Even if the farmer dies, it will work, the herdsman must live! | शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे!

शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे!

- गजानन दिवाण
(उप वृत्तसंपादक, लोकमत) 

घराच्या बाहेर निघायचे म्हटले तरी पन्नास वेळेस विचार करण्याचा हा काळ. एक कोरोना कमी होता म्हणून की काय, आता ब्रिटनमध्ये दुसरा कोरोना जन्माला आला. आपण आणि आपले घर एवढेच विश्व, असे समजण्याचे हे दिवस असताना दिल्लीच्या केंद्रीय पथकाने एवढा मोठा प्रवास करून, काही राज्ये, काही जिल्ह्यांची सीमा ओलांडून मराठवाड्यात आमच्या बांधावर यावे, हेच आमचे भाग्य. अवकाळी अतिवृष्टीने नुकसान झाले ऑक्टोबरमध्ये, ते पाहण्यासाठी आपण आलात डिसेंबरमध्ये, म्हणून काय झाले? कोरोना संकटाच्या काळात तुम्ही आलात हेच  महत्त्वाचे. येण्यास थोडा उशीर झाला म्हणून एवढे ओरडण्याचे कारण  काय? कुठल्या दुष्काळानंतर आपले पथक अगदी वेळेवर आले, ते आधी सांगा.  केंद्रीय पथक असे उशिरा येण्यालादेखील मोठी परंपरा आहे. हे पथक येऊन काय करते? पाच-दहा गावे, पाच-दहा तासांत फिरून ओला-कोरडा दुष्काळ समजून कसा घेते? व्हिडिओ आणि अहवाल पाहूनच अंतिम अहवाल द्यायचा तर मग  मोठा खर्च करून ही दुष्काळी सहल कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्याचे चातुर्य  उगीच कोणी दाखवू नये. कारण हे पथक प्रत्यक्ष बांधावर येऊन गेल्याशिवाय केंद्राची मदत मिळतच नाही, हेही तितकेच खरे. किती बांधावर आणि काय पाहणी केली याला फारसे महत्त्व नाही. अशी ही मोठी परंपरा असताना मग तीच ती ओरड कशाला करायची? 
या केंद्रीय पथकाने मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील दहा, जालना जिल्ह्यातील सहा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील गावांची नुकसान पाहणी केली. सात तासांत एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दहा गावांचे बांध पालथे घातले. तब्बल १८६ किलोमीटरचा प्रवास केला.  म्हणून त्यांचे कौतुक. 
‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.  शेतात पीक कितीही चांगले आले तरी घरात येईपर्यंत त्याचा नेम राहत नाही. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ  पाठ सोडत नाही. काहीच नाही तर व्यापारी पदरात काही पडू देत नाहीत. यंदा निसर्ग अति प्रसन्न झाला. पीक तर चांगले बहरले; पण पाण्यात सारेच वाहून गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी नुकसान झाले. ते कमी म्हणून की काय, पुन्हा ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने होते नव्हते सारेच साफ केले. या पावसामुळे मराठवाड्यात ३६ लाख शेतकऱ्यांच्या २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेकांचे अख्खे शेत खरडून गेले. १३४६ कोटींचा मदतीचा पहिला हप्ता देण्यात आला. काहींना थोडेफार मिळाले, तर अनेकांच्या हाती एक आणाही पडला नाही. विमा काढलेल्या शेतकऱ्यांचेदेखील तेच हाल. विमा कंपनीने त्यांच्याही हातावर तुरी दिल्या. 
-  राज्याची  मदत मिळाली, आता केंद्राच्या मदतीसाठी हे पथक आले.  तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी पाहणी दौरे केले. पंचनामे झाले. येणाऱ्या प्रत्येकासमोर बायाबाप्यांनी  व्यथा मांडली. या केंद्राच्या पथकासमोर भरल्या डोळ्यांनी तेच सांगितले. मदत मिळेल, हीच भाबडी अपेक्षा.  या पथकाला कोणी कापूस दाखवला, तर कोणी  एका टोपल्यात अति पावसाने खराब झालेला सोयाबीन-मका. कोणी तुराट्या झालेले तुरीचे पीक दाखवले, तर कोणी सडलेले धान्य.  अनेकांसमोर व्यथा मांडून झाल्याने आता अश्रूही येत नाहीत. 
...यानिमित्ताने एक बरे झाले. कोरोना झालेल्यांना, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आणि कोरोना होऊ नये म्हणून बाकी सर्वांनाच गेल्या नऊ महिन्यांपासून गाव सोडता आले नव्हते. अनेकांना घरही सोडता आले नव्हते.  
सरकारी खर्चात केंद्रीय पथकाची दुष्काळी सहल तरी झाली. हवापालट झाला. तोंडालाही चव आली. 
या दिल्लीच्या पाव्हण्यांनी आता एकच करावे. राजधानीत पोहोचताच आपली कोरोना टेस्ट करावी आणि नंतरच नुकसानीचा अहवाल सादर करावा. आमच्यासारखे अनेक शेतकरी ओल्या-कोरड्या दुष्काळाने मेले तरी चालतील, दिल्लीतील पोशिंदा जगला पाहिजे, हीच आमची भावना.

Web Title: Even if the farmer dies, it will work, the herdsman must live!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.