शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

एका स्वप्नाचा अंत! प्रस्थापित व्यवस्थेनं आणखी एका उमद्या, होतकरू, स्वप्नाळू तरुणाचा बळी घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 07:02 IST

दोन वर्षांपासून झोपेत असलेल्या व्यवस्थेला अखेर स्वप्निलच्या आत्महत्येनंतर जाग आली. आता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

प्रस्थापित व्यवस्थेनं आणखी एका उमद्या, होतकरू, स्वप्नाळू तरुणाचा बळी घेतला. पुण्याच्या स्वप्निल लोणकर या अवघ्या २४ वर्षांच्या युवकानं शासन आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हतबल होऊन, गत आठवड्यात जीवनच संपवलं. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी  प्रकाशात आली आणि एकच हलकल्लोळ उडाला. स्वप्निलनं मोठी स्वप्नं बघितली होती. त्याला राजपत्रित अधिकारी व्हायचं होतं, शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं होतं, घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या, शंभर जीव वाचवायचे होते ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत तो दोन वर्षांपूर्वीच उत्तीर्ण झाला होता. तेव्हापासून त्याला प्रतीक्षा होती ती मुलाखतीची ! स्वप्निलसारखेच आणखी किती तरी युवक मुलाखतीच्या पत्राची वाट बघत असतील. त्यांचीही स्वप्निलप्रमाणेच काही स्वप्नं असतील. कोडग्या व्यवस्थेला मात्र त्याचं काहीही घेणंदेणं नव्हतं ! शेवटी त्याची परिणिती स्वप्निल नकारात्मकतेच्या फेऱ्यात अडकण्यात झाली. आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, कुठे तरी कमी पडतोय, ही भावना एका क्षणी त्याच्या उमेदीपेक्षा वरचढ ठरली आणि त्या उद्विग्नतेतून त्यानं स्वतःलाच संपवलं.

दोन वर्षांपासून झोपेत असलेल्या व्यवस्थेला अखेर स्वप्निलच्या आत्महत्येनंतर जाग आली. आता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. कोणत्याही मुद्द्यावर हलकल्लोळ झाला, की अभ्यासासाठी समिती गठित करायची, ही सरकारची रणनीती एव्हाना चिरपरिचित झाली आहे. अशा समित्यांचं कामकाज कसं चालतं, त्यांचे अहवाल येण्यास किती वेळ लागतो आणि पुढे त्या अहवालांचं काय होतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रश्न हा आहे, की दोन वर्षांपूर्वी परीक्षा घेऊनही मुलाखतींसाठी एवढा प्रचंड विलंब का करण्यात आला? ती पदं भरण्याची गरज नव्हती का? ...आणि नसेल तर मग मुळात त्या पदांसाठी जाहिरात काढून पूर्व व मुख्य परीक्षा का घेण्यात आली? संबंधितांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच हवीत! केवळ उत्तरं देऊन भागणार नाही, तर स्वप्निलचा बळी जाण्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाला शिक्षा व्हायला हवी! लाखो युवकांच्या स्वप्नांशी खेळ करण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही. मुळात दरवर्षी अवघ्या दोन-तीन हजार पदांसाठी परीक्षा होतात.

त्या मूठभर पदांसाठी लाखो युवक जीवघेण्या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामध्ये प्रामुख्याने भरणा असतो तो ग्रामीण भागातील युवकांचा! नापिकीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेला बाप, पोरगा/पोरगी स्वतःच्या जिवाचं काही बरेवाईट करून घेईल का, या शंकेने खंगलेली माय, भावाला किंवा बहिणीला सरकारी नोकरी मिळाल्यावर आपल्यालाही शिकता येईल ही अपेक्षा ठेवून असलेली भावंडं अशीच बहुतेकांची पार्श्वभूमी असते. आपण यशस्वी झालो की संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या खाईतून वर येईल, या आशेवर भोळेभाबडे युवक-युवती मोठ्या शहरांमध्ये प्रसंगी एकवेळ जेऊन ढोरमेहनत करीत असतात. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले, की मुख्य परीक्षेकडे आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले की मुलाखतीकडे डोळे लावून बसलेले असतात. ते कुटुंबाला बरे दिवस दाखवतील, या आशेवर कुटुंबीय स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांना पैसे पाठवत असतात आणि त्या पैशावर मोठ्या शहरांमध्ये उभी राहते एक वेगळीच अर्थव्यवस्था! शिकवणी वर्ग, खाणावळी, पुस्तक विक्रेते, खोल्या भाड्याने देणारे, असे एका ना अनेक घटक या वाहत्या गंगेत हात धुवून घेत असतात. मरमर मेहनत करणाऱ्या लाखो युवकांपैकी दरवर्षी काही हजार युवकांना सरकारी नोकरी मिळते. बाकीचे वय उलटेपर्यंत प्रयत्न करीत राहतात आणि शेवटी गपगुमान गावाची वाट धरतात!

काही युवक गावाकडे फिरकतच नाहीत. ज्या शहरात मोठमोठी स्वप्नं बघितली, त्याच शहरात मिळेल ते छोटंमोठं काम करून कसं तरी स्वतःचं पोट भरतात; कारण लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही तर काय, याचा त्यांनी विचारच केलेला नसतो. दोन वर्षांपासून मुलाखतीचं पत्र मिळालं नाही म्हणून स्वप्निलच्या स्वप्नांचा चुराडा झाला; पण दरवर्षी लाखो युवकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वप्नाचा चुराडा तर पूर्व वा मुख्य परीक्षेच्या पायरीवरच झालेला असतो! स्वप्नं बघणं वाईट नसतं; पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही तर काय, याचा ‘प्लॅन बी’सुद्धा तयार असावा लागतो! अन्यथा नैराश्याशिवाय दुसरं काहीही हाती लागत नाही. स्वप्निलच्या आत्महत्येतून व्यवस्था काही शिकेल की नाही, हे सांगता येत नाही; परंतु किमान स्वप्निलच्या मार्गावरून चालत असलेल्या युवकांनी तरी पुढचा धोका ओळखून वेळीच सावध व्हावं! 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र