विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:46 AM2022-05-04T06:46:36+5:302022-05-04T06:47:45+5:30

राजकारण आणि प्रशासनाचे नवीन प्रतिमान घडवणारे अरविंद केजरीवाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

Exclusive Interview I have come to change politics I will go to every state said Arvind Kejriwal | विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

Next

मुख्यमंत्री म्हणून आपली तिसरी टर्म कशी चालली आहे? 
आम्ही  उत्तम काम करून दाखवल्याने दिल्लीच्या जनतेने आम्हाला लागोपाठ संधी दिली. सात - आठ तास वीज पुरवठा खंडित व्हायचा, तिथे २४ तास वीज असते, तीही मोफत. सरकारी  इस्पितळांमध्ये उत्तम दर्जाचे उपचार, तपासण्या, औषधे सारे मोफत मिळते. चाळीस, पन्नास लाख रुपये खर्च येणारी शस्त्रक्रियाही मोफत केली जाते. दिल्लीतल्या सरकारी शाळा दिमाखदार झाल्या आहेत. आम्ही अर्थसंकल्पातला २५ टक्के खर्च शिक्षणावर करतो. सरकारी शाळांचे १२वीचे निकाल ९९.७ टक्के लागले आहेत. यावर्षी सुमारे ४ लाख मुले खासगी शाळांतून नावे काढून सरकारी शाळेत दाखल झाली आहेत. आम्ही नागरिकांना मोफत पाणी पुरवठाही करतो आहोत.

इतके सगळे मोफत दिल्यानंतरही आपला अर्थसंकल्प नफ्यातला कसा काय? 
इथे आधी खूप भ्रष्टाचार होता. प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसत आणि अर्थसंकल्प सदैव तोट्याचा असे. आम्ही सर्वप्रथम भ्रष्टाचार  संपवला आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करुन बरेच पैसे वाचवू लागलो. उदा. मुकरबा चौक उड्डाणपूल ४२२ कोटी रुपयात होणार होता, आम्ही तो वेळेआधी पूर्ण करून १२५ कोटी रुपये वाचवले.

नागरिकांना फुकटात सेवा घेण्याची सवय लावणे कितपत उचित आहे? 
या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सगळ्यांवर मोफत उपचार होतात, नागरिकांवर मोफत इलाज केला तर ती फुकटेगिरी कशी? या देशात ज्या सुविधा मंत्र्यांना मिळतात, त्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे मी ठरवलेच आहे.

यासाठी पैसे कुठून येणार? 
या देशात एकदा कोणी आमदार झाला की, त्याची बँकेतील शिल्लक १० - १५ कोटीच्या घरात जाते, याचा हिशेब कधी लावलात का तुम्ही? हे चोरीला जाणारे पैसेच आम्ही लोकांमध्ये वाटतो आहोत.  मी स्वतःसाठी विमान खरेदी केले नाही. पण, स्त्रियांना  बस प्रवास मोफत करुन दिला. सरकारकडे पैसा असतोच. रित्या खजिन्याची कारणे सांगणारे लोकांना मूर्ख ठरवतात. नियत साफ असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते.

पंजाबमध्ये निवडणूक जिंकणे किती कठीण होते ?
पंजाबमध्ये काँग्रेसने २५ वर्षे आणि अकाली दलाने १९ वर्षे राज्य केले. या दोघांनी पंजाबला फक्त लुटले. यांच्या सरकारने शाळा, इस्पितळे, वीज, पाण्याकडे कधीही लक्ष दिले नाही. पंजाबच्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, की हे अत्यंत प्रामाणिक लोक आहेत.

पण, मग इतक्या महाग निवडणुका आपण कशा लढता? 
आम आदमी पक्ष गरीब आहे. निवडणुकीत आम्ही लोकांना सांगतो की, आम्हाला एक संधी द्या, मंत्र्यांना मिळतात त्या सुविधा आम्ही तुम्हाला मोफत देऊ. भ्रष्टाचार संपवू. करातून आलेला प्रत्येक रुपया लोकांवरच खर्च करु. यामुळे लोकच आमची निवडणूक लढवतात. 

व्यवस्था बदलण्याऐवजी सरकार बदलणे हे तर आपले लक्ष्य झालेले नाही? 
आजवर ७५ वर्षांच्या राजकारणात जितकी आश्वासने दिली गेली त्यापैकी कोणतीच कुठल्याही राजकीय पक्षांनी पूर्ण केली नाहीत. आम्ही आमची सगळी आश्वासने पूर्ण केली आहेत. ही भ्रष्ट व्यवस्था बदलावी, असे विरोधी पक्षांना कधीच वाटत नाही. परंतु आम आदमी  पक्ष ती पूर्णपणे बदलत आहे.

“आप”ला कोणत्या राज्यात विजय मिळवणे सोपे आहे? का? 
आम्ही आंदोलनातून पुढे आलेले लोक आहोत. राजकारण बदलायला आलो आहोत. आम्ही प्रत्येक राज्यात जाऊ, जनता संधी देईल तिथे जाऊ. देशातला सामान्य माणूस आता उभा राहिला आहे. आता इमानदारी आणि देशभक्तीची लाट संपूर्ण देशात येईल.

आप”कडे भाजपऐवजी काँग्रेसचा पर्याय म्हणून का पाहिले जात आहे? 
आमचे उद्दिष्ट काँग्रेस किंवा भाजपला हरवणे नाही, तर देश जिंकला पाहिजे हे आहे. लोकांना आता बदल हवा आहे. काँग्रेसला मत देण्याचा अर्थ भाजपला मत देणे असा असतो. गोव्यासह अनेक राज्यांत काँग्रेसचे आमदार भाजपत गेले आणि भाजपने सरकार केले म्हणून काँग्रेसला मत देण्याचा काही फायदा नाही.  भाजपला हरवायचे असेल तर आम्हाला मत द्या, असे आवाहन आम्ही लोकांना करतो.

Web Title: Exclusive Interview I have come to change politics I will go to every state said Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.