शाळकरी मुलांना ‘एआय’ शिकवण्याची इतकी घाई कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 07:08 IST2025-12-12T07:07:58+5:302025-12-12T07:08:56+5:30
जिथे बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांनी कधीही डिजिटल साधनांचा वापर केलेला नाही, त्या ठिकाणी ‘एआय’ वापरण्याची सक्ती करणे हास्यास्पद आहे.

शाळकरी मुलांना ‘एआय’ शिकवण्याची इतकी घाई कशाला?
डॉ. गजानन र. एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह
एज्युकेशन सोसायटी, पुणे
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन विकसित होईल, अशी शक्यता नाही. विज्ञान शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी रुजवण्यात आपल्याला अपयश आले. त्यामुळे अनेकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या बाबतीत ही अपेक्षा अवास्तव वाटते.
तंत्रज्ञानाने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी भारताचे भावी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी, २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून प्राथमिक वर्गापासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केली आहे. जुलै २०२५ मध्ये, सरकारने SOAR उपक्रम (Skilling for AI Readiness) सुरू केला, ज्याद्वारे जवळपास १८,००० सीबीएसई संलग्न शाळांमध्ये सहावीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा विषय शिकवला जात आहे.
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
सहावी ते आठवीसाठी १५ तासांचा अभ्यासक्रम आणि नववी ते बारावीसाठी १५० तासांचे अभ्यासक्रम आहेत. ‘सीबीएसई’ने ‘एआय’च्या समावेशनासाठी ‘एनसीईआरटी’ला अभ्यासक्रमाचा मसुदा सादर केला आहे.
शाळांमध्ये ‘एआय’साठी इतकी घाई का आहे? हे खरे आहे की ‘एआय’चा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे. आपला देश ‘एआय’ तंत्रज्ञानामध्ये अग्रणी भूमिका बजावण्याचा आणि जागतिक ‘एआय’ मानके तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु ही क्षमता निर्माण करण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना एआय शिकवणे आवश्यक आहे का? याचे ओझे त्यांना पेलवेल का? याबाबतीत विद्यार्थ्यांचा वापर करणे कितपत योग्य आहे?
सरकारच्या मते, डिजिटल दरी (अंतर) कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील किंवा मर्यादित संसाधने असलेल्या समुदायांमधील विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करण्यास SOAR मदत करते. जिथे बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांनी कधीही शैक्षणिक उद्देशासाठी डिजिटल साधनांचा वापर केलेला नाही, त्या ठिकाणी ‘एआय’ वापरण्याची सक्ती करणे हास्यास्पद आणि चुकीचे आहे.
शाळांमध्ये ‘एआय शिकवणे’ हा शब्दप्रयोग नेहमीच गोंधळ निर्माण करतो. काही जणांना एआय साक्षरता हवी असते. काही जण शाळांमध्ये एआय साधनांचा वापर वाढवण्याची इच्छा व्यक्त करतात. इतर जण शिक्षकांसाठी एआय साधनांच्या गरजेवर भर देतात. विकासक व्यक्तिगत शिक्षण आणि मूल्यांकनाबद्दल बोलतात. सरकार एआय वापरून प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण करण्याची भाषा करते. अशा परिस्थितीत, आपल्याला ‘एआय साधनांचा सुज्ञ वापर’ आणि ‘विद्यार्थ्यांना एआय शिकवणे’ यामध्ये फरक करणे आवश्यक आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात, माध्यमिक शाळेत ‘एआय’चे तीन प्रकार आहेत : संगणक दृष्टी, नैतिक भाषा प्रक्रिया, आणि सांख्यिकी माहिती. त्यातील किचकट संकल्पना विद्यार्थी कशा समजून घेतील आणि मुख्य म्हणजे त्यांचा संबंध प्रत्यक्ष वापराशी जोडण्याइतकी आकलन क्षमता या वयात त्यांच्यात असेल का, विकसित करता येईल का, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
इयत्ता सातवीच्या एआय हँडबुकमध्ये विद्यार्थ्यांना विचारलेला एक प्रश्न असा : लैंगिक समानता आणि सर्व महिलांचे आणि मुलींचे सशक्तीकरण कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आहे? - याचे उत्तर देणे सातवीच्या विद्यार्थांना शक्य आहे का? विज्ञान शिक्षणात चिकित्सक विचारसरणी रुजविण्यात गेल्या इतक्या वर्षांत आपण फार यशस्वी झालेलो नाही. त्या पार्श्वभूमीवर ही नवी ‘एआय’ अपेक्षा फारच अवास्तव वाटते.
प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मेंदूचा विकास वेगाने होत असतो. या विकासासाठी अनुकूल वातावरण हवे. अभ्यासामुळे येणारा प्रचंड तणाव मानसिक व शारीरिक प्रकृतीवर परिणाम घडवतो. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व व चारित्र्य विकास हे शिक्षणाचे ध्येय आहे.
यातला खरा प्रश्न शैक्षणिक उद्दिष्ट, शैक्षणिक मार्ग आणि मूल्यांकनाच्या पद्धतींचा अभ्यास करण्याचा आहे, तसेच शिक्षकांच्या क्षमतेचा आणि संसाधनांचा विकास करण्याबद्दलचाही आहे. ‘एआय’सारखे साधन शाळकरी विद्यार्थ्यांच्या हाती देताना अतिशय जागरूक राहणे आवश्यक आहे.