गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
By विजय दर्डा | Updated: December 15, 2025 06:08 IST2025-12-15T06:06:24+5:302025-12-15T06:08:17+5:30
गोव्यात ड्रग्जचा व्यवसाय अत्यंत वेगानं फोफावलाय, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. गोव्याला वाचवण्यासाठी काही रोडमॅप आहे की नाही?

गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
गोव्यातले दिवस आनंद आणि मौजमस्तीने भरलेले असतात असे म्हटले जाते. तिथल्या रात्रीही रंगीन असतात. परंतु, चमचमत्या प्रकाशात न्हाणाऱ्या गोव्याच्या रात्रींचा एक कुरूप चेहराही आहे. जेथे गुंडपुंड, भ्रष्टाचार, अमली पदार्थांचा काळाबाजार आणि या सगळ्यांत बेलगाम फिरणारे मृत्यूचे सौदागरही आहेत.
स्थानिक प्रशासन गांधीजींच्या तीन माकडांसारखे आहे. ज्यांच्या बाबतीत अनेक लोक विचार करतात की, ते सत्य पाहू इच्छित नाहीत, सत्य ऐकण्याची त्यांची इच्छा नाही आणि सत्याच्या बाबतीत काही म्हणण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. गोवा अग्निकांड याचाच परिणाम आहे. या अग्निकांडाच्या बाबतीत बोलायला सुरुवात करण्याच्या आधी मी या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की, पर्यावरणाकडे लक्ष देण्यासाठी आपल्या देशात एक हरित लवाद स्थापन झालेला आहे. या लवादाचे चेअरमन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश असतात. ज्या देशात पर्यावरणाकडे लक्ष दिले जात नाही, तेथे चांगल्या पर्यटनाची अपेक्षा आपण कशी करू शकतो?
पर्यटनाची ताकद अशी असते जी कोणत्याही देशाचे भाग्य बदलू शकते. स्पेन त्याचे उदाहरण आहे. त्यांची अर्थव्यवस्था चौपट झाली होती. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रकृती सुधारण्यात स्पेन यशस्वी झाला. भारतात पर्यटनाची काय स्थिती आहे? दुर्भाग्य असे की, गोव्यात कमी पैसेवाले पर्यटक जास्त येतात. अनेकांजवळ तर परत जाण्यासाठी पुरतील एवढेही पैसे नसतात. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतात. मी संसदेतही हा विषय उपस्थित केला होता. परंतु, गोव्यात एक असे साटेलोटे तयार झाले आहे की कोणालाच काही फरक पडत नाही.
समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटरपर्यंत कुठलेही बांधकाम होणार नाही असा नियम केला गेला; पण प्रत्यक्षात ५०० मीटरच्या आतच सर्व उद्योग चाललेले असतात. येथे उभे राहिलेले कॅसिनो पर्यावरणाकडे लक्ष देत नाहीत. त्याचा परिणाम सागरी जीवनावर होत आहे. पाण्यातील जीवजंतूंमध्ये आजार पसरत आहे. आपण याविषयी सप्रमाण बातम्या दिल्या होत्या. परंतु, स्थानीय सरकारने लक्ष दिले नाही.
बेकायदेशीररीत्या उभ्या राहिलेल्या ज्या नाइट क्लबमध्ये आग लागली तो क्लब पणजीपासून २५ किलोमीटर दूर आहे, जेथे ओबडधोबड जमीन, अर्धे कच्चे रस्ते ओलांडून जावे लागते. मदत पोहोचवायची तरी ते कठीण होते. लोक आगीपासून वाचण्यासाठी तळघराच्या दिशेने धावले. जेथे वायुविजन नव्हते. बाहेर पडण्याचा कुठलाच रस्ता दिसला नाही. इलेक्ट्रिक फटाक्यांनी उडवलेल्या ठिणग्यांमुळे लाकडी छताला आग लागली. छत लाकडी होते, तर इलेक्ट्रिक फटाके वाजवलेच का गेले?
या बेकायदेशीर बांधकामाबाबत २०२३ मध्येच तक्रार झाली होती. त्यानंतर सांडपाणी नदीत सोडल्याची तक्रार झाली. जानेवारी २०२४ मध्ये अरपोरा पंचायतने क्लबची तपासणी केली होती आणि दोन महिन्यांनी बेकायदेशीर बांधकामाची नोटीस दिली. क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांनी कुठलंच उत्तर दिलं नाही. महसूल अधिकाऱ्यांनी नोटीस दिली, की क्लब शेतीच्या जमिनीवर बांधलाय. कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटीनंही एक नोटीस दिली, पण लुथरा बंधूंचा असा दबदबा होता की सगळ्या नोटिसा कचराकुंडीत टाकल्या गेल्या.
खरं तर संपूर्ण देशातल्या राजकीय संरक्षण असलेल्या दबंगांसाठी गोवा हे लुटीचे ठिकाण बनत आहे. दिल्लीच्या लुथरा बंधूंसाठीही गोव्यातला त्यांचा नाइट क्लब फक्त पैसा कमावण्याचे साधन होता. कुणी मेले किंवा जगले, त्यांना काय फरक पडतो! आगीच्या घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अमानवी वर्तन याची साक्ष देते. रात्री सव्वा वाजता त्यांना भीषण अग्निकांडाची माहिती मिळाली. जर त्यांच्यात माणुसकी असती, तर शोक व्यक्त करण्यासाठी ते गोव्यात पोहोचले असते, पण त्यांनी तर थायलंडसाठी विमानाचे तिकीट बुक केले आणि पहाटे ५.३० वाजता उड्डाण केले. सध्या ते थायलंड पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांना लवकरच भारतात आणले जाईल, अशी अपेक्षा करायला हवी.
एक मोठा प्रश्न हाही आहे की, गोव्यात कॅसिनो आणि नाइट क्लबचा जो गोरखधंदा, ड्रग्जचा नागडा खेळ सुरू आहे तो थांबवणार तरी कोण? २०१३ मध्ये तेव्हाचे प्रसिद्ध पत्रकार तरुण तेजपाल यांनी सहकाऱ्यांसोबत केलेल्या छेडछाडीचा प्रकार समोर आला होता, पण छेडछाडीचे अनेक प्रकार दडपले जातात. ड्रग्जमुळे परिस्थिती आणखी खराब झालीय. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांन गोव्यात ड्रग्जची तस्करी होते, हे मान्य केले होते. याचवर्षी एप्रिलमध्ये गोव्यात ४३ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले. त्याआधी फेब्रुवारीमध्ये एका जर्मन नागरिकाला आणि मार्चमध्ये नायजेरियाच्या नागरिकाला अटक करण्यात आली होती. या अटक म्हणजे फक्त एक छोटासा भाग आहे. आज गोव्यात टॅक्सी माफियांचे वर्चस्व आहे. दक्षिण गोव्यातून जर तुम्हाला मनोहर पर्रीकर विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाले पाच हजार रुपये मागतात। सरकारल याची माहिती नाही का?
जाता जाता एक आकडा तुमच्यासमोर मांडू इच्छितो. कोविडच्या आधी २०१९ मध्ये ९० लाख परदेशी पर्यटक गोव्यात आले होते. मागच्या वर्ष फक्त १५ लाख परदेशी पर्यटक आले. असं का आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी नाइट क्लबच्या विरोधात नाही; पण पहिली गरज ही आहे की नाइट क्लब दर्जेदार असावेत आणि पूर्णपणे सुरक्षित असावेत. गोवा सध्या खरोखर संकटात आहे.