मैं कोई जिस्म नहीं हूं, कि जला दोगे मुझे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 08:18 IST2025-05-27T08:17:13+5:302025-05-27T08:18:17+5:30

नेहरूंच्या विचारांतील ताकद व मानवतेच्या उत्थानाचे त्यांचे प्रयत्न इतिहासाच्या पुनर्लेखनाने पुसता येणार नाहीत. इतिहास कोणाच्या इच्छेने बदलत नसतो हेच खरे!

Former Union Law Minister Ashwini Kumar article on first Prime Minister of the country Pandit Jawaharlal Nehru | मैं कोई जिस्म नहीं हूं, कि जला दोगे मुझे!

मैं कोई जिस्म नहीं हूं, कि जला दोगे मुझे!

अश्विनी कुमार
माजी केंद्रीय विधि आणि न्यायमंत्री

‘मानवतेच्या भल्यासाठी उभे आयुष्य अर्पण करणारी मोठी माणसे इतिहासाला दिशा आणि आकार देत असतात,’ असे थॉमस कार्लाईलने म्हटले आहे. या धीरोदात्त, वलयांकित व्यक्तींकडे यशस्वी होण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. आपण जे करतो आहोत ते योग्य आहे, यावर ते अढळ श्रद्धा ठेवतात. त्यामुळे ते इतिहासावर न पुसता येईल असा ठसा उमटवतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे एक असे व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक भारताच्या आचंबित करणाऱ्या यशस्वी प्रवासामागे नेहरूंची विशाल दृष्टीच आहे. जगभर त्यांच्या म्हणण्याचा आदर केला जात असे. ‘धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा आणि सर्वांप्रति न्याय या मूल्यांना बांधील असा कायद्याने नियंत्रित केलेला लोकशाही देश’ ही नेहरूंची भारताविषयीची संकल्पना होती. 

देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रजासत्ताकाची मूलभूत उद्दिष्टे साकार करण्याची प्रक्रिया  सुरू केली. त्यांचे सहकारी त्यांना प्रेमाने पंडितजी संबोधत. भारताची प्रगती व्हावयाची असेल तर शांतता असलीच पाहिजे, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणून शीतयुद्धातील वैरभावाला त्यांनी थारा  दिला नाही. त्याच वेळी वसाहतवादाच्या विरोधाचे ते जागतिक राजदूत आणि जगाचे शांतीदूतही झाले.

स्वातंत्र्यसैनिक, मानवतावादी आणि विद्वान व्यक्ती म्हणून त्यांच्या काळातील मुत्सद्द्यांमध्ये त्यांनी स्थान मिळविले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच भारत बलवान देश झाला. जगाला असूया वाटावी असा अवकाश कार्यक्रम देशाने राबविला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच देशाला ‘आयआयटी’ आणि ‘एम्स’सारख्या संस्था मिळाल्या. देशाला अन्नाची हमी मिळाली, त्यामागेही नेहरूंची दृष्टी होती. देश स्वयंनिर्भर होण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे त्याचे साधन होते.

 पंतप्रधान म्हणून त्यांनी उभी केलेली कामे आणि त्यांच्या  व्यक्तिमत्त्वातील महानतेची संपूर्ण देशाला जाणीव आहे. त्यांची नि:स्वार्थी वृत्ती, लोकशाहीवादी स्वभाव आणि विनम्रता यामुळे लाखो लोक त्यांचे चाहते झाले. या लोकांचे प्रेम हीच त्यांची ताकद होती. मित्रांवर त्यांनी शुद्ध अंतःकरणाने विश्वास ठेवला. विरोधकांशीही ते कधी कठोर वागले नाहीत. पक्षात विवेकशील मतभेदाला त्यांनी मुभा दिली. लोकशाहीत विरोधी पक्षाला ते महत्त्व देत. रचनात्मक विरोधाचे ते केवळ स्वागतच करत नसत तर त्याला कायम प्रोत्साहनही देत.

 आजच्या काळात नेहरूंच्या कामाची निर्भत्सना होत आहे. अशा वेळी प्रचाराच्या माऱ्याने पंडितजींच्या उत्तुंग नेतृत्वाच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत याची सर्व शहाण्या, विचारी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. ज्यांना इतिहासाला खोटे ठरवायचे आहे त्यांना हे कळले पाहिजे की, सत्य हे संपूर्ण असते आणि ते गाडून टाकता येत नाही. ते पुन्हा आपले अस्तित्व दाखवते, व्यक्त होते.
 
इतिहास कोणाच्या इच्छेने बदलत नसतो हेच  खरे आहे. इतिहास निर्माण करणारे नेहरू देशाच्या वैचारिक प्रतलावर जिवंतच राहतील. त्याग आणि स्वार्थावर उभे असलेले त्यांचे जीवन आपल्याला महान नेतृत्वाची साक्ष देते. त्यांच्या विचारांतील ताकद आणि मानवतेच्या उत्थानाचे त्यांचे प्रयत्न  इतिहासाच्या पुनर्लेखनाने पुसता येणार नाहीत. पंडित नेहरूंच्या  अंत्यसंस्काराच्या वेळी कैफी आजमी यांनी वाहिलेली श्रद्धांजली लोकांच्या स्मृतीत कायमची कोरली गेली आहे.

“मेरी आवाज सुनो, प्यार का साज सुनो क्यो सजाई है ये चन्दन कि चिता मेरे लिये मैं कोई जिस्म नहीं हूं कि जला दोगे मुझे राख के साथ बिखर जाऊंगा दुनिया मेंतुम जहां खाओगे ठोकर वही पाओगे मुझे” नेहरूंच्या निमित्ताने कवी लोकांना उद्देशून बोलत आहे. त्याच्या नायकाचे विचार अमर आहेत. स्वत:च्या पलीकडे जाऊन हा नेता लोकांच्या पालकत्वाची हमी घेणारा आहे, असे तो सांगतो.

नेहरूंच्या एकसष्ठाव्या पुण्यतिथीला आपण आज एका संत्रस्त कालखंडात राहत आहोत. अशा वेळी पंडितजींना अटलबिहारी वाजपेयी यांनी वाहिलेली काव्यपूर्ण श्रद्धांजली आठवली पाहिजे. भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने आपल्या सहज शैलीत नेहरूंबद्दल म्हटले होते ‘हे एक स्वप्न होते. जे  अनंतात विलीन झाले. एक ज्योत रात्रभर जळत राहिली. तिने अंधाराचा सामना केला आणि आपल्याला रस्ता दाखवला. एके दिवशी ती निर्वाणाला प्राप्त झाली.’ 

नेहरूंसारखे नेते अपवादानेच घडतात. त्यांना महान नेत्यांच्या प्रभावळीत स्थान मिळते. त्यांच्या दृष्टीतील किरण, सौंदर्यातील शक्ती, आत्मनिष्ठेचे बळ आणि न संपणारा त्याग यातून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यामुळेच लोक त्यांचे उपासक बनले. सभ्यता काय असते, हे नेहरूंनी दाखवून दिले. त्यांनी राजकारणाच्या केंद्रस्थानी प्रतिष्ठा आणली.  सत्तेच्या पलीकडे पाहायला त्यांनी शिकवले. नेहरूंचे व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अखंड प्रेरणास्रोत राहील. जे त्यांचा वारसा पुढे नेऊ इच्छितात ते यशस्वी होतील, अशी आशा मी बाळगतो.
 

Web Title: Former Union Law Minister Ashwini Kumar article on first Prime Minister of the country Pandit Jawaharlal Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.