कसे व्हावे नवनिर्माण?

By किरण अग्रवाल | Published: September 6, 2018 08:48 AM2018-09-06T08:48:55+5:302018-09-06T08:50:35+5:30

राज ठाकरे यांना मात्र ही ‘थेअरी’च मान्य नसावी म्हणून की काय, नाशिक महापालिकेतील त्यांची सत्ता गमावून वर्ष होत आले तरी नाशिककरांवरील त्यांचा राग काही कमी झालेला दिसत नाही.

Editorial View on MNS President Raj Thackeray and his work | कसे व्हावे नवनिर्माण?

कसे व्हावे नवनिर्माण?

Next

सार्वजनिक कार्य अगर सेवेसाठी उपजत ऊर्जा असावी लागतेच; पण त्याहीखेरीज महत्त्वाचे म्हणजे सेवाभाव जपूनही त्याबद्दलची टीका ऐकून घेण्याची सहनशक्ती बाळगावी लागते. राजकारणात तर त्याहीपेक्षा वेगळी स्थिती असते. चलतीचा काळ गेला की लोकं मागचं विसरून पुढच्याच्या पाठीशी धावू पाहतात. खूप कमी नेत्यांना असे भाग्य लाभते की, त्यांच्या बऱ्या-वाईट अशा सा-या स्थितीत जनतेचे त्यांच्यावरील प्रेम टिकून असते. त्यामुळे राजकारणातील चढ-उतार, यशापयश पचवून पुढे जाऊ पाहणाराच जेता ठरत असतो. राज ठाकरे यांना मात्र ही ‘थेअरी’च मान्य नसावी म्हणून की काय, नाशिक महापालिकेतील त्यांची सत्ता गमावून वर्ष होत आले तरी नाशिककरांवरील त्यांचा राग काही कमी झालेला दिसत नाही. काल-परवाकडील त्यांच्या नाशिक दौ-यातही त्याचाच प्रत्यय आल्याने, जनतेचे जाऊ द्या; परंतु खुद्द त्यांच्याच पक्षाचे कसे घडून यावे नवनिर्माण असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.

धुळे येथील पक्षाचा मेळावा आटोपून मुंबईस परत जाताना नाशकात थांबलेले राज ठाकरे यांनी माध्यमांना सामोरे जाताना विकासकामे करून कुठे मते मिळतात, असा प्रश्न केल्याने विकासकामांवरचा त्यांचा विश्वास उडाल्याचेच स्पष्ट व्हावे, पण तसे असेल तर मग निवडणुका का केवळ पैशावर, भूलथापांवर व अन्य तत्सम मुद्द्यांवरच लढविल्या जाताहेत का, विकासाला कुठेच व काहीच अर्थ उरला नाही का असा गंभीर प्रश्न उपस्थित होणारा असून, तो सर्वांनाच अंतर्मुख करणाराही ठरावा. हल्लीचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ बदलले आहेत हे खरेच. ते कुणीही नाकारणार नाही; परंतु खरेच त्यातून ‘विकास’ पूर्णत: हद्दपार झाला असेल किंवा होऊ पाहत असेल तर राजकारण व समाजकारणही कुठल्या वळणाने चालले आहे याचा विचार होणे गरजेचे ठरावे. सद्यस्थितीत तर निवडणुकांसाठी शब्दश: ‘वॉर रूम्स’ तयार करून त्यात तैनात केल्या गेलेल्या समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हाताळणा-या फौजा ज्या पद्धतीने प्रचार तंत्राचा वापर करीत आहेत व करून दाखविल्याची उदाहरणे देण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यांच्या निंदा-नालस्तीची मोहीम चालविताना दिसून येत आहेत, ते पाहता राज ठाकरे यांच्या म्हणण्याकडे पूर्णत: दुर्लक्षही करता येऊ नये.

अर्थात, राज ठाकरे यांचे या संदर्भातील दुखणे दुहेरी आहे. एक तर प्रचलित राजकीय व्यवस्थेत त्यांना आपल्या ‘मनसे’ची ‘स्पेस’ म्हणजे जागा निर्माण करता आलेली नाही, आणि दुसरे म्हणजे, जिथे ती निर्माण केली वा तशी सुरुवात झाली तिथे ती स्थिती टिकविता आली नाही. नाशिककरांवरचा त्यांचा राग हा दुसºया दुखण्याचा भाग आहे. कारणे, ‘मनसे’ला सर्वप्रथम राजकीय संधी मिळाली ती नाशकात. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी जशी नाशिक दत्तक घेण्याची भाषा केली होती तशी तत्पूर्वी राज यांनी केल्याने नाशिककरांनी त्यांच्या ‘मनसे’ला महापालिकेच्या दारापर्यंत पोहोचविले होते. त्यामुळे अगोदर भाजपा व नंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने त्यांनी पाच वर्षे सत्ता भूषविली होती. त्यापूर्वी नाशकातील तीन विधानसभा मतदारसंघातून ‘मनसे’चे आमदारही निवडून आले होते. पण, हा चढता आलेख टिकून न राहता घसरणीला लागला. महापालिकेतील सत्ताही गेली व आमदारकीच्या जागाही हातून गेल्या. म्हणायला, उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण, रामकुंडावर संगीत पडदा, बॉटनिकल गार्डन व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयासारखी कामे राज ठाकरे यांनी स्वत:च्या व्यक्तिगत स्नेह-संपर्कातील उद्योग समूहाकडून करवून घेतलीही; परंतु ती पुन्हा मते मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरू शकली नाहीत. कारण ती कामे पूर्णत्वास जाईपर्यंत खूप वेळ निघून गेला होता. अखेर कुटुंबातला असो की विकासाचा, पाळणा वेळीच हलण्यालाही महत्त्व असते. शिवाय, पक्षाच्या नगरसेवकांचाच पक्षावर विश्वास न राहिल्याने पक्षाच्या पहिल्या महापौरांसह अनेकांनी ‘मनसे’ सोडली. त्यानंतर जनाधार असलेले स्थानिक नेतृत्व समोर येऊ शकले नाही. त्याचाही फटका बसला. तेव्हा, राज ठाकरे यांच्या नाराजीमागील ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी.

पक्ष कार्यकर्त्यांनी शहरातील प्रश्नांकडे राज ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, दत्तक बाप कुठे गेला, असा खोचक प्रश्न करून त्यांनी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर राजकीय निशाणा साधलाच; परंतु त्यांना मते देणाºया नाशिककरांनो आता भोगा तुम्ही तुमच्या कर्माची फळे, असा संकेत देऊन आपल्या पराभवाची सल अधोरेखित करून दिली. त्यामुळे ठाकरे यांची नाराजी पाहता खुद्द त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनाच कसे व्हावे नवनिर्माण असा प्रश्न पडून जाणे स्वाभाविक ठरले आहे. कारण दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी, पक्षाच्या संघटनात्मक स्थितीत फारसा फरक आढळून येऊ शकलेला नाही. नवीन पदाधिकारी काहीसे धडपड करताना दिसतात, पण त्यांचे बळ अपुरे पडते. त्यात पक्ष प्रमुखाने त्यांना सावरावे, ऊर्जा द्यावी तर तेच विकासावरून विश्वास उडालेले! मग कशाच्या बळावर निवडणुकांना सामोरे जायचे?

Web Title: Editorial View on MNS President Raj Thackeray and his work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.