भविष्याचा चेहरा भेसूर न व्हावा, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 03:03 AM2021-01-23T03:03:16+5:302021-01-23T03:05:19+5:30

ऑर्वेल लिहितो, ‘पहिल्या महायुद्धानंतर सिनेमे, स्वस्त कपडे यात लोक गुंतून गेले. तरुणांना नटनट्या होण्याची स्वप्ने पडू लागली’ - आपले आता तेच होतेय का?

The face of the future should not be scary, so ... | भविष्याचा चेहरा भेसूर न व्हावा, म्हणून...

भविष्याचा चेहरा भेसूर न व्हावा, म्हणून...

Next

विशाखा पाटील, सुप्रसिद्ध लेखिका -

जॉर्ज ऑर्वेल हा राजकीय नि सामाजिक परिस्थितीचा भाष्यकार. आत्ताच्या या कोविड काळात सगळं जगच एका अस्वस्थ वर्तमानाचा सामना करत असताना जॉर्ज ऑर्वेलचं चरित्र लिहावं, असं तुम्हाला का वाटलं ?

ऑर्वेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ आणि ‘१९८४’ या गाजलेल्या कादंबऱ्याच मी वाचल्या होत्या. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये सलग मिळेल तितकं त्याचं लेखन वाचायचं ठरवलं. ऑर्वेलचं लेखन वाचून त्याच्या माणूसपणाचा प्रवास मला समजून घ्यायचा होता. हा अतिशय गुंतागुंतीचा माणूस होता. त्याचा जन्म भारतातला आहे व या देशासाठी ब्रिटिश व्यवस्थेत राहून त्यानं जे करू पाहिलं त्याची उमज मला वाचताना आली. त्याचं लेखन आजच्या अस्वस्थ काळाला किती लागू पडतंय हे पाहून थक्कच व्हायला होतं. लोकशाही व्यवस्थेत लोक गाफील राहिले तर हुकूमशाही अवतरण्याचा इशारा इतक्या वर्षांपूर्वी ऑर्वेलने दिला होता. असं होऊ नये याची जबाबदारी या लेखकाने सामान्य माणसावर टाकली आहे. ऑर्वेल म्हणतो, ‘टू सी व्हॉट इज इन फ्रंट ऑफ वन्स नोज, नीड्ज ए कॉन्स्टंट स्ट्रगल.’ भविष्याचा चेहरा आणखी भेसूर न व्हावा यासाठी ऑर्वेल वाचला जायला हवा, असं वाटलं म्हणून मी हे पुस्तक लिहिलं : ‘जॉर्ज ऑर्वेल - करून जावे असेही काही!’ येत्या २६ जानेवारीला, ऑर्वेलच्या दफनाला सत्तर वर्षे पूर्ण होत असताना हे पुस्तक राजहंसतर्फे प्रसिद्ध होत आहे!

ऑर्वेल हुकूमशाहीचं चित्रण कसं करतो?
‘१९८४’ ही त्याची डिस्टोपिया कादंबरी. भविष्यात हुकूमशाही कसं रूप धारण करेल हे तो त्यातून मांडतो. त्यातलं ‘बिग ब्रदर’चं तुमच्यावर लक्ष आहे’ हे म्हणणं असो की ‘थॉट क्राइम’ हा शब्द; आज हे कथात्म समग्र वास्तव बनून उभं आहे. सत्ताधारी सांगतात ते डोळे मिटून ऐकायचं, व्यवस्थेच्या विरोधात विचार केला तर तुमचा छळ ठरलेला. हुकूमशाहीला तुमचा आत्मा बदलून टाकायचा असतो, ते इतिहासाचं सतत पुनर्लेखन करून व जोरकस प्रचारतंत्राच्या माऱ्यानं आपल्या स्मरणशक्तीवरही कब्जा करतात. मग ‘ते’ दाखवतात ते आपण सत्य म्हणून स्वीकारतो असं ऑर्वेल सांगतो. ‘फॅसिझम अ‍ॅन्ड डेमॉक्रसी’, ‘लिटरेचर अ‍ॅन्ड टोटलिटेरियानिझम’ अशा निबंधातून तो हुकूमशाहीचं रूप समजून घेण्याची जी चर्चा करतो ती आजच्या काळात फार महत्त्वाची आहे. ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम’मध्ये देशभक्ती व राष्ट्रवाद या संकल्पनांची तो तपशिलात चर्चा करतो. आज जे घडतंय ते १९३० च्या दशकाशी जुळणारं आहे. १९३६ मध्ये कोळसाखाण कामगारांचा अभ्यास करण्यासाठी ऑर्वेल इंग्लंडच्या उत्तर भागात गेला होता. तेव्हा ब्रिटिश फॅसिस्ट नेत्याची सभा चालू होती. तो सांगत होता, ‘तुमच्या दुरवस्थेला ज्यू आणि परदेशी नागरिक जबाबदार आहेत.’ विखारी वक्तृत्वाच्या जोरावर त्या नेत्याने सभा जिंकली हे वेगळं सांगायला नको. हिटलरनं हेच केलं होतं. आज अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी एकाच समूहातल्या आपल्या जनतेमध्ये भिंती उभारल्या व त्या मोठ्या करत नेल्या आहेत.

माणसांच्या नातेसंबंधांबद्दल ऑर्वेल काय म्हणतो?
ऑर्वेल जास्त विचार करतो तो व्यवस्थेचा, व्यक्तीच्या शोषणाचा व स्वातंत्र्याचा.  तो अठरा वर्षांचा असताना म्यानमार म्हणजे तेव्हाच्या बर्मामध्ये पोलीस अधिकारी म्हणून गेला. तिथं त्यानं साम्राज्यशाही कशी काम करते हे बघून ‘बर्मीज डे’ लिहिलं. या कादंबरीतला ब्रिटिश व्यापारी भारतीय डॉक्टरला सांगतो, ‘आम्ही तुम्हाला लुटायला, तुमचं शोषण करायला आलो आहोत, हे समजून घ्या.’ असं सांगणारा दुसरा कोणता लेखक होता त्या काळात? तिथं काम करताना ऑर्वेलच्या सद्सद्विवेकाला टोचणी लागली म्हणून त्यानं नोकरी सोडली.  बीबीसी इंडिया सर्व्हिसमध्ये काम करताना ‘इंडिया ऑफ द फ्यूचर’, ‘इंडिया इन २०००’ अशा भविष्यवेधी विषयावर चर्चा घडवल्या.   

ऑर्वेल वाचताना कळत गेलं की भीती, अनिश्‍चितता, लोकशाहीचा चेहरा असणारी हुकूमशाही राजवट हे सामान्य जनतेच्या पाठी लागलेलं शुक्लकाष्ठ अजूनही तसंच आहे. २००८ पासून तंत्रज्ञानाच्या अंगानं आपल्या देशातही प्रचंड वेगवान बदल झाले. एकीकडे सोशल मीडिया, माध्यमांचं लोकशाहीकरण आणि दुसरीकडे गहिरी दरी नि विषमता. २०१२-१३ पासून राष्ट्रवादाचे नारे  घुमायला लागले. विचित्र विभागणी होत गेली. कोरोनाने दशकाचा ‘क्लायमॅटिक’ शेवट केला. 

या दरम्यान ऑर्वेलने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमधून समकालाचं निराळं भान मला येत गेलं.  मतं व्यक्त करायला प्लॅटफॉर्म असले तरी अभ्यासाशिवाय केवळ अभिनिवेशानं जनतेच्या मनातला गोंधळ दूर होत नसतो. आपल्याकडे विविध प्रवाहांच्या विचारवंतांची परंपरा आहे. त्यांना समजून भवतालच्या घडामोडींचा अन्वय लावणं हे आपलं काम आहे. ऑर्वेल हे दिशा दाखवणारं असंच एक बेट आहे. एका पुस्तकात तो म्हणतो, ‘पहिल्या महायुद्धानंतर चित्रपटांचं व स्वस्तातल्या कपड्यांचं उत्पादन प्रचंड वाढलं. लोक त्यातच गुंतले. तरुण वर्ग नटनट्या बनण्याची स्वप्नं बघायला लागला. समाज वास्तवापासून दूर गेला.’ - तसंच आपलं होतंय का?
मुलाखत : सोनाली नवांगूळ

Web Title: The face of the future should not be scary, so ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.