जगभर: पत्नीचं वय झालं, दुसरं लग्न करू द्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 08:08 IST2024-12-27T08:08:24+5:302024-12-27T08:08:37+5:30
रशियात यावरून वादळ उठलं आणि अर्थातच जगभरातही त्याचे भरपूर पडसाद उमटले.

जगभर: पत्नीचं वय झालं, दुसरं लग्न करू द्या !
आजकाल रशिया आणि पुतीन जगभरात सर्वाधिक चर्चेत आहेत ते रशिया आणि युक्रेन यांच्यात सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे.
या युद्धाच्या आणि त्यामुळे वाताहात झालेल्या नागरिकांच्या, सैनिकांच्या बातम्या सतत कानावर येत असतात, पण या युद्धाव्यतिरिक्त एक वेगळीच बातमी रशियातून पहिल्यांदाच ऐकायला येते आहे. त्यामुळे खुद्द रशियात आणि जगभरात नव्यानं चर्चा घडू लागल्या आहेत. रशियातील एका अल्पसंख्य समुदायातील सर्वोच्च संस्थेनं नुकताच एक आदेश काढला. या आदेशानुसार त्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला एकापेक्षा अधिक लग्नं करण्याचा ‘अधिकार’ त्यांनी बहाल केला. पण याला अर्थातच रशियन कायद्याचा काहीही आधार नव्हता. त्यामुळे रशियात यावरून वादळ उठलं आणि अर्थातच जगभरातही त्याचे भरपूर पडसाद उमटले.
काय होता हा आदेश? - या आदेशानुसार त्या समाजातील प्रत्येक पुरुषाला बहुविवाह करण्याचा अधिकार मिळावा, असं त्यात म्हटलेलं होतं. अर्थात बहुतेकांचा या विवाहांना फार विरोध नव्हता; पण त्या आदेशात जे म्हटलेलं होतं, त्यावरून रशियन समाजमन ढवळून निघालं.
पुरुषांना बहुविवाह करण्याचा अधिकार का मिळावा? - तर त्यासाठी जी कारणं दिली गेलेली होती ती अतिशय धक्कादायक होती.
ती कारणं अशी :
१) समाजातील कोणत्याही पुरुषाची पत्नी म्हातारी, वयस्क झाली असेल, तर त्याला पुन्हा विवाह करण्याची परवानगी मिळावी. पण पुरुष म्हातारा झाला तर, त्याच्या पत्नीलाही हा अधिकार मिळावा का? - तर त्याबाबत या आदेशात काहीही म्हटलेलं नव्हतं.
२) आजारपणामुळे किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे एखाद्या पुरुषाची पत्नी मुलांना जन्म देऊ शकत नसेल तर अशा पुरुषांना आणखी विवाह करण्याची परवानगी देण्यात यावी.
३) लग्न झालेलं आहे, पती-पत्नी दोघंही प्रजननक्षम आहेत, मूल जन्माला घालण्याची नवऱ्याची इच्छा आहे; पण पत्नीची तशी इच्छा नसेल तर अशा पुरुषांना नव्यानं लग्न करण्याची मुभा.
पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याला परवानगी का असावी? - तर त्याची ही प्रमुख तीन कारणं. अर्थात या आदेशात असंही म्हटलं होतं, की पुरुषानं आणखी एखाद्या स्त्रीशी विवाह केला तरी आधीच्या पत्नीलाही त्याला सर्व सोयीसुविधा द्याव्या लागतील. नंतरची पत्नी आणि आधीची पत्नी यात त्याला कोणतंही अंतर, भेदभाव करता येणार नाही. प्रत्येक बाबतीत त्यांना बरोबरीनं वागवावं लागेल. त्यांच्याशी निष्पक्ष वर्तन करावं लागेल. एवढंच नाही, पत्नी म्हणून सर्वांना सारखाच वेळही त्याला द्यावा लागेल. एकीला सगळं काही आणि दुसरीच्या बाबतीत दुर्लक्ष असं त्याला करता येणार नाही.
याच कारणावरून रशियात मोठं वादळ उठलं. लोकांनी या प्रकाराबाबत सडकून टीका केली. हा प्रकार बंद झाला पाहिजे, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, असा भेदभाव करता येणार नाही, असं म्हणत सरकारवरही त्यांनी कोरडे ओढले. रशियात अर्थातच अशा प्रकारच्या विवाहांना मान्यता नाही. विवाहाबाबतचा कायदा तिथे सर्वांसाठी सारखाच आहे. याबाबत लोकांचा कडवा विरोध पाहिल्याबरोबर रशियन सरकारनं या संस्थेलाही लगोलग कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि असला बेकायदेशीर प्रकार चालणार नाही, एकाच देशात दोन परस्परविरोधी आणि तेही घटनाबाह्य कायदे अस्तित्वात येऊ शकत नाहीत, अशी तंबी या संस्थेला दिली.
आपण जे काही करतो आहोत, ते बेकायदेशीर आहे आणि शिवाय पुतीन व रशियन सरकार यांचाही याला कडवा विरोध आहे, हे पाहताच त्या संस्थेनंही आपण काढलेला आदेश लगेच मागे घेतला.
संसदीय कौटुंबिक कामकाजाच्या प्रमुख नीना ओस्टानिना म्हणाल्या, रशियन धर्मनिरपेक्षतेला कमजोर करण्याचा कोणताही प्रयत्न इथे यशस्वी होऊ दिला जाणार नाही. बहुपत्नीत्व हे आमच्या देशाच्या नैतिकता आणि पारंपरिक मूल्यांच्या विरुद्ध असल्याने त्याला लगेचंच पायबंद घातला जाईल.
युद्धाबाबत मात्र वाटाण्याच्या अक्षताच!
रशियाची लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. त्यात अल्पसंख्याकांची संख्या एक कोटी साठ लाखापेक्षा थोडी अधिक म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण ११ टक्के आहे. या प्रकरणी रशियन सरकारनं जनमताची तातडीनं कदर केली आणि संस्थेला हा आदेश मागे घेण्यास भाग पाडलं; पण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तातडीनं बंद व्हावं, अशीही रशियन जनतेची अपेक्षा आहे, त्याला मात्र रशियानं वाटाण्याच्या अक्षताच दाखवल्या आहेत.