‘सिक लीव्ह’ घेऊन व्यायाम ! नोकरी गेली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:39 IST2025-11-14T10:39:37+5:302025-11-14T10:39:48+5:30
International News: खोटी कारणं सांगून कामावरून दांडी मारणं किंवा रजा घेण्याचे प्रकार जगभरात सर्वत्रच होतात. काहीवेळा कंपनीला ‘धडा’ शिकवण्यासाठीही कर्मचारी अफलातून फंडे वापरतात. तुम्ही आम्हाला सुटी देत नाही का, मग घ्या हे मेडिकल सर्टिफिकेट, आता तरी तुम्हाला रजा, सुटी द्यावीच लागेल !

‘सिक लीव्ह’ घेऊन व्यायाम ! नोकरी गेली!
खोटी कारणं सांगून कामावरून दांडी मारणं किंवा रजा घेण्याचे प्रकार जगभरात सर्वत्रच होतात. काहीवेळा कंपनीला ‘धडा’ शिकवण्यासाठीही कर्मचारी अफलातून फंडे वापरतात. तुम्ही आम्हाला सुटी देत नाही का, मग घ्या हे मेडिकल सर्टिफिकेट, आता तरी तुम्हाला रजा, सुटी द्यावीच लागेल !
चीनमध्ये घडलेला असाच एक प्रकार सध्या जगभरात गाजतो आहे. चीनमधील एका कंपनीत काम करणाऱ्या चेन नावाच्या व्यक्तीनं पाय दुखतो म्हणून ‘सिक लीव्ह’ घेतली. पण त्याचवेळी कंपनीला त्याच्या मोबाइल ॲपवरून कळलं की ज्या दिवशी चेननं रजा घेतली, त्याच दिवशी तो तब्बल १६ हजार पावलं चाललेला आणि चक्क धावलेलाही आहे ! खोटं कारण सांगून कंपनीला ‘फसवलं’ या कारणावरून कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकलं. पण चेनही हटवादी. त्यानं कंपनीनं चुकीच्या कारणानं, कोणतीही खातरजमा न करता आणि केवळ मोबाइल ॲप डेटाच्या आधारे मला कामावरून काढून टाकलं, याबद्दल कंपनीविरुद्ध केस दाखल केली. लेबर ट्रिब्यूनलनं चेनच्या बाजूनं निकाल दिला आणि कंपनीनं चेनला १.१८ लाख युआन (सुमारे १५ लाख रुपये) नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला. उच्च न्यायालयानंही आधीच्या निकालावरच शिक्कामोर्तब केलं.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी.. कामाच्या दरम्यान चेनच्या कंबरेला दुखापत झाली. त्यामुळे त्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सिक लिव्ह घेतली होती. त्यानं हॉस्पिटलचा रिपोर्ट आणि मेडिकल सर्टिफिकेटही कंपनीला दिलं होतं. सुमारे महिनाभर आराम केल्यानंतर चेन पुन्हा कामावर रुजू झाला, पण अर्ध्या दिवसातच पाय दुखत असल्याची तक्रार करत त्यानं पुन्हा सुट्टी मागितली. मोबाइल ॲपवरून कंपनीच्या लक्षात आलं, चेन त्या दिवशी तब्बल १६ हजार पावलं चाललेला आणि धावलेला आहे.
त्यांचं म्हणणं होतं, ‘पाय दुखत असेल तर एका दिवसात तू १६,००० पावलं कसा चाललास आणि धावलास? कंपनीनं कोर्टात पुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि चॅट ॲपवरील स्टेप्स रेकॉर्ड दाखवलं. पण चेनचं म्हणणं होतं, हा डिजिटल डेटा विश्वासार्ह नाही. कोर्टानंही स्पष्ट केलं की केवळ मोबाइल डेटाच्या आधारावर कोणालाही नोकरीवरून काढणं बेकायदेशीर आहे.
सोशल मीडियावर ही घटना सध्या खूपच व्हायरल होते आहे. या घटनेनंतर चीनमध्येही नवी चर्चा सुरू झालीय. काही जणांचं म्हणणं आहे, आता सिक लीव्हही मोबाइल ॲपनं सिद्ध करावी लागणार का? तर काहीजण विचारताहेत, कंपनीला कोणाच्या खासगी माहितीत शिरण्याचा अधिकार आहे का?..
कंपनी आणि कर्मचारी दोघांसाठीही हा मोठा धडा आहे. कंपनीनं सबळ पुराव्याअभावी कर्मचाऱ्याला कामावरून काढलं. कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं उल्लंघन करण्याचा अधिकार कंपनीला नाही. मात्र कर्मचाऱ्यांनीही खोटी कारणं सांगून दांड्या मारणं, महत्त्वाच्या वेळी गैरहजर राहाणं चुकीचंच आहे. कंपनी आणि कर्मचारी यांच्यात विश्वासाचं नातं नसेल तर अशा गोष्टी घडू शकतात. या घटनेत सबळ पुराव्याअभावी चेनच्या बाजूनं निकाल लागला, एवढंच नाही, त्याला भलीमोठी नुकसानभरपाईदेखील मिळाली; पण प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही...