लोकल लोककला ग्लोबल व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:10 AM2018-01-14T03:10:57+5:302018-01-14T03:12:19+5:30

लोकल लोककला एकेकाळी ग्लोबल झाली होती. आजही अपवादात्मक परिस्थितीत ती ग्लोबल होत आहे. पण ही गती अधिक वाढायला विविध कलामहोत्सव, लोकोत्सव, लावणी महोत्सव याद्वारे महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन व्हायला हवेत. त्यासाठी शासनपातळीवर नियोजनबद्ध प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

 Global Folklore To Global | लोकल लोककला ग्लोबल व्हावी

लोकल लोककला ग्लोबल व्हावी

googlenewsNext

- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

लोकल लोककला एकेकाळी ग्लोबल झाली होती. आजही अपवादात्मक परिस्थितीत ती ग्लोबल होत आहे. पण ही गती अधिक वाढायला विविध कलामहोत्सव, लोकोत्सव, लावणी महोत्सव याद्वारे महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन व्हायला हवेत. त्यासाठी शासनपातळीवर नियोजनबद्ध प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

मराठी तमाशा परंपरेवर आपल्या सिद्धहस्त लेखणीने ज्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला आणि सोवळे खुंटीला टांगून ठेवून हाती तमाशाची मशाल धरली त्या पठ्ठे बापूराव कुलकर्णी यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष सुरू झाले असून यानिमित्त लोककलेच्या क्षेत्रात वेगळ्या संक्रमणाची अपेक्षा आहे. लोकल लोककला एकेकाळी ग्लोबल झाली होती. आजही अपवादात्मक परिस्थितीत ती ग्लोबल होत आहे. पण ही गती अधिक वाढायला विविध कलामहोत्सव, लोकोत्सव, लावणी महोत्सव याद्वारे महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन व्हायचे. लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेच्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनात अनेक कलावंत पुढे आले आणि त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोमधून संक्रमण साधले. ‘चला हवा येऊ द्या’मधूनही हे लोककलावंत चमकले. लोककला केवळ महाराष्ट्राच्या परिघात न अडकता ती देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पोहोचली पाहिजे. भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित लोकनाट्य महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा तमाशा गाजला. अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे आणि अभिनय प्रशिक्षक योगेश चिकटवार यांनी तो गाजविला. न्यूझीलंडला राजश्री - आरती नगरकर संचाने लावणी सादर केली. भारूडकार निरंजन भाकरे यांच्या पायघोळ अंगरख्याचे नाव गिनिज बुकात पोहोचले. कोल्हापुरात सुमारे ७५0 विद्यार्थिनींनी लावणीदर्शन घडवून गिनिज बुकात नाव कोरले. या सर्व गोष्टी आशादायक ठरल्या. पण जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात अकलूजची राज्यस्तरीय लावणीनृत्य स्पर्धा पार पडली अन् २६ वर्षे पूर्ण केलेली ही स्पर्धा आता संपुष्टात आली. ढोलकीचे बोल आणि घुंगरांचा नाद आता निदान अकलुजच्या स्पर्धेपुरता संपला. युती सरकारच्या काळात १९९४ मध्ये महाराष्ट्र शासनाने लावणी महोत्सव सुरू केला. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात लावणी महोत्सव एनसीपीएला सुरू झाले. लोकमान्य लावणीला शासनमान्यता मिळाली. विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी लावणीसह सर्व लोककलांच्या माहिती संकलनाचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्धार केला व हे कार्य राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या प्रयोगात्म विभागांकडे सोपविले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा आदिरंग महोत्सव पार पडला आणि त्यात केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या आदिवासी कलांचे दर्शन घडले.

लोककलांच्या विकासासाठी या काही आनंददायक गोष्टी घडल्या असल्या तरी लोककलावासीयांनी संक्रमण घडताना आत्मपरीक्षणही करणे आवश्यक आहे. लोककलांचे उत्सवी स्वरूप उत्साहवर्धक असले तरी या कलांच्या जतन, संवर्धन आणि संशोधनात प्रगती गरजेची आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चकचकीत लोककला दर्शनाने मूळच्या स्वाभाविक नंदादीपासारख्या लोककलांची निरागसता जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे लोककला ही केवळ करमणूक नसून ती आपल्या लोकसंस्कृतीचे कृतिरूप आहे. हे कृतिरूप जतन केले पाहिजे, असा संकल्प लोककला आणि अभ्यासकांनी संक्रमण करताना केला पाहिजे.

अकलुजचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार तमाशातील विनोदसम्राट रघुवीर खेडकर यांना यंदा दिला गेला. ढोलकी तमाशाचा आता आॅर्केस्ट्रा झाला आहे, अशी खंत मी रघुवीर खेडकरांकडे व्यक्त केली होती. ते म्हणाले, ‘तुम्ही धोतरातून बर्मुडात आलात आणि तमाशा कलावंत सतत धोतरात राहावेत, असे तुम्हाला वाटते. हे कसे चालेल? तमाशा बर्मुडात आला तरी चालेल पण तमासगीरांनी पारंपरिक गण, गौळणी, वगनाट्ये आणि लावण्या विसरू नयेत हीच संक्रमण काळात आपण त्यांच्याकडून अपेक्षा बाळगूया.

Web Title:  Global Folklore To Global

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.