदत असेल आणि बापूंचे न झालेले एवढे मरणसोहळे केवढ्या यातनांसह त्यांनी अनुभवले असेल याची आता कल्पनाही कोणाला करता यायची नाही.
देशभरातून येणारे सारे नेते बापूंसोबत बांनाही वंदन करीत. सुभाषबाबूंसारखा बापूंपासून दूर गेलेला नेताही आपल्या भाषणाचा आरंभ ‘राष्टÑपिता बापू और बा को प्रणाम’ असे म्हणून करायचा. पण बांनी बापूंची पत्नी असल्याचा अभिमान कधी मिरवला नाही आणि तसा विशेषाधिकारही कधी सांगितला नाही. बापूंचे मोठेपण जाणवूनही त्या त्यांच्याशी गृहिणीसारख्याच वागल्या आणि बापूंनीही त्यांना तशीच साथ दिली. सेवाग्राममध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरू असताना बांनी त्यांच्या कुटीत प्यारेलालजी या गांधीजींच्या सचिवांना लिंबांचा रस काढायला सांगितला. त्या कामात गुंतले असताना बापूंचा प्यारेलालजींना बैठकीत येण्याचा निरोप मिळाला. ते तसेच उठून बैठकीला गेले तर बा त्यांच्या मागोमाग तेथे गेल्या आणि कडाडल्या ‘प्यारे, लिंबू के वो छिलके कौन उठाएगा’. बैठकीला हजर असलेले नेते अवाक तर बापू मात्र ही नित्याची घरची गोष्ट आहे असे मानून स्वस्थ. एकदा बांच्या माहेरच्या माणसांनी त्यांना २५ रुपये देऊन आपल्या मुलांना कधीतरी गोडधोड करून खाऊ घाल असे म्हटले. आश्रमाच्या नियमाप्रमाणे बांनी ते आश्रमाच्या खात्यात जमा केले नाहीत. त्यावर बापूंनी भर प्रार्थनासभेत त्यांची कानउघाडणी केली. त्यावेळी बापूंना उत्तर देत बा म्हणाल्या, ते माझ्या माहेरचे धन आहे. त्यावर तुमचा अधिकार नाही. त्यांच्या त्या अवताराने बापूंसकट सारे आश्रमवासीयच अवाक् आणि थक्क झाले. एकाचवेळी राष्टÑमाता आणि गांधी कुटुंबातील गृहिणी ही दोन्ही पदे सारख्याच समर्थपणे बांनी हाताळली. त्यांच्या जगण्याची, त्यातील संघर्षाची आणि लढ्यांची घ्यावी तशी दखल घेतली गेली नाही. एक गोष्ट मात्र निश्चित, बांच्या साथीशिवाय बापूंचे जीवन अपुरे होते. अशा या थोर मातेच्या जयंतीनिमित्त तिला आमचे शतश: प्रणाम.

Web Title: Greetings to 'left'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.