फायटर एकनाथ शिंदेंच्या परीक्षेचा काळ सुरू!
By यदू जोशी | Updated: October 25, 2025 08:58 IST2025-10-25T08:56:41+5:302025-10-25T08:58:07+5:30
याआधी शर्ट एकनाथ शिंदे यांचा, तर पँट भाजपची होती. आता आपल्या पक्षाच्या विजयाचा सगळा ड्रेस शिंदेंनाच शिवायचा आहे!

फायटर एकनाथ शिंदेंच्या परीक्षेचा काळ सुरू!
यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत
‘मुंबई आणि एमएमआरमधील तीन महापालिकांमध्ये युती होईल; पण इतरत्र वेगळे लढू’, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस उद्धवसेनेला सोबत न घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. हे लक्षात घेता राजकीय दोस्ती-दुष्मनीचा नकाशा या निवडणुकांत बदललेला दिसेल. एक वेगळेच चित्र दिसू शकते. म्हणजे सकाळच्या एका सभेत एकनाथ शिंदेंना भाजपच्या विरोधात बोलावे लागेल, सायंकाळी मुंबईच्या सभेत ते भाजप-फडणवीसांचे कौतुक करताना दिसतील. तशीच वेळ फडणवीस, अजित पवार यांच्यावरही येऊ शकेल.
भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा, ‘आपल्या पाठीशी महाशक्ती आहे’ असे विधान त्यांनी केले होते. ते २०२४ची लोकसभा आणि विधानसभाही ते भाजपच्या साथीने लढले. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र मूल्यमापन करता आले नाही, कारण मिळालेल्या यशात भाजपचा वाटा होता. शर्ट शिंदेंचा, तर पँट भाजपची होती. आता विजयाचा सगळा ड्रेस शिंदेंना शिवायचा आहे.
उद्धव ठाकरे अन् त्यांची युती राज यांच्याशी झालीच तर दोन भावांच्या युतीचे आव्हान एकीकडे आणि दुसरीकडे कालपर्यंतचा मित्रही विरोधात असे बिकट आव्हान शिंदेंसमोर उभे ठाकू पाहत आहे.
‘मला हलक्यात घेऊ नका’, असे शिंदे एकदा म्हणाले होते. तो त्यांचा इशारा उद्धव ठाकरेंना की देवेंद्र फडणवीसांना अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र, आता ठाकरे अन् फडणवीस अशा दोघांनीही त्यांना भविष्यात हलक्यात घेऊ नये, असे मोठे यश त्यांना मिळवावे लागणार आहे. अनेक ठिकाणी भाजप त्यांच्या विरोधात असेल. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याची सर्वात मोठी परीक्षा शिंदे यांच्यासाठी येऊ घातली आहे. त्यात काय निकाल लागतो, यावर त्यांचे पुढचे राजकारण अवलंबून असेल. विरोधकांशी लढणे सोपे, आप्तस्वकीयांशी लढणे कठीण.
आधी दातृत्व, आता कौशल्य
एक मात्र नक्की.. आपल्याला कोणी हलक्यात घेऊ शकत नाही या स्थितीत शिंदे यांनी स्वत:ला नेऊन ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा अत्यंत कौशल्याने वापर केला. ‘अत्यंत मोकळ्या हाताने देणारा नेता’ अशी प्रतिमा, ‘कोणाच्याही मदतीला केव्हाही धावून जाणारा नेता’ असे वलय त्यांनी निर्माण केले.
लाडकी बहीण, शेतीच्या नुकसानीत दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत असे राज्याच्या तिजोरीवर ताण आणणारे; पण लोकांना सुखावणारे अनेक निर्णय शिंदे यांनी घेतले, त्यातून त्यांची दातृत्ववान नेता अशी प्रतिमा अधिकच उजळली; त्याचवेळी राज्याची आर्थिक घडी विस्कटली असाही आरोप झाला; पण त्याची चिंता शिंदे यांनी कधीही केली नाही.
शिंदे फायटर आहेत हे मात्र नक्की. उद्धव ठाकरेंशी पंगा घेऊन पक्षाचे ४० आणि १० अपक्ष असे ५० आमदार घेऊन बाहेर पडणे हे सोपे नव्हते, ते त्यांनी करून दाखविले. लोकसभेला महायुतीची पडझड झाली तरी त्यांनी आपल्या पक्षाचे सात खासदार निवडून आणले. विधानसभेत ५७ आमदार निवडून आणले. आता शिंदे एक्स्प्रेसचा पुढचा थांबा काय असेल?
यावेळची प्रश्नपत्रिका त्यांच्यासाठी जरा कठीण आहे. कारण ती त्यांच्या मित्रानेच (भाजप) तयार केलेली असेल. ‘भाजपच्या आधारावर उभा असलेला नेता’ ही प्रतिमा पुसून ‘स्वबळावरही टिकणारा नेता’ ही प्रतिमा त्यांना निर्माण करायची आहे. शिंदे फायटर आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांपैकी सर्वात यशस्वी तेच झाले. राज ठाकरे अजूनही चाचपडत आहेत, नारायण राणेंना आधी काँग्रेसचा अन् नंतर भाजपचा सहारा घ्यावा लागला. उद्धव यांना टाटा करताना शिंदेंचे राजकीय सर्वस्व पणाला लागले होते; पण त्यांनी हिंमत ठेवली आणि त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागलेले असताना त्यांनी परीक्षेचा तो काळ सुवर्णसंधीमध्ये बदलला.
यावेळी बहुतेक मोठ्या पक्षांना स्वतंत्र लढण्याची खुमखुमी आली आहे. ठाकरे बंधूंची दिवाळी सोबत झाली, दोघे मिळून मुंबई महापालिकेत विजयाचे फटाके फोडण्याच्या तयारीला लागले आहेत. पंजावर जागा किती निवडून येतात यापेक्षाही प्रत्येक वाॅर्ड, गणामध्ये पंजा पोहोचला पाहिजे, म्हणजे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल असा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फॉर्म्युला आहे. महायुती असो की महाविकास आघाडी त्यातील पक्ष एकमेकांविरुद्ध लढतील मग पुन्हा एकत्र येतीलही पण प्रचारात एकमेकांविषयी आलेल्या कटुतेचे दूरगामी परिणाम होतील.
- जब दोस्त शामील हो, दुश्मन की चाल मे, तब शेर भी उलझ जाता है बकरी के जाल मे’ .... कालपर्यंत एकमेकांचे दोस्त असलेले पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असे चित्र असल्याने हा शेर आठवला आहे.
yadu.joshi@lokmat.com