दाता गेला, त्राता गेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:50 IST2024-12-28T07:50:14+5:302024-12-28T07:50:34+5:30
सज्जन, सभ्य, सुसंस्कृत अशी चांगल्या माणसासाठी म्हणून जी जी विशेषणे सांगता येतील ती जणू डाॅ. मनमोहन सिंग यांच्यासाठीच होती

दाता गेला, त्राता गेला!
द्रष्टा अर्थशास्त्री म्हणून एकीकडे जगभर गाैरव आणि दुसरीकडे प्रज्ञा- प्रतिभेशी फारकत घेतलेल्या बटबटीत राजकारणाचे देशांतर्गत आव्हान, अशा चक्रव्यूहात पंचवीस-तीस वर्षे काढणारे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचे निधन हा एका युगाचा अंत आहे. हे युग राजकारणातील संघर्षाचे तर सामान्यांसाठी संधीचे होते. सज्जन, सभ्य, सुसंस्कृत अशी चांगल्या माणसासाठी म्हणून जी जी विशेषणे सांगता येतील ती जणू डाॅ. मनमोहन सिंग यांच्यासाठीच होती आणि विद्वत्तेशी संबंधित अशीच सारी विशेषणे त्यांना लावता येतील. सध्या पाकिस्तानात असलेल्या खेड्यात जन्मलेले, लहानपणीच आईच्या मायेला पारखे झालेले, आजीने सांभाळलेले मनमोहन सिंग स्वातंत्र्यावेळी फाळणीच्या वेदना सोबत घेऊन सीमा ओलांडून आले. त्या कष्टाच्या खुणा त्यांनी आयुष्यभर जपल्या. डाॅ. सिंग यांनी भूषविलेल्या अनेक पदांपैकी एखादे पद जरी वाट्याला आले तरी बहुतेकांची मान गर्वाने ताठ होते. अहंकार जन्म घेतो. वर्तणूक बदलते. डाॅक्टरसाहेबांचे वैशिष्ट्य असे की, केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन, केंद्र सरकारच्या मंत्रालयातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून, तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष किंवा रिझर्व बँकेचे गव्हर्नर ते संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित मोठ्या पदांवर उत्तुंग कामगिरी नोंदविल्यानंतरही हा माणूस वागण्यात साधा, चारित्र्यात स्वच्छ व मनाने निर्मळ राहिला. हा थोर माणूस सामान्यांसाठी दाता, तर देशासाठी त्राता होता. हाताला कामाची हमी देणारी मनरेगा, भारतीय म्हणून सर्वांना समान ओळख देणारे आधार कार्ड, शासन-प्रशासनातील पारदर्शकतेचा हक्क बहाल करणारा माहिती अधिकार कायदा, ज्यांच्या पाठिंब्यावर सरकार बनले त्यांचाच विरोध धुडकावून अमेरिकेसोबत केलेला अणूकरार, त्यातून साधलेले ऊर्जास्वातंत्र्य, खेड्यांसाठी भारत निर्माण, शहरांसाठी जवाहरलाल नेहरू पुनरूत्थान योजना, देशव्यापी कर्जमाफी, शिक्षण हक्क, खाद्यसुरक्षा यांसारख्या योगदानाची यादीच डाॅक्टरसाहेबांचे आभाळाएवढे मोठेपण अधोरेखित करते. असा ऋषितुल्य विद्वान अर्थतज्ज्ञ होणे नाही. असा सभ्य, सज्जन राजकारणी होणे नाही.
विसाव्या शतकातील सर्वोच्च नेतृत्वाने भारतीयांच्या प्रगतीत दिलेल्या मोठ्या योगदानाचे काही टप्पे आहेत. पं. जवाहरलाल नेहरूंनी मोठे प्रकल्प, जागतिक दर्जाच्या शिक्षण व आरोग्याच्या संस्था दिल्या. देशाच्या विकासाचा पाया घातला. इंदिरा गांधींनी बँकांचे खासगीकरण करून किंवा संस्थानिकांचे तनखे रद्द करून कारभाराला समाजवादी चेहरा दिला. राजीव गांधींनी संगणक व एकविसाव्या शतकातील स्वप्नांची ओळख दिली. पी. व्ही. नरसिंहराव यांनी देश आर्थिक आरिष्टातून बाहेर काढला व बंदिस्त अर्थव्यवस्था खुली केली. त्यात अर्थमंत्री म्हणून डाॅ. मनमाेहन सिंग यांचे योगदान मोठे होते. त्यांनी देशाच्या अर्थकारणाच्या पायातील श्रृंखला तोडल्या. आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणाने भारतीय प्रज्ञा, गुणवत्ता व काैशल्याला जगाची कवाडे खुली करून दिली. अमेरिकेच्या सिलिकाॅन व्हॅलीत भारतीयांचा दबदबा निर्माण झाला. भारतीय कंपन्या जगातल्या नामांकित उद्योगांशी स्पर्धा करू लागल्या. महत्त्वाचे म्हणजे, या सुबत्तेतून, समृद्धीमधून खालच्या नोकरदार वर्गाला प्रेरणा मिळाली. सामान्य भारतीयांची मानसिकता वैश्विक बनत गेली.
श्रीमती सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये अकस्मात पंतप्रधानपदाचा काटेरी मुकुट डाॅ. सिंग यांच्या डोक्यावर ठेवला. या नव्या जबाबदारीला अर्थमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कोंदण होते. हा मुकुट त्यांनी दहा वर्षे सांभाळला. धक्कादायक पद्धतीने सत्ता गमावल्यामुळे विरोधी पक्षातील आक्रमक व बोलघेवड्या नेत्यांनी या मितभाषी, बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या नेत्याला वारंवार घेरले. एका मागोमाग एक संसदेची अधिवेशने गोंधळात गेली. विरोधकांना उत्तरदायित्वाबद्दल विचारले तर संसद चालविण्याची जबाबदारी विरोधकांची नव्हे तर सत्ताधाऱ्यांची आहे, अशा उद्धटपणे गाेंधळाचे समर्थन केले गेले. महागाई, रुपयाची घसरण, भ्रष्टाचाराची खरी-खोटी प्रकरणे, अशा मिळेल त्यानिमित्ताने डाॅ. सिंग यांच्या सरकारवर हल्ले होत राहिले. भरीस भर म्हणजे स्वपक्षाच्याच तरुण नेत्याने सरकारी अध्यादेश जाहीरपणे फाडण्याचा अगोचरपणा केला. तरीही संयमी पंतप्रधान हिमालयासारखे निश्चल राहिले. न बोलता सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत राहिले. एरव्ही पुस्तकात वाचायला, नेत्यांच्या भाषणांत ऐकायला मिळणारा अंत्योदयाचा विचार त्यांनी कृतीत आणला. त्यासाठी सहकारी मंत्र्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा कमाल वापर केला. आयुष्यभर विद्यार्थी राहिलेले डाॅ. मनमाेहन सिंग प्रत्येक जटिल समस्येच्या मुळाशी जात राहिले. त्यातून दीर्घकालीन उपाय सापडले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला अशा दुबळ्या वर्गाला आर्थिक बळ देणारी धोरणे राबवित गेले. पण, शेवटच्या माणसाचा विचार करताना उद्योजक, व्यावसायिक, संपत्तीची निर्मिती करणाऱ्यांचा त्यांनी कधीही दुस्वास केला नाही. उलट त्यांच्यासाठी संधीचे नवे आकाश निर्माण केले. लायसन्स-परमिट राज संपुष्टात आणले. एकेका क्षेत्रातील सरकारचा एकाधिकार संपवित गेले. खासगी उद्योजकांना विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळाला.
आज जी जगाची आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्ने, मध्यमवर्गाला बाळसे, नवउद्योजकांची पिढी तयार झाल्याचे आपण पाहतो आहोत, त्याचे बीजारोपण डाॅ. मनमाेहन सिंग यांनी केले. गरीब कुटुंबे निम्न मध्यमवर्गात, तो वर्ग मध्यम स्तरावर आणि मध्यमवर्ग पुढे उच्चमध्यमवर्गीय अशी एक प्रक्रिया त्यांच्या आर्थिक सुधारणांनी गतिमान केली. नंतर धर्म, जात किंवा इतर कशाच्या तरी उन्मादात हाच वर्ग प्रवाहपतीत झाला. ज्यांच्यामुळे पुढची पिढी देशात-परदेशात उच्चशिक्षण घेऊन नवश्रीमंतांच्या रांगेत उभी राहिली त्यांच्याप्रती हा वर्ग कृतघ्न बनला. अधिकाधिक आत्मकेंद्रित बनला. या सभ्य, सज्जन व थोर माणसाला त्याच्या हयातीत न्याय मिळाला नाही. आपले योग्य मूल्यमापन वर्तमान करणार नाही, याची पुरती जाणीव या आर्थिक विचारवंताला होतीच. म्हणून निरोपाच्या मनोगतात त्यांनी, इतिहास आपल्याबद्दल अधिक दयाळू असेल, असा प्रामाणिक आत्मविश्वास व्यक्त केला. ते खरे ठरले आहे. आज चोहोबाजूंनी गर्तेत सापडलेल्या या सुखवस्तू वर्गाला क्षणोक्षणी डाॅ. मनमोहन सिंग यांची आठवण येते. अर्थात हे स्मरण आता निरर्थक आहे. कालचक्राचे आरे उलटे फिरविता येत नाहीत.