वडिलांच्या समृद्ध पाऊलखुणांवरून वाटचाल करताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:46 IST2025-07-31T08:45:16+5:302025-07-31T08:46:21+5:30

सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार हे आज ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कन्येचे मनोगत.

following in father s b mujumdar symbiosis prosperous footsteps | वडिलांच्या समृद्ध पाऊलखुणांवरून वाटचाल करताना...

वडिलांच्या समृद्ध पाऊलखुणांवरून वाटचाल करताना...

डॉ. विद्या येरवडेकर, प्राचार्य, संचालक, सिम्बायोसिस

माझे वडील डॉ. एस. बी. मुजुमदार हे सिम्बायोसिस या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष. ३१ जुलै २०२५ रोजी आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ते पूर्ण करत आहेत. वयाची नव्वदी पूर्ण करुन एक्याण्णवव्या वर्षात पदार्पण करत असतानाचा हा दिवस केवळ त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक वाटचालीचा गौरव करणारा नाही, तर त्यांची कन्या आणि आयुष्यभर त्यांच्यापासून शिकणारी त्यांची शिष्य म्हणून माझ्यासाठी खूप वैयक्तिक आणि भावनिकही आहे.

मी अतिशय भाग्यवान आहे. शैक्षणिक वातावरणाने भारलेल्या ध्येयवादी घरात मी वाढले. आई-वडील दोघेही शिक्षक. माझ्या बहुसंख्य मित्र-मैत्रिणींचं बालपण अत्यंत पारंपरिक वातावरणात गेलं. त्यांच्याच वयाची मी मात्र फर्ग्युसन कॉलेजच्या उत्साही कॉरिडॉरमध्ये आणि पुणे विद्यापीठाच्या अभ्यासपूर्ण वातावरणात समृद्ध होत गेले.

माझी आई प्राणीशास्त्रात संशोधन करत असताना, माझं दैनंदिन संगोपन वडिलांनी केलं. त्यात संयम होता, अपार प्रेम होतं आणि त्याचबरोबर त्या संगोपनामागे एक दृष्टिकोनही होता. माझे वडील केवळ जन्मदात्याची भूमिका बजावत नव्हते, तर ते माझे खरे मार्गदर्शक होते. शिक्षणाप्रमाणेच पालकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण नव्हे, तर त्या व्यक्तीबरोबर सुसंवाद, मार्गदर्शन यावर त्यांचा अखंड विश्वास होता. 

ते कायम कामात व्यग्र असत. विद्यापीठ परिषदेसाठी काम करणं, अनेक समित्यांचं प्रमुखपद भूषवणं... पण त्यांच्या अत्यंत लगबगीच्या कठीण वेळापत्रकातही, कुटुंबापेक्षा आपल्या कामाला त्यांचं प्राधान्य आहे, असं त्यांनी आम्हा कुणालाच कधीही वाटू दिलं नाही. माझ्या बालपणी आणि पौगंडावस्थेत आमचं घर हे अनेकांसाठी विशेषत: परदेशी विद्यार्थ्यांसाठी दुसरं घरच होतं.

माझे वडील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे रेक्टर होते, तेव्हा अनेक परदेशी निराधार विद्यार्थ्यांना त्यांनी आमच्या घरी प्रेमाने स्वीकारलं. देश, धर्म, वंश किंवा पार्श्वभूमी याबाबत त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. हे प्रसंग अपवाद नव्हते, तर संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या जीवनदृष्टीचं ते प्रत्यक्ष प्रकटीकरण होतं. शिक्षण हे त्यांच्या दृष्टीने केवळ ज्ञानप्राप्तीचं साधन नव्हतं, तर सहवेदना, सांस्कृतिक समन्वय आणि परस्पर आदर विकसित करणारी ती एक अखंड प्रक्रिया होती.

जेव्हा मी सिम्बायोसिसमध्ये व्यावसायिकरित्या काम करू लागले, तेव्हा केवळ एक वडील म्हणून नव्हे तर एक आदर्श नेता म्हणूनही मी त्यांच्याबरोबर सतत शिकत राहण्याचा अनुभव घेतला. त्यांनी कधीही ‘आदेशा’द्वारे नव्हे, तर चारित्र्याद्वारे नेतृत्व केलं. वरिष्ठ प्राध्यापकांपासून ते सहायक कर्मचाऱ्यांपर्यंत, प्रत्येकालाच वाटायचं की सरांच्या समोर आपलं म्हणणं ऐकलं गेलं आहे, योग्य ते मूल्यमापन केलं गेलं आहे. ते नेहमी म्हणायचे, ‘कोणतीही संस्था इमारतींवर नाही तर त्यातल्या लोकांवर उभी राहते!’ उत्कृष्टता, विस्तार आणि समता हे त्यांनी दिलेले तीन मूलमंत्र आजही संपूर्ण सिम्बायोसिस संस्थेचे मार्गदर्शक आहेत. 

गुणवत्तेशी तडजोड करून केलेला विकास त्यांना कधीच मान्य नव्हता. विस्तार केवळ विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखूनच केला गेला आणि समता... ती तर प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी होती. शिष्यवृत्तीपासून ते मुलींसाठी विशेष शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेपर्यंत आणि  ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवण्यापर्यंत...
आजही, वयाच्या नव्वदीत, ते रोज शांतपणे आणि तेवढ्याच चिकाटीने ऑफिसमध्ये येतात. ‘आपण संस्थेचे मालक नाही, तर एका व्यापक उद्देशाचे विश्वस्त आहोत’, याची सातत्यानं आठवण करून देतात.

त्यांची कन्या, एक सहकारी आणि त्यांची आयुष्यभराची एक विद्यार्थिनी या नात्यानं, मला असं ठामपणे वाटतं की, त्यांनी निर्माण केलेली खरी वास्तू म्हणजे सिम्बायोसिस नव्हे, तर मूल्यं, मानवता, विनम्रता आणि सर्वसमावेशकता या तत्त्वांवर आधारलेली एक जीवनशैली आहे.
 

Web Title: following in father s b mujumdar symbiosis prosperous footsteps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.