आयुषसाठी एक्झिट टेस्ट ही बदलाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:01 AM2019-01-04T01:01:04+5:302019-01-04T01:01:37+5:30

नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसिन बिल २०१८’ला मान्यता दिली आहे.

 Exit test for AYUSH is the change of thumb | आयुषसाठी एक्झिट टेस्ट ही बदलाची नांदी

आयुषसाठी एक्झिट टेस्ट ही बदलाची नांदी

Next

- डॉ. अमोल अन्नदाते (आयुर्वेद महाविद्यालय अध्यक्ष)

नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसिन बिल २०१८’ला मान्यता दिली आहे. येणाऱ्या काळात आयुष ग्रॅज्युएट्स प्रवेश परीक्षेबरोबरच एक्झिट टेस्ट म्हणजेच आपले ज्ञान व कौशल्य सिद्ध करण्यासाठी अजून एक परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर, अध्यापकांसाठीही मानक तयार करण्यात येणार आहेत. ज्या आयुष डॉक्टरांना शिक्षण संपल्यावर अध्यापनात जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी नेट-सेटप्रमाणे ही परीक्षा असणार आहे.

खरे तर आयुष शिक्षणाचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांनी २१, २२ जानेवारी रोजी देशातील सर्व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन व अध्यापकांची परिषद बोलावली आहे. याचा हेतू हाच आहे की, ज्याप्रमाणे एक्झिट टेस्ट ही आयुष शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नेमक्या समस्या काय आहेत, हे शिक्षक, व्यवस्थापनाकडूनही जाणून घेणे आवश्यक आहे. एक्झिटविषयी अजून एक परीक्षा म्हणून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असणे साहजिक आहे, पण आज शासनाच्या आयुष शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नेमके काय करावे, हा शासनापुढे अनेक वर्षांपासून यक्षप्रश्न कायम आहे. आयुष महाविद्यालयांमध्ये अर्धवेळ व पूर्णवेळ शिक्षकांचा तुटवडा हा प्रश्न आधी होता. आता काही ठिकाणी शाळांप्रमाणे विद्यार्थी हे फक्त नावाला असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कसून तपासणी हा चांगला मार्ग असू शकतो, म्हणून एक्झिट परीक्षेला पर्याय नाही.

खरे तर सध्याची आयुष कौन्सिल ही अनेक मार्गांनी आयुष शिक्षणाचे नियमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता नवे नॅशनल कमिशनही येईल, पण आयुष शिक्षणाचा स्तर वाढविण्याचा प्रश्न फक्त नियमन करणाºया शासकीय संस्थांच्या माध्यमातून सुटणार नाही. यासाठी अध्यापक, कॉलेज चालविणारे व्यवस्थापन व समाज म्हणजेच विद्यार्थ्यांचे पालक यांचा यात मोठा व सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आज समाजात आयुष डॉक्टर कमी बाहेर पडतात असे नाही, पण त्यातून किती जण त्यांच्या पॅथीची प्रॅक्टिस करतात. बरेच विद्यार्थी हे केवळ आयुषच्या डिग्रीचे कुंकू कपाळी लावून अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, हे का होते, यावर सखोल अभ्यास व्हायला हवा.

हे विचार रुजण्यास मुलाच्या पहिल्या वर्षाच्या मानसिकतेपासून सुरुवात होते. जर मुलांवर पहिल्या वर्षापासून आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी, सिद्ध यांचे शुद्ध संस्कार झाले, तर नक्कीच महाविद्यालयीन शिक्षणातच त्यांच्या मनात स्वत:च्या शिक्षणाची अस्मिता जागृत होईल. यासाठी आयुष कॉलेज व्यवस्थापनाची जबाबदारी खूप मोठी आहे. मी स्वत: आयुर्वेद महाविद्यालय चालवितो व अत्यंत जबाबदारीने सांगतो की, महाविद्यालयात आयुर्वेदाचे वातावरण असण्यासाठी पैशाची गरज नसते. त्यासाठी मानसिकतेची व मुलांना स्वत:च्या पॅथीबद्दल प्रेम आणि जिद्द निर्माण करणारे शिक्षक हवे असतात.

म्हणूनच विद्यार्थी, महाविद्यालयांनी एक्झिट टेस्टला मुळीच घाबरू नये, तसेच नवे कमिशन आले, तर जास्त गुंता व नियम न वाढविता, आयुष शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले सीसीआयएम, विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापन या सर्वांच्या समस्या लक्षात घेऊन, त्यांना एका ध्येयात कसे बांधता येईल हे पाहावे.

Web Title:  Exit test for AYUSH is the change of thumb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य