डॉ. एस. एस. मंठामाजी अध्यक्ष भारतीय तंत्रशिक्षण परिषद
'गुड मॉर्निंग, राइझ अॅण्ड शाईन, यश म्हणजे अंतिम ध्येय नाही... रोज सकाळी आपल्याला अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर येणाऱ्या असंख्य मेसेजेसपैकी हा केवळ एक मेसेज आहे. हे व्हॉट्सअॅप ग्रुप दिवसरात्र जगण्याचे, प्रेमाचे तत्त्वज्ञान प्रसिद्ध करणारी प्रकाशनगृहेच झाली आहेत. एखादे महत्त्वाचे काम संपविण्याची मुदत उलटून गेली असेल आणि आपण त्या कामात अगदी गळ्यापर्यंत बुडालो असू तरी 'अजून फक्त एक मिनिट... एक इमोजी पाठवू आणि परत कामाला लागू' असा विचार करून आपण स्क्रीनमध्ये डोकं घालतो आणि त्यानंतर आपल्याही नकळत आपण पुन्हा स्क्रोलिंग करू लागतो. त्यात एक तास जातो. या एका तासात फॅमिली ग्रुपवर हुज्जत घातलेली असते. 'यकृताचा त्रास असण्याची दहा लक्षणं' असा व्हिडीओ पाहिलेला असतो किंवा एखाद्या 'मीम'वर हसून घेतलेलं असतं.
आणि ते महत्त्वाचं काम? ते अजून तसंच राहिलेलं असतं. आपण सगळेच कामात बुडालेले असतानाच पुन्हा फोन वाजतो. कॉलेजमध्ये असताना सुरू झालेल्या 'भावांच्या' ग्रुपवर काहीतरी मेसेज आलेला असतो. आता तो ग्रुप फक्त 'शर्टलेस जिम सेल्फी' टाकण्यासाठी, जागतिक राजकारणामुळे वरखाली होणाऱ्या शेअर बाजाराबद्दल बोलायला किंवा विराट कोहलीच्या बॅटिंग फॉर्मची चर्चा करायला उरला आहे. या सगळ्यात आपल्याला त्या अर्धवट राहिलेल्या कामाची आठवण येते आणि आपण ग्रुप 'म्यूट' करायला घेतो. पण, लगेच व्हॉट्सअॅप आपल्याला विचारतं, 'नक्की म्यूट करायचाय का ग्रुप? ३२९ महत्त्वाचे मीम्स तुम्ही मिस कराल...' अशा मेसेजकडे दुर्लक्ष कसं करणार? नाहीच करत आपण....
महत्त्वाचं काम राहुदे की थोडं बाजूला...
दरम्यान, सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कसलातरी महत्त्वाचा वाद सुरू होतो. एक काका दुसऱ्या काकांशी त्यांनी गेटजवळ गाडी पार्क केल्यामुळे वाद घालायला लागतात. या घटनेचं अंधूक सीसीटीव्ही फूटेजही कुणीतरी शेअर करतं. काकू 'माझी दुधाची पिशवी लॉबीतून कुणी घेतली?' असं विचारत वेगळाच 'प्लॉट' सुरू करतात. तेवढ्यात अजून कुणीतरी लोकांनी भरण्याच्या 'मेंटेनन्स'चा 'रनडाऊन' टाकतं. हळूहळू प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणास्तव या गोंधळात गुंततो. मूळ विषय काय होता याचा सगळ्यांनाच विसर पडलेला असतो; पण, प्रत्येकाला आपलं मत मात्र असते. महत्त्वाच्या कामाचं घोंगडं मात्र अजूनही भिजत पडलेलं असतं.
व्हॉट्सअॅप ग्रुप हे आता 'लंगर' झाले आहेत. एकदा आत गेल्यावर सगळं खाऊनच तुम्ही परत येता. 'ऑफिस ग्रुप' आहे; पण, एचआर तिथे लैंगिक छळ विरोधातील प्रशिक्षणाबाबतची पीडीएफ टाकत नाही तोपर्यंत कुणीही तिथे बोलत नाही. 'कझिन्स ओन्ली' ग्रुपला कुणाचं तरी लग्न असेल किंवा कुणाला नेटफ्लिक्सचा पासवर्ड हवा असेल तरच जाग येते. 'दुसरी व पालक' ग्रुपवरचे आईबाबा सहलीला प्लेट्स कोण आणणार यावरून एकमेकांशी भांडतात.
मग, व्हॉट्सअॅप रिकामटेकड्या, उधळ्या लोकांसाठी आहे का?
स्वतःसाठी किंवा समाजासाठी हिताच्या चांगल्या, विधायक कामात लक्ष घालण्याऐवजी आपण व्हॉट्सअॅप मेसेजेस, ग्रुप्स, फॉरवईसच्या खोल गर्तेत बुडत चाललोय का? व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाहिराती नसतात. ते वापरण्यासाठी कुठलीही 'फी' नाही आणि अधिकृतरीत्या 'डेटा' विकत नसल्याचा त्यांचा दावा आहे. चॅट्सही 'एनक्रिप्टेड' असतात त्याचा फायदा म्हणजे शिक्षणाचं साधन म्हणून ते उत्कृष्ट आहे. अर्थात त्याचे काही तोटेही आहेत. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा, एनक्रिप्टेड खासगी आणि ग्रुप मेसेजद्वारे प्रचंड वेगाने प्रसार करण्यात त्याचा वाटा मोठा आहे. बहुतेक माहिती ही कुटुंबीय आणि मित्रांकडून येत असल्यामुळे लोक ती खरी मानतात आणि पुढे पाठवत राहतात. त्यातून तयार होणाऱ्या इको चेंबरमध्ये खोट्या माहितीला आव्हान देण्यास थारा नाही.
व्हॉट्सअॅप मोफत आहे तर ते पैसे कसं मिळवतं?
सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे न आकारता ते व्यावसायिक कारणांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून पैसे मिळविले जातात. बँका, विमान कंपन्या, ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना अपडेट्स पाठविण्यासाठी व्हॉट्सअॅप एपीआय खरेदी करतात. त्याद्वारे खरेदी केलेल्या वस्तु, अपॉइंटमेंट्स, मार्केटिंग याबद्दलचे मेसेज मोठ्या संख्येने पाठविले जातात. ते बहुतेकवेळा 'टेम्प्लेट' स्वरूपातील असतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप त्यांच्या ग्राहकाकडून प्रति मेसेज पैसे घेतं. संभाषण सुरु करणाऱ्यांकडून हे पैसे आकारले जातात. असं असेल तर व्हॉट्सअॅपच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य माणसाची सुटका करण्याचा उपायही कंपनीकडेच आहे. पाठविल्या जाणाऱ्या प्रत्येक मेसेजवर काही शुल्क आणि येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर निम्मे शुल्क आकारलं तर? भारतात व्हॉट्सअॅपचे ८० कोटी ग्राहक आहेत. जगभरात सुमारे तीन अब्जांपेक्षा जास्त... करा हिशेब! आणि, हे होणारच नाही, याची तरी काय खात्री?
Web Summary : WhatsApp dominates our lives, distracting from work and fostering misinformation. It's free for users, but businesses pay for messaging services. Charging per message could curb addiction.
Web Summary : व्हाट्सएप हमारे जीवन पर हावी है, काम से ध्यान भटकाता है और गलत सूचना फैलाता है। यह उपयोगकर्ताओं के लिए मुफ्त है, लेकिन व्यवसाय संदेश सेवाओं के लिए भुगतान करते हैं। संदेश शुल्क लगाने से लत कम हो सकती है।