शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - बाेगद्यातला थरार, देशवासीयांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:41 IST

सर्व मजूर सुखरूप आहेत, हे पाहून काळजीत असलेले त्यांचे नातेवाईक व देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.

उत्तराखंडमधील सिलक्यारा ते बडकोटदरम्यानच्या बोगद्यातून अखेर मंगळवारी पहाटे आनंदाची बातमी आली. चार धाम महामार्गावर खोदल्या जात असलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे भुसभुशीत छत कोसळल्यामुळे ४१ मजूर गेले दहा दिवस अडकले आहेत. मजूर व बचावपथकांमध्ये जेमतेम पन्नास-साठ मीटरचा मलबा आहे. तो हटविण्याचे प्रयत्न फसल्यानंतर त्यातून एक सहा इंच व्यासाची पाइप आत टाकली गेली. सोमवारी रात्री त्या पाइपमधून गरम खिचडी बाटल्यांमध्ये भरून पाठविण्यात आली. गेल्या दहा दिवसांत या मजुरांना मिळालेले हे पहिले ताजे व गरमागरम जेवण होते. त्याच पाइपमधून एक इंडोस्कोपिक कॅमेरा व वॉकीटॉकी पाठवून अडकलेल्या मजुरांशी संवाद साधला गेला. त्याचे व्हिडीओ जारी करण्यात आले. सर्व मजूर सुखरूप आहेत, हे पाहून काळजीत असलेले त्यांचे नातेवाईक व देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.

जून-जुलै २०१८ मध्ये गुहेत अडकलेले बारा कुमारवयीन फुटबाॅलपटू व त्यांच्या प्रशिक्षकाची सुटका करणारे थायलंडचे तज्ज्ञ, तसेच नॉर्वे व अन्य देशांतील विशेषज्ञ, अमेरिकन बनावटीची अद्ययावत यंत्रे, त्याचप्रमाणे डीआरडीओ, ओएनजीसी, नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे विकास महामंडळ तसेच सतलज व टिहरी जलविद्युत महामंडळांचे तंत्रज्ञ या मजुरांना बाहेर काढण्याचे अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पर्वताला उभे-आडवे ड्रिल मारून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा बोगदा एकूण ४,५३१ मीटर लांबीचा आहे. त्यापैकी सिलक्याराच्या बाजूने २३४० मीटर तर बडकोटच्या बाजूने १६४० मीटर तो खोदला गेला आहे. पाचशे-सहाशे मीटरचे काम उरले असतानाच अपघात झाला. सुरुवातीला तो किरकोळ वाटला. मधला मलबा हटवला की मजूर बाहेर येतील असे वाटले; परंतु, हिमालयाची रचना सह्याद्रीसारखी पाषाणाची नाही. किरकोळ हादऱ्याने तिथे जमीन खचते, भूस्खलन होते. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत गेले. आतमध्ये अडकलेल्या मजुरांचा तसेच बाहेर त्यांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची मानसिक, शारीरिक अवस्था आणि बचावकार्य हा थरार एखादा चित्रपट किंवा वेब सिरीजचा मसाला आहे.

थायलंडमध्ये गुहेत अडकलेली मुले व त्यांच्या प्रशिक्षकांच्या सुटकेवर गेल्या वर्षी वेब सिरीज आलीच आहे. ती गाजलीही. हा तसाच भयपट आहे. या मजुरांनी गेले दहा दिवस मृत्यूच्या कराल दाढेत घालवले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी आणखी एक-दोन दिवस लागू शकतात. या अडीचशे-तीनशे तासांत त्यांनी काय विचार केला असेल, एकमेकांशी काय बोलले असतील, त्यांची दिनचर्या किती अस्वस्थ असेल. अवतीभोवती घुटमळणारा मृत्यू, जिवलगांच्या आठवणी, मलब्याच्या पलीकडच्या हालचाली, बचावासाठी होणारे प्रयत्न, त्याच्या यशापयशाची ऊनसावली, त्यामुळे होणारी घालमेल या साऱ्या अवस्था शब्दांत व्यक्त होतीलच असे नाही. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड अशा आठ वेगवेगळ्या राज्यांमधून पोटाची खळगी भरण्यासाठी जोखमीचे काम करणारे हे मजूर १२ नोव्हेंबर रोजी पहाटे बोगद्यात अडकले. ते रात्रंदिवस काम करीत होते; कारण, सरकारचा महत्त्वाकांक्षी चार धाम प्रकल्प निवडणुकीच्या आधी पूर्ण करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर क्रेन व गर्डर कोसळून झालेल्या अपघातात वीस बळी गेले. तिथेही मजूर रात्रंदिवस काम करीत होते. या अपघाताची आठवण यासाठी की, दोन्ही अपघातांशी ‘नवयुग इंजिनिअरिंग’ या कंत्राटदार कंपनीचा संबंध आहे. तेव्हा, भयकथेच्या पलीकडे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

चार धाम यात्रेतील उत्तर काशी ते यमुनोत्री प्रवासातील अवघी ४०-५० मिनिटे वाचविण्यासाठी भूसंवेदनशील हिमालयीन टापूत अशा लांब बोगद्याची गरज आहे का? साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा खोदताना आराखड्यानुसार आपत्कालीन सुटकेचा मार्ग आधी का तयार केला नाही? समृद्धी महामार्ग व चार धाम प्रकल्पातील कंत्राट एकाच कंपनीकडे हा निव्वळ योगायोग समजला तरी महाकाय प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक क्षमता या कंपनीकडे असल्याची खातरजमा करण्यात आली आहे का? बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या ४० नव्हे तर ४१ आहे, हे समजायला पाच दिवस लागले. आपण कष्टकऱ्यांच्या जगण्या-मरण्याबद्दल इतके कसे बेफिकीर असू शकतो? तसेही अनेकदा जाणवते, की या देशात गरिबांच्या जिवांना किड्यामुंग्यांइतकीही किंमत नाही. त्याच वास्तवाचे हे आणखी एक उदाहरण नव्हे काय?

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगार