इलॉन मस्क यांच्या १४व्या मुलाचा पंजाबी वारसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 08:37 IST2025-03-04T08:36:05+5:302025-03-04T08:37:06+5:30
इलॉन मस्क विविध कारणांनी कायमच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या प्रेम प्रकरणांवरून आणि त्यांच्या मुलांवरून चर्चेत आले आहेत.

इलॉन मस्क यांच्या १४व्या मुलाचा पंजाबी वारसा!
इलॉन मस्क विविध कारणांनी कायमच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या प्रेम प्रकरणांवरून आणि त्यांच्या मुलांवरून चर्चेत आले आहेत.
इलॉन मस्क यांना किती मुलं असावीत? त्यांना किती मुलं आहेत, यावरुन अनेकदा दावे-प्रतिदावे केले जात असतात. त्यांच्या मुलांच्या यादीत आता नुकतीच आणखी दोन मुलांची भर पडली आहे. नुकत्याच बाहेर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या आतापर्यंतच्या मुलांची संख्या १४ झाली आहे. त्यांच्या या १४व्या मुलाचा वारसा, त्याचं मूळ तर भारतातल्या पंजाब राज्यापर्यंत पाेहोचलं आहे. या नव्या माहितीमुळे सगळ्या जगाला परत एकदा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
न्यूरालिंक ही इलॉन मस्क यांची प्रसिद्ध कंपनी. या कंपनीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रयोग ते सातत्यानं करीत असतात. याच कंपनीची एक अधिकारी शिवॉन जिलिस ही मस्क यांची अत्यंत जवळची ‘मैत्रीण’. या मैत्रिणीपासून मस्क यांना तीन मुले होती, पण शिवॉन यांनी नुकतीच आपल्या चौथ्या मुलाचीही जाहीर घोषणा केली आहे. अर्थातच हे चौथं मूलही मस्क यांचंच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना इलॉन मस्क हे शिवॉन आणि आपल्या मुलांनाही सोबत घेऊन गेले होते. तोपर्यंत या चौथ्या मुलाची वाच्यता दोघांनीही केलेली नसली तरी आता स्वत: शिवॉन यांनीच मस्क आणि शिवॉन यांच्या चौथ्या मुलाची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडीया साइटवरुन जगाला सांगितली आहे.
शिवॉन यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे, मस्क यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या या अदभूत आणि अविश्वसनीय मुलाची माहिती जगासोबत शेअर करणं योग्य ठरेल याची जाणीव आम्हाला झाली. मस्क यांनी याबाबत अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी हे चौथं मूल आमचंच असल्याची कबुली शिवाॅन यांनी जाहीरपणे दिली आहे. हे मूल कधी जन्माला आलं याबाबत मात्र त्यांनी काहीही खुलासा केलेला नाही. या मुलासं नाव त्यांनी सेल्डन लाइकर्गस असं ठेवलं आहे. त्यांना आधीची तीन मुलं आहेत. त्यातील दोन मुलं जुळी आहेत. या जुळ्यांचं नाव स्ट्राइडर आणि एज्योर तर मुलीचं नाव अर्काडिया असं आहे. गेल्या वर्षी अर्काडियाचा जन्म झाला होता.
मस्क यांची मैत्रीण शिवॉन झिलिसचा जन्म कॅनडात पंजाबी भारतीय आई आणि कॉकेशियन कॅनेडियन वडिलांच्या पोटी झाला. पीपल मॅगझिनला २०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत झिलिसनं पहिल्यांदा याचा उल्लेख केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती, माझी आई, पंजाबी भारतीय आहे. त्यामुळे माझा रंग अमेरिकन गोरा नाही. पण आता मी बऱ्यापैकी गोरी झाली आहे. माझ्या पंजाबी वारशाने मला मोठे डोळे मिळाले आहेत.
याआधी काही दिवसांपूर्वीच म्हणजे १५ फेब्रुवारीला अमेरिकी सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि लेखिका एश्ले सेंट क्लेयरनं दावा केला होता की माझ्या मुलाचे वडील इलॉन मस्क आहेत. मी त्यांच्या मुलाची आई आहे! पाच महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या मुलाला जन्म दिला. पण सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव आम्ही हे गुपित ठेवलं होतं आणि कुठेही त्याची वाच्यता केली नव्हती..