संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:24 IST2025-07-23T07:20:27+5:302025-07-23T07:24:18+5:30
माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत.

संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
महाराष्ट्रभर सध्या दोन प्रश्न भलतेच चर्चेत आहेत. पहिला- विधानसभेचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे मोबाइलवर जंगली रमी खेळत होते, की पत्त्यांचाच साॅलिटेयर गेम? आणि दुसरा- शेतकरी आत्महत्यांच्या रूपाने शेती व्यवसायाचा कडेलोट होत असताना कृषिमंत्र्यांनी अशी असंवेदनशीलता दाखवूनही त्यांचे मंत्रिपद शाबूत राहील का? महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा मुद्दा थेट दिल्लीत नेला आहे. असंवेदनशील कृषिमंत्रीमहाराष्ट्राला नको असे साकडे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांना घातले आहे. पण, या प्रश्नांची उत्तरे चाैहान यांच्याकडे नाहीतच.
महाराष्ट्रात तीन पक्षांचे महायुती सरकार सत्तेवर असल्याने माणिकरावांना धनंजय मुंडे यांच्या मार्गाने जावे लागेल का, याचे उत्तर नैतिकतेवर नव्हे तर राजकीय समीकरणांवर अवलंबून असेल. माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. महायुती सरकारला, कोकाटे यांच्या मंत्रिपदाला जेमतेम आठ महिने होताहेत आणि जवळपास दर महिन्याला एक वाद असा माणिकरावांचा स्कोअर आहे. खोटी कागदपत्रे देऊन सदनिका मिळविल्याच्या तीस वर्षे जुन्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे आमदारकी अडचणीत आली. पण, वरच्या न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती दिल्याने गोळी कानाजवळून गेली.
भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेली एक रुपयात विमा योजना सरकारने गुंडाळली तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लपविताना कृषिमंत्री म्हणाले, ‘आजकाल भिकारीदेखील १ रुपया घेत नाही; परंतु आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयात विमा देतो..!’ साहजिकच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी केवळ उभ्या पिकाचेच पंचनामे होतील असे ठणकावून सांगितले आणि ‘पीक निघाल्यानंतर काय ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असा सवाल विचारला. कर्जमाफीचा मुद्दा निघाला तर ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले, ‘कर्जाचे पैसे तुम्ही शेतीत गुंतवता का? तुम्ही कर्जे घेता, ती फेडत नाही. त्या पैशांतून साखरपुडे करता, लग्न समारंभावर खर्च करता आणि नंतर कर्जमाफी मागता’. हे विधानही त्यांना भोवले. दिलगिरी व्यक्त करावी लागली.
कांद्याच्या घसरलेल्या दरासाठीही त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार ठरवले. ‘एखाद्या शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळाला की सगळे कांदा लावत सुटतात. प्रत्येकानेच कांदा लावला तर भाव पडणारच’, या त्यांच्या वक्तव्यात तसे पाहता कांदाच काय, पण कोणत्याही पिकाच्या बाजारपेठेचे वास्तव होते खरे. तथापि, मंत्रिपदावर बसलेल्या माणसाने इतके परखड बोलायचे नसते हे भान त्यांना राहिले नाही. नंतर एका समारंभात बोलताना माणिकरावांनी त्यांच्याकडील कृषिमंत्रिपदाची तुलना ओसाड गावच्या पाटीलकीशी केली. ते म्हणाले, ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे.’
माणिकराव कोकाटे शेती खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणत असले तरी प्रत्यक्षात शेती, शिक्षण, आरोग्य या खात्यांची मंत्रिपदे म्हणजे काटेरी मुकुट असतो. या खात्यांचा एकूण कारभारच इतका गुंतागुंतीचा आणि झालेच तर खालपासून वरपर्यंत चिरीमिरीचा आहे की, आतापर्यंत मोजकेच मंत्री ही खाती सांभाळूनही निष्कलंक राहू शकले आहेत. त्यातही शेती हा व्यवसाय मुळात प्रचंड तोट्याचा. त्याला लोकसंस्कृतीपासून ते जागतिक व्यापारापर्यंत असंख्य संदर्भ. त्याविषयी अधिकारवाणीने बोलणारेही खूप. ही बोलणारी मंडळी तज्ज्ञ वगैरेही असतात. गरिबाला, संकटात सापडलेल्या माणसाला सल्ले देणारे खूप असतात. म्हणूनच, शेतकऱ्याला सल्ले देणारे जसे पैशाला पायलीभर तसेच मंत्र्यालाही सल्ले देणारे खूप. त्यांनी ऐकले तर ठीक. अन्यथा... बरेच बरे. शेतकरी जसा चोहोबाजूंनी संकटांनी घेरलेला, तसाच या खात्याचा मंत्रीही संकटांच्या कोंढाळ्यात असतो.
अशावेळी शांतपणे आपल्या खात्याचे काम पाहणे, आवश्यक असेल तेवढेच कमीतकमी बोलणे आणि महत्त्वाचे म्हणजे या खात्याचा केंद्रबिंदू जो शेतकरी त्याच्याबद्दल सहानुभूती, कळवळा, संवेदनशीलता बाळगणे, हे भान कृषिमंत्र्यांनी बाळगायलाच हवे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाच्या पहिल्या दिवसापासून हे उमजलेले नाही. तेव्हा, मोबाइलवरील गेमच्या वादात बरोबर कोण, चुकीचे कोण, कृषिमंत्री की विरोधक? हे महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा फटकळ, परखड बोलण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या मंत्र्यांमध्ये संवेदनशीलता नाही, हे अधिक महत्त्वाचे.