उत्तर भारतातील गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी चालू केलेल्या आंदोलनास आज (दि.२६) सहा महिने होत आहेत. केंद्र सरकारने गेल्यावर्षी जूनमध्ये तीन अध्यादेश काढून शेतीविषयी तीन कायदे लागू केले. त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताने सहमती देण्यात आली. तिन्ही कायद्यांनी शेतमालाच्या खरेदीवर, हमीभाव मिळवण्यावर विपरीत परिणाम होईल असा आक्षेप घेत पंजाब, हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील गहू-तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या तिन्ही राज्यांतील शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीकडे कूच करीत होते. त्यांना दिल्लीच्या सीमेवर अडविण्यात आले. प्रचंड थंडीत अनेक शेतकरी धरणे धरलेल्या जागीच मरण पावले. केंद्र सरकारच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण तोडगा काही निघाला नाही. ‘कायदे मागे घ्या’, या एकमेव मागणीवर शेतकरी ठाम राहिले, तर ‘नव्या कायद्यातील तरतुदींना असलेल्या आक्षेपांवर सरकार फेरविचार करेल, आंदोलन मागे घ्या’, अशी भूमिका सरकारने मांडली.दरम्यान, हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आणि न्यायालयाने तिन्ही कायद्यांना स्थगिती दिली. तसेच एक समिती नियुक्त करून नव्या कायद्यांची चिकित्सा करण्याचे ठरले. हा पर्यायही शेतकरी आंदोलकांनी नाकारून न्यायालयाने जी समिती नियुक्त केली आहे, त्या समितीच्या सदस्यांच्या भूमिकेविषयीच आक्षेप नोंदविला. तेव्हापासून हा वाद ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला, त्याला आता सहा महिने होत आहेत म्हणून हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. शेतकरी आपल्या भूमिकेवरून हटायला तयार नाहीत, ही चिंतेची बाब आहे. केंद्र सरकार पुन्हा चर्चा करण्यास तयार आहे; पण पुढाकार घेण्यास तयार नाही. नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देऊन चर्चा करण्याचीदेखील तयारी दर्शविली. त्यावरही शेतकऱ्यांच्या चाळीस संघटनांची मध्यवर्ती समिती असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने नकारच दिला आहे. नवे कायदे हे कृषिमालाच्या व्यापार, वाहतूक, साठवणूक आणि इतर व्यवहार यावर परिणाम करणारे आहेत, तसेच शेतकऱ्यांना एकत्र येऊन व्यापारी तत्त्वावर कंपन्या स्थापन करण्यास प्राेत्साहन देणारे आहेत, पण कृषिमालाला हमीभाव बांधून देण्याची व्यवस्था त्यात नाही, हा मुद्दा बरोबरच आहे. भारतीय शेतीचे सर्वात जुने आणि महत्त्वाचे दुखणे कृषिमालाला किफायतशीर भाव मिळणे आहे. त्यावर आतापर्यंत समर्थ पर्याय काढता आलेला नाही. सरकार त्यात वेळोवेळी हस्तक्षेप करते, पण कृषिमालाला किफायतशीर भाव देण्यापेक्षा या मालाचे भाव वाढून महागाई वाढू नये, याकडे सरकारचा कल अधिक असतो. महागाई वाढण्यास अनेक बाबी कारणीभूत असतात. त्यावर उपाययोजना न करता कृषिमालाचे भाव पाडणे हाच मार्ग अवलंबला जातो.
Farmer's Protest: शेतकऱ्यांचा काळा दिन! आंदोलनावर तोडगा कसा निघणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:13 IST