संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 07:26 IST2025-07-15T07:23:14+5:302025-07-15T07:26:30+5:30

जगावर ठसा उमटवणाऱ्या या महान राजाचे गडकिल्ले आता जागतिक वारसा यादीत आले आहेत, ही त्यामुळेच अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी.

Editorial: The legacy of the king Chhatrapati Shivaji Maharaj, did we know | संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?

संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?

जगाने अनेक सम्राट पाहिले. योद्धे आणि सेनापती पाहिले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा ‘रयतेचा राजा’ इतिहासात एकमेवाद्वितीय आहे! आज साडेतीन शतके उलटल्यानंतही छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच समकालीन वाटतात. स्वातंत्र्याची आकांक्षा जिथे आहे, तिथे शिवराय वाट दाखवतात. परिवर्तनाचा लढा जिथे आहे, तिथे राजेच आठवतात. म्हणून तर शिवरायांचा पवाडा लिहिण्याची इच्छा महात्मा फुल्यांना होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना तो पवाडा गाण्याची इच्छा होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या चरित्रातून प्रेरणा मिळते. क्रांतिसिंह नाना पाटलांना शिवरायांचा गनिमी कावा नवी युक्ती देतो, तर नेताजी सुभाषचंद्र बोसांना हाच वारसा शक्ती देतो. यशवंतराव चव्हाणांना शिवचरित्रातून राज्यकारभाराचा धडा मिळतो. अवघ्या भारताला आणि जगाला शिवचरित्राने भारावून टाकले आहे. ‘शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रतिभासंपन्न नेतृत्व होते’, अशा शब्दांत पाश्चात्त्य इतिहासकारांनी मांडणी केली आहे. जगावर ठसा उमटवणाऱ्या या महान राजाचे गडकिल्ले आता जागतिक वारसा यादीत आले आहेत, ही त्यामुळेच अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष असणाऱ्या बारा किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी उभारलेली गडकोटांची भक्कम रचना ही संरक्षणासाठी तर अतुलनीय महत्त्वाची होतीच, पण स्वाभिमान, शौर्य आणि दूरदृष्टीचेही ते प्रतीक आहे. या किल्ल्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासावर ठसा उमटवला आहे. छत्रपतींनी अनेक डोंगरी किल्ल्यांचे जतन केले, काहींची पुनर्बांधणी केली आणि काही नव्याने उभारले. हे किल्ले त्यांच्या धोरणांचे, लढायांचे आणि तत्त्वज्ञानाचे साक्षीदार आहेत.

आजही दिमाखात उभा असलेला सिंधुदुर्ग हा १६६४ मध्ये महाराजांनी अरबी समुद्रात बांधलेला जलदुर्ग. इंग्रज आणि फ्रेंच जो विचारही करू शकत नव्हते, ते छत्रपती तेव्हा प्रत्यक्षात आणत होते. शिवरायांची खरी स्मारके हीच. दारूगोळा तयार करणारा कारखाना उभारतानाच, फार्सी- मराठी शब्दकोश- भाषाकोश तयार करणारा, स्वतःचे आरमार उभारतानाच टांकसाळ उघडणारा, युद्धाची स्वतंत्र नीती विकसित करणारा, शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाचीही राखण करणारा, स्त्रियांचा सन्मान करणारा आणि सर्व जातीधर्मांच्या मावळ्यांना माया लावणारा, असा हा महान राजा! दिल्लीच्या अन्याय्य, अमानुष सत्तेला आव्हान देणारा आणि अनेक वादळे अंगावर घेऊनही दिमाखात उभा असलेला रायगड आपल्याला काय सांगतो? आता तर हा रायगड जगाने वारसा म्हणून अधिकृतपणे मान्य केला आहे. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र अशा सर्व बाबी या जागतिक मानांकनासाठी निर्णायक ठरल्या. वेगवेगळ्या वीस देशांनी आपल्या या प्रस्तावाला त्यामुळेच तर समर्थन दिले. करारावर स्वाक्षरी करणारा प्रत्येक देश त्या देशातील ऐतिहासिक आणि दुर्मीळ साधनसंपत्ती जतन करण्याची शपथ घेत देत असतो. ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी आपल्याकडे पुरातत्त्व विभाग आणि राज्य सरकार काम करत असतात.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यानंतर सगळ्या जगाला शिवरायांचा वारसा आणखी व्यवस्थित कळेल. जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील. पर्यटन वाढेल. अर्थकारणाला गती मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘युनेस्को’ शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल. ज्या पद्धतीने युरोपातील अनेक किल्ले जतन केले आहेत, त्याच शास्त्रीय शिस्तीने आपले किल्ले जतन करता येतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तर इतिहासातले नवे थरही कदाचित सापडू शकतील. अवघ्या जगापर्यंत हा वारसा पोहोचेल, ही बातमी आश्वासक आहेच. पण, हा वारसा आपल्याला तरी समजला आहे का? महाराजांचे खरे स्मारक म्हणजे त्यांचे गड-किल्ले, हे ठाऊक असूनही सरकार म्हणून, समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आजवर आपण काय केले, हे स्वतःला एकदा विचारायला हवे. छत्रपती शिवरायांचा जयजयकार करताना, त्याच वाटेवरून आज आपण चाललो आहोत ना, हे एकदा तपासून पाहायला हवे!

Web Title: Editorial: The legacy of the king Chhatrapati Shivaji Maharaj, did we know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.