ताराक्का नव्हे, समृद्धी हवी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:25 IST2025-01-03T10:24:34+5:302025-01-03T10:25:00+5:30
नर्मदा आक्काच्या हाताखाली 'ती' तयार झाली आणि अनेक बाबतीत जिवंतपणीच दंतकथा बनली. नक्षल्यांच्या वर्तुळात क्राैर्यासोबतच साैंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जायची.

ताराक्का नव्हे, समृद्धी हवी...!
एकविसाव्या शतकातील पंचविसाव्या वर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्राच्या पूर्व टाेकावरील गडचिरोलीत समृद्धी, बरकतीची नवी पहाट घेऊन उजाडला. अमाप खनिजसंपत्तीचे कोठार असलेली गडचिरोली देशाची स्टील सिटी बनेल, इथे काही वर्षांत किमान एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, याची चर्चा वर्ष-दोन वर्षांत होतीच. तिथल्या कोनसरी पोलाद कारखान्याच्या विस्ताराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बहुचर्चित सुरजागड लोहखाणीतील खनिज आता रस्त्यांंनी नव्हे तर बंदिस्त पाइपलाइनने आणले जाईल. लोहखनिजांची वाहने इंधनाऐवजी विजेवर चालतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथल्या आदिवासींच्या शिक्षण व आरोग्याच्या लाॅयड्स स्टील कंपनीने उभ्या केलेल्या सुविधांचे लोकार्पण झाले. अहेरी ते गर्देवाडा रस्त्यावरील नव्या पुलाचे उद्घाटन झाले. त्यामुळे महाराष्ट्राचा हा आग्नेय कोपरा छत्तीसगडशी जोडला गेला. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत प्रथमच त्या रस्त्यावर एसटी बस धावली. मुख्यमंत्र्यांनी त्या बसमधून प्रवास गेला. राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा दुर्गम भागातील पेनगुंडा येथे पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी खेडूत, महिलांशी संवाद साधला.
या दिवसाचा उत्तरार्ध अधिक रोमांचक होता. हा परिसर कथित क्रांतीच्या नावाने रक्तरंजित वळणावर नेणारे अकरा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण आले. नात्याला जंगलात अर्थ मिळालेल्या दोन जोडप्यांसह त्या आठ महिला व तीन पुरुषांच्या डोक्यावर तब्बल एक कोटीहून अधिक रकमेचे बक्षीस होते. या सर्वांनी बंदूक खाली ठेवून शरणागतीचा निर्णय घेतला. भारतीय राज्यघटनेची प्रत देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुख्य प्रवाहात स्वागत केले.
आता सरकारकडून त्यांचे पुनवर्सन केले जाईल. या शरणागतांमध्ये एक नाव धक्कादायक होते. ते म्हणजे साठी ओलांडलेली विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ ताराक्का. दंडकारण्य झोनल समितीची सदस्य. मूळची अहेरी तालुक्यातील किष्टापूरची ताराक्का नक्षली चळवळीत दाखल झालेली गडचिरोलीतील पहिली महिला. नर्मदा आक्काच्या हाताखाली ती तयार झाली आणि अनेक बाबतीत जिवंतपणीच दंतकथा बनली. नक्षल्यांच्या वर्तुळात क्राैर्यासोबतच साैंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जायची. मध्य भारतात ताराक्का नावाची एकेकाळी प्रचंड दहशत होती. अनेक नक्षली हल्ल्यांचा मास्टरमाइंड मल्लूजोला वेणूगाेपाल ऊर्फ भूपती हा तिचा पती तर कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी याची ती वहिनी. ताराक्काने पोलिस व संरक्षण दलांवरील अनेक हल्ल्यांचे नेतृत्व केले. ऑक्टोबर २००९ मध्ये भामरागडजवळ लाहेरी येथे १७ पोलिसांचा बळी घेणारा हल्ला त्यापैकी सर्वाधिक बहुचर्चित. नक्षल चळवळीत तिने तब्बल ३८ वर्षे काढली. या कालावधीत तिच्यावर ६५ हून अधिक गुन्हे नोंदले गेले. ती मोस्ट वाँटेड महिला नक्षली होती. तिला जिवंत वा मृत पकडून देण्यासाठी पंचवीस लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील अनेक दलममध्ये महिलांचा बोलबाला होता.
साउथ गडचिरोली डिव्हिजनल कमिटीत नर्मदा आक्का व ताराक्का, टिपागड दलममध्ये ज्योती, चाटगाव दलममध्ये रणिता, देवरी दलमची सुनीता, सुरगाडची रंजिता, जिमलगट्टा दलमची सरोजा, अशा किती तरी महिला नक्षली सरकारविरोधातील रक्तरंजित लढाईत पहिल्या फळीत असायच्या. सरोजाला २००९ मध्ये अटक झाली. तिचा पती लंकापती रेड्डी ऊर्फ लचन्नानंतर वारंगल पोलिसांपुढे शरण आला. सेंट्रल कमिटीतील नर्मदा आक्काला नंतर पती सुधाकर ऊर्फ किरणसोबत अटक झाली. दोन वर्षांपूर्वी तिचे मुंबईत एक खासगी इस्पितळात कर्करोगाने निधन झाले. तसे मरण नको म्हणूनही ताराक्का शरण आली असावी. बाकी नावे हळूहळू विस्मृतीत गेली. मिलिंद तेलतुंबडे मारला गेला. नक्षल चळवळ खिळखिळी झाली. आता तिचे अखेरचे आचके सुरू आहेत.
ताराक्काची शरणागती हा त्या भरकटलेल्या चळवळीला मोठा धक्का आहेच. शिवाय अनेक दशके रक्तात न्हाऊन निघालेल्या नक्षलग्रस्त भागाची नवी दिशा या शरणागतीने अधोरेखित केली आहे. ही दिशा समृद्धीची, आदिवासींच्या बदलत्या मानसिकतेची आहे. माओवादी चळवळीचे आकर्षण संपले आहे. नवी भरती बंद झाली आहे. दुसरीकडे लाॅयड्ससारख्या मोठ्या पोलाद उत्पादक कंपनीने रोजगाराचे मोठे दालन उघडले आहे. हजारो आदिवासी तरुण-तरुणींना रोजगार मिळू लागला आहे. त्या कंपनीने काल एक हजार कोटींचे समभाग कामगारांच्या नावाने केले. परिणामी, ते कामगार कंपनीचे मालक बनले. थोडक्यात या अरण्यप्रदेशाने, समाजाने रक्ताचा इतिहास पाठीवर टाकला आहे. तो आता ताराक्काच्या नव्हे तर समृद्धीच्या वाटेने भविष्याचा वेध घेईल.